प्रवास; आभासी जगाकडून वास्तवाकडे..! भारत ते सिंगापूर; एक विलक्षण अनुभव

(शब्द नववे मराठी साहित्य संमेलन, सिंगापूर);

Update: 2025-01-26 11:03 GMT

(भाग - १)

जशी प्रजा, तसा राजा असे म्हणतात. आधुनिक काळात आपण जसा समाज वा नागरिक तसे राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी असे म्हणू शकतो. समाज जेव्हा आपली कर्तव्ये आणि क्रियाशिलता विसरतो तेव्हा तो परावलंबी बनतो. म्हणजे तो भावनिक, वैचारिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसतो. तो कितीही उच्चशिक्षित वा निर्धन असो त्याला हे बंध अर्थात comfirt झोन सोडणे असुरक्षित वाटते. भारत त्याचे उत्तम उदाहरण आहे.

दुसरीकडे माणसाच्या मन - मेंदूतील नवनिर्मितीची धग कायम राहिली की गृहयुद्ध अन् जाती - धर्मभेदाच्या भिंतीही गळून पडतात.अशावेळी आत्मप्रौढीचा वा न्यूनगंडाचा लवलेशही उरत नाही. प्रगतीची वाट महामार्ग होतो आणि निश्चयाचा दृढसंकल्प सिंगापूर...





भारतातील रेवडी वाटप, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, कटेंगे तो बटेंगे आणि त्याला विरोधाभासाचे दुसरे टोक अर्थात आत्मप्रौढीच्या अफूची गोळी देत आपण विश्वगुरू बनत असल्याचे आभासी जग निर्माण करणे... हे भ्रम आणि भ्रमणाच्या दरीतील अंतराचे वास्तवभान करून देण्यास पुरेसे आहे; पण अफूच्या गोळीची मात्रा कधीच शुद्धीवर अन् बुद्धीवर येऊं देत नाही...

सिंगापूर येथील भौतिक विकास डोळे दीपवून टाकणारा आणि मानवी सामर्थ्याच्या यशोगाथेचे परमोच्च टोक आहे हे येथे वावरताना पदोपदी जाणवते; पण या डोळस विकासामागील दृष्टी केवळ भौतिक विकासावर थांबत नाही. येथील सर्वांगीण मानवी प्रगती क्षणभरही नजरेआड करता येत नाही. प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त, प्रगतीचा ध्यास आणि देशाप्रती समर्पणाची भावना ही आत्मिक बलस्थाने भारतापुढे इवलासा असलेल्या या देशाला महान राष्ट्र म्हणून उभे करते. गुलाम राष्ट्र ते महान राष्ट्र असा हा प्रवास केवळ थक्क करीत नाही, तर तो आत्मचिंतनाच्या डोहातही घेऊन जातो...


गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापी महामानव आपल्याला लाभले आहेत. त्यांनी दुःखाच्या, अन्यायाच्या खाईत लोटलेल्या समाजाला समानता, अहिंसा, शांतता आणि मानवधर्माच्या मार्गावर येण्याचे आकाश मिळवून दिले. हे आकाश आम्ही आता भ्रमाच्या विश्वाने व्यापून टाकले आहे. हा भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी शक्य तितकी भ्रमंती करणे हा एक उत्तम उपाय आहे.

सिंगापूर हा आकारमानाने आणि लोकसंख्येने आपल्या नागपूर जिल्ह्यापेक्षा छोटा देश. उणीपुरी 60 लाख लोकसंख्या. बुद्धीस्ट, मलाई, ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू हे संप्रदाय येथे प्रामुख्याने आहेत. पण येथे देश आधी आणि व्यक्तिगत धर्म नंतर आहे. धर्म आणि जातीनुसार येथे माणसाची ओळख आणि अस्तित्व अवलंबून नाही हे महत्त्वाचे. पराकोटीची स्वच्छता आणि प्रामाणिकपणा त्यांच्या रक्तात भिनला आहे. सार्वजनिक ठिकाण असो, हॉटेल्स असो की निवासस्थाने... तिथे अस्वच्छतेचा कणही सापडणार नाही. ते इतरांची (प्रवासी) अस्वच्छता आणि अप्रामाणिकपणा कदापी खपवून घेत नाहीत. कायदे, नियम - अटी कठोर आहेत, पण पाच दिवसांच्या सिंगापूर प्रवासात कुठेच पोलिस आढळले नाहीत. स्वयंशिस्त पाळणे आणि इतरांना पाळायला लावणे हा त्यांचा शिरस्ता आहे. या देशात केवळ एकच पुतळा आहे तो म्हणजे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर रॅफेल यांचा. प्रगतीचे धडे गिरवायला लावणाऱ्या रॅफेलविषयी हा देश कृतज्ञ आहे. येथे आपल्या परिभाषेतील गरीब कुणीच नाहीत. येथील राहणीमान अतिशय पुढारलेले आणि प्रगतिशील आहे. कमी जागेमुळे उंच उंच इमारती आहेत, पण त्यांची रचना डोळे दीपवून टाकणारी आहे. वाहतूक व्यवस्था स्वयंशिस्तीचे इतर प्रगत राष्ट्रांनाही धडे देणारी आहे. खाद्यपदार्थ दर्जेदार आणि स्वच्छ आहेत. येथे अनेक भारतीय हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही आहेत, पण ती सिंगापूरच्या रंगात रंगून गेली आहेत.


