सिंगापूर ! अर्थात छप्पन इंच छातीचा देश !

अंतःस्थ प्रेरणेने घडलेले प्रगत राष्ट्र;

Update: 2025-01-26 11:37 GMT

भाग - २

सिंगापूर येथे सांसदीय लोकशाही (प्रजासत्ताक) प्रणाली आहे. जगात बोटावर मोजण्याइतक्या उरलेल्या नगरराज्य देशांपैकी हे एक राष्ट्र आहे. येथील संसद एकसभागृहीय असून, पंतप्रधानांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ प्रशासनाचा गाडा हाकते. राष्ट्राध्यक्ष हे सर्वोच्च मानाचे पद असले तरी ते अकार्यकारी पद आहे. असे असले तरी ते भारतीय राष्ट्रपतींप्रमाणे रबर स्टॅम्प नाहीत. त्यांना काही महत्त्वाचे अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्ष यांची निवड लोकमताने होते, मात्र 1993 चा अपवाद वगळता राष्ट्राध्यक्षांची निवड बिनविरोध होत आली आहे.

9 ऑगस्ट 1965 हा या देशाचा स्वातंत्र्यदिन. या देशात नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असून, आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. लोकशाही असल्याने राज्यधर्म नाही. येथे विविध धर्मीय लोकं गुण्यागोविंदाने नांदतात. अवघ्या 60 वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात सिंगापूरने प्रगत राष्ट्र म्हणून जगात नावलौकिक मिळविला, ते याच कारणांनी...

नवनिर्मितीची अखंड प्रक्रिया ही या देशाची ओळख आहे. शिपिंग आणि पर्यटन हे क्षेत्र या देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती प्रदान करतात. या देशाचे वार्षिक दरडोई उत्पन्न (प्रती व्यक्ती वार्षिक उत्पन्न) 42 ते 43 लाख रुपयांच्या घरात आहे. आणि ते दरवर्षी वाढतच चालले आहे. त्या तुलनेत भारतात वार्षिक दरडोई उत्पन्न 1 लाख 84 हजार रुपये आहे. अर्थात भारतापेक्षा सिंगापूरचे वार्षिक दरडोई (प्रती व्यक्ती) उत्पन्न 23 ते 24 पटीने अधिक आहे. पण तरीही ते जगात अव्वल असल्याची फुशारकी मारत नाहीत किंवा जगात सर्वश्रेष्ठ असल्याची आवई उठवत नाहीत... तिथे कुणालाही विश्वगुरू झाल्याचे वा होत असल्याचे स्वप्न पडत नाही आणि अशी फुशारकी मारल्याने लोकांचे काय भले होते, हेही त्यांना माहीत नाही.


Delete Edit


तिथे पाळीव प्राणी आहेत, मात्र मर्यादित संख्येत. मोकाट जनावरे औषधालाही सापडत नाहीत. मोकाट कुत्रे हा प्रकार त्यांना माहीत नाही. आपल्या देशात गाईला गोमाता म्हणतात, पण लक्षलक्ष गोमाता बेवारस फिरत राहतात. प्लास्टिकसह निकृष्ट, सडलेले अन्न, खाद्य प्राशन करून सार्वजनिक स्थळी हुंदडत राहतात. रस्त्यांवर ठिय्या देत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडवत राहतात. या मोकाट जनावरांना कोंडण्यासाठी साधे कोंडवाडेही आपल्याकडे नाहीत. सिंगापुरात कुणीच मोकाट नसल्यामुळे कोंडून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे अपघाताचे प्रमाण अगदी नगण्य आहे. कार वापरण्याची परवानगी तिथे सहजासहजी मिळत नाही. या कल्पक नियंत्रणामुळे तिथे वाहनांची संख्या मर्यादित असून, वाहतूक कोंडीचा प्रश्नच उद्भवत नाही. सिंगापूरचे सर्व नागरिक वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करतात.

येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय दर्जेदार आणि सुरक्षित आहे. या व्यवस्थेचा नागरिक पुरेपूर उपयोग करतात. बसेस आणि मेट्रो रेल्वे अतिशय आलिशान आणि गुणवत्तापूर्ण आहे. तुम्ही बसेसमध्ये केवळ पाणी पिऊ शकता, इतर पेय पिण्यास आणि खाद्यपदार्थ खाण्यास बसेसमध्ये मनाई आहे. यासोबत सार्वजनिक ठिकाणी थुंकणे , पिचकारी मारणे निषिद्ध आहे. त्यासाठी तुम्हाला 300 ते 500 सिंगापूर डॉलर दंड भरावा लागू शकतो. सिगारेट स्मोकिंग वर्ज्य नाही, मात्र ती शासनाने जिथे ऍश ट्रे पॉइंट दिले आहे तिथेच, इतर ठिकाणी धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही सिंगापूर प्रवासादरम्यान काही भारतीय नागरिक निषिद्ध स्थळी धूम्रपान करताना आढळून आले...

महत्त्वाचे असे की, तुम्ही रस्ता क्रॉस करीत असाल तर कितीही मोठे वाहन असो ते लगेच थांबते. तुम्ही एका टोकावरून दुसऱ्या टोकावर गेल्यावरच ही वाहने मार्गस्थ होतात.

तिथे नागरिक एकमेकांशी अदबीने आणि प्रेमाने वागतात. थोडाफार तुसडेपणा दिसला तो भारतातून सिंगापूरला स्थलांतरित झालेल्या नागरिकांमध्येच...

सिंगापूरमधील नागरिक एकमेकांशी भेटीदरम्यान- चर्चेदरम्यान नर्मविनोद, सुहास्य वदन आवर्जून करतात, पण दुसऱ्याची टर उडविणे, अपमान करणे, कमी लेखणे असले प्रकार त्यांच्या संस्कृतीत वा स्वभावात नाहीत. वेळ पाळणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे जसे कार्यक्रम वा आणखी कोणतेही उपक्रम भारतीय वेळेनुसार (लेटलतिफी) सुरू होतात, तसे प्रकार तिथे घडत नाहीत आणि इतरदेशीय प्रवाशांनाही वेळ पाळावीच लागते. ग्रुपला खासगी बसने इंगित स्थळी जाण्याची वेळ दिल्यावरही ती पाळली गेली नाही तर संबंधित व्यक्तींना सोडून बस पुढे निघून जाते. आमच्या ग्रुपमधील काही लोकांवर असा प्रसंग ओढवला. मग त्यांना टॅक्सी, बसने येऊन आम्हाला जॉइन व्हावे लागले. सिंगापूर आपल्याला प्रगतीविषयी आसक्ती, शिस्त, प्रामाणिकपणा, स्वच्छता, वेळेचे महत्त्व आणि हो, देशभक्तीही शिकविते. त्यांनी उण्यापुऱ्या 60 वर्षांत प्रगतीचा नवा मापदंड निर्माण केलाय. सांस्कृतिक वैविध्याला खुले आकाश उपलब्ध करुन देत देश अधिक समृद्ध केलाय. एकमेकांच्या धर्माविषयी आदरभाव राखत बंधुभावाच्या वागणुकीतून आदर्श उभा केलाय. तिथे काहीच अडचणी वा आव्हाने नाहीत, असे नाही. पण त्यांचा सामना करण्याची निधडी छाती त्यांच्याजवळ आहे. आपल्या भाषेत 56 इंचाची छाती आहे..!

आयुष्यात सिंगापूरला पुन्हा जाण्याची संधी मिळाली, तर निश्चितच सोडाविशी वाटणार नाही... तूर्तास इतकेच!

महत्त्वाचे : शब्द परिवार, मुंबई व या परिवाराचे सर्वेसर्वा संजय सिंगलवार, शशीताई डंभारे, त्यांचे सहकारी यांनी प्रवास व संमेलनाचे उत्कृष्ट आयोजन केले. या संमेलनाचे उद्घाटक, वरिष्ठ पत्रकार तथा मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे संपादक मनोज भोयर यांच्या प्रोत्साहनाने आणि पुढाकाराने माझा हा दौरा घडला. ॲड. सतीश बोरुलकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे सान्निध्य लाभले आणि प्रसिद्ध निवेदिका ज्योती भगत यांचे निवेदनातील सरसपण देशाबाहेरही अनुभवता आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संमेलनाध्यक्ष रजिया सुलताना यांचे अध्यक्षीय भाषण आणि मुलाखत थेट हृदयाला जाऊन भिडली... अनुभव, ज्ञान आणि आठवणींची गाठोडी घेऊन मी आपल्या गृहगावी परतलोय... 🙏🏻

प्रवीण धोपटे, वर्धा

9834564677

९९२२४४१०६३

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

Tags:    

Similar News