हॉटेल्समधील रूम्स लहान आहेत, पण सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा. आपण भारतीय नियम तोडण्यात हातखंडा बाळगून आहोत, पण तेथील व्यवस्था तुमचा हा स्वैरपणा क्षणभरही खपवून घेत नाही. स्पष्टपणे सुनावणे आणि तंबीचे पत्रही देण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. तिथे तेथील प्रमुख भाषांतील शाळा - महाविद्यालये आहेत, जी शिक्षणाविषयी गंभीर आहेत. हिंदू मंदिरांसह विविध प्रार्थनास्थळे आहेत, जी तुम्हाला आंतरिक शांतता आणि आत्मिक समाधान देतात. कुठेच वाद - विवादाचे प्रसंग ओढवत नाहीत किंवा कुणी कधी त्या मूडमध्ये राहत नाही. अतिशय स्मूथ, आल्हाददायक आणि आनंददायी जगण्याला ते अधिक महत्त्व देतात. आपल्या अधिकरांपेक्षा आपली कर्तव्ये काय, याविषयी ते अधिक सजग आहेत. कुठेच धर्माची बांग नाही, कुठेच जातीचा अहंभाव वा न्यूनगंड नाही. त्यांची संस्कृती वा इतिहास बहुआयामी वा प्राचीन नाही. साहित्यातही मैलाचे दगड नाहीत. पण इतिहासाचा दाखला देत स्वतःला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यांना इतिहास घडविण्यात आणि वर्तमानासह भविष्य सुरक्षित करण्यात अधिक रस आहे. अवघ्या सहा दशकांत त्यांनी स्वतःसह देशाचाही कायापालट केला. पण त्याविषयी अहंगंड बाळगत नाहीत...

आपल्या देशाला गौरवशाली इतिहास, महापुरुषांची दीर्घ परंपरा आणि संत - महात्म्यांचा वारसा लाभला आहे. विविध संस्कृतींचा मिलाफ आणि वैविध्याने आपला देश परिपूर्ण आहे. ऐतिहासिक वारसा, निसर्ग सौंदर्य, प्राचीन- अर्वाचीन सभ्यतेच्या खाणाखुणा पदोपदी जाणवतात... पण आम्ही ही धरोहर सांभाळून ठेवू शकलो नाही. इतिहासाचे दाखले उगाळत त्यातच आपले कथित मोठेपण गोंजरणे, वर्तमानात भावनिक - धार्मिक ध्रुवीकरणाची साद घालणे आणि भविष्याविषयी रंगविलेले आभासी जग हे आमचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. आम्ही जगणे सोपे करण्याऐवजी जीवनमार्गाच्या प्रवासात असंख्य अडथळे स्वतःच निर्माण करून त्याभोवती स्वतःला करकचून बांधून घेतले आहे. हे पाश काळानुरूप सैल होण्याऐवजी अधिकाधिक घट्ट झाले आहेत. समाज आणि राज्यव्यवस्थाही त्याच दिशेने प्रयत्नपूर्वक देशाला ढकलत आहे. आम्ही लोकसंख्येत चीनला मागे टाकून जगात क्रमांक एकवर आलोत, म्हणून विश्वगुरू बनण्याच्या वल्गना करण्याचा आम्हाला अधिकार प्राप्त झालाय, असे होत नाही. आपल्या विविध सरकारांनी धार्मिक स्थळांना निःशुल्क भेटीचा सपाटा लावला आहे, पण, त्यांनी शक्य तितक्या भारतीय नागरिकांना सवलतीत परदेश भ्रमणाची संधी उपलब्ध करून दिल्यास आपले अवकाश विस्तारेल आणि दृष्टीही...तूर्तास इतकेच !!!


प्रवीण धोपटे, वर्धा

9834564677

९९२२४४१०६३

ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

Tags:    

Similar News