इसोफ्यागस (Esophagus ) ही तोंड व जठर यांना जोडणारी अन्न नलिका असून साधारण पणे २५ से.मी. इतकी लांबी असते. ती शरीरातील गळा,छाती व पोट अशा वेगवेगळ्या भागात असल्या कारणाने, तसेच तिच्या आजूबाजूला हृदय, रक्तवाहिन्या, व फुफुसासारखे अत्यंत महत्वाचे अवयव असल्या कारणाने उपचारासाठी अधिक जोखमीचे ठरते. इसोफ्यागस कॅन्सरचे आणखी विशिष्ट म्हणजे दोन वेगवेगळी पाथोलोजी स्क़्यमस (squamous) व अडीनो कार्सिनोमा (adenocarinoma) असू शकते.
2012, ग्लोबोकोनच्या सर्वेनुसार भारतात ४२ हजार इसोफ्यागस कॅन्सरच्या रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये २७ हजार पुरुष तर १५ हजार स्त्रिया आहेत. केवळ १५ टक्के रुग्णांमध्ये कॅन्सर पूर्ण पणे बरा होतो याचे मुख्य कारण रोगाचे निदान उशिरा होते.
इसोफ्यागस कॅन्सर होण्याची काय कारणे आहेत ?
इसोफ्यागस कॅन्सरच्या १० पैकी ८ रुग्णांमध्ये तंबाखू तथा तत्सम पदार्थ खाण्याच्या सवयी आढळतात. तंबाखू आणि मद्यपान दोन्ही सोबत घेतल्यास या कॅन्सर चे प्रमाण १० टक्क्यांनी अधिक वाढते. दिवसाला ३० ग्राम तंबाखू खात असल्यास व १०० ग्राम पेक्षा जास्त मद्यपान करीत असल्यास या कॅन्सरचे प्रमाण वाढते. पिकल, प्रोसेस केलेले अन्न, चरबी युक्त मास व nitrate असणारे अन्न पदार्थ वर्ज्य करावे. एखादयाला इसोफ्यागस रीफ्ल्क्स चा आजार असल्यास किंवा प्लंबर विल्सन रोग असल्यास इसोफ्यागस कॅन्सर होऊ शकतो.
साधारणपणे इसोफ्यागस कॅन्सर चाळीस वर्षे नंतर जे तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान किंवा दोन्ही करणाऱ्यामध्ये उदभवणारा आजार आहे.
इसोफ्यागस कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-
- अन्न गिळता न येणे
- अन्न गिळताना त्रास होणे
- वजन कमी होणे
- थुंकीत रक्त जाणे
- मानेला गाठी येणे
- छातीत दुखणे
- खोकला येणे
४० वर्षे पेक्षा जास्त वयाची व्यक्ती, अन्न गिळता येत नाही ( सुरुवातीला जाड अन्न न जाणे व कालांतराने पाणी देखील पिता न जाणे ) व अश्यात वजन कमी झाले आहे अशी तक्रार करीत असल्यास इसोफ्यागस कॅन्सर ची शक्यता गृहीत धरुन त्यांची ताबडतोब तपासणी करणे गरजेचे असते.
तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, बेरीअम स्व्यालो व शक्य असल्यास सी. टी. स्कॅन करावा. खरोखरीच कॅन्सर आहे की नाही व तो किती पसरलेला आहे हे पाहण्यासाठी दुर्बिणीतून (OGD scopy) तपास करून गरज वटल्यास तुकडा काढावा.
इसोफ्यागस कॅन्सरचे उपचार कसे करावे?
इसोफ्यागस कॅन्सर चे निदान नंतरच्या टप्प्यामध्ये होते आणि याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे रुग्णांकडून तसेच डॉक्टर कडून दुर्लक्ष होणे. आपल्याला गिळायला त्रास आहे हे रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही किंवा बऱ्याच वेळा रुग्णाने सांगितले तरी डॉक्टर त्याला जास्त महत्व देत नाहीत. त्यामुळे रोग पूर्ण पणे बरा होण्याचे प्रमाण कमी असून केवळ १५ ते २० टक्केच रुग्ण ५ वर्षापेक्षा जास्त जगू शकतात. त्यासाठी रोग सुरुवातीच्या टप्प्यात माहिती होणे गरजेचे असते.
इसोफ्यागस कॅन्सर च्या विविधतेमुळे उपचारसाठी इसोफ्यागसचे तीन भागात विभाजन केले जाते. गळयामध्ये व छातीच्या वरच्या भागाला अप्पर इसोफ्यागस ( दाता पासून १५ ते २४ से मी ), छातीच्या मध्ये मिड इसोफ्यागस (दाता पासून २४ ते ३२ से मी), छातीच्या खालचा व पोटाच्या वरचा भागाला लोवर इसोफ्यागस (दाता पासून ३२ ते ४० से मी). अप्पर व मिड इसोफ्यागसमध्ये बऱ्याच वेळा स्क़्यमस (squamous) तर लोवर इसोफ्यागस मध्ये अडीनो कार्सिनोमा (adenocarinoma) पाथोलोजी असते.
अप्पर व मिड इसोफ्यागस कॅन्सर चे उपचार:
शरीरात इसोफ्यागसच्या ठेवणीतील विविधतेमुळे तसेच आजूबाजूच्या हृदय, रक्तवाहिन्या, व फुफुसासारखे अत्यंत महत्वाच्या अवयावामुळे मुख्यतः शस्त्रक्रिया करता येत नाही त्यामुळे रेडीओथेरपी व सोबत किमोथेरपीचे उपचार केले जातात.
रेडीओथेरपीमध्ये जास्तीत जास्त रेडीएशन रोगास व कमीत कमी रेडीएशन बाजूंच्या महत्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्यासाठी किमान ३डी- सी. आर. टी किंवा आय एम.आर.टी. उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे दीड महिन्यापर्यंत दिली जाते. रेडीओथेरपीचा असर वाढवा म्हणून सोबत दर आठवड्याला किमोथेरपीचे उपचार केले जातात. रोग जास्त प्रमाणात असल्यास काही वेळा किमोथेरपीचे उपचार देऊन रोग कमी केला जातो व नंतर रेडीओथेरपीचे उपचार केले जातात.
लोवर इसोफ्यागस कॅन्सर चे उपचार
रोग पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात असल्यास शक्य असल्यास सर्व रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून मुख्या रोग तसेच बाजूच्या गाठी काढणे गरजेचे असते. काढलेला रोग पाथोलोजी कडे पाठवून त्या रिपोर्ट नुसार रुग्णाला पुढे रेडीओथेरपी/ किमोथेरपी उपचारांची गरज आहे की नाही ते ठरवले जाते. काही वेळा रोगाची मात्रा जास्त असल्यास किमोथेरपी उपचार करून मग शस्त्रक्रिया केली जाते.
उपचारादरम्यान काय काळजी घ्याल?
काही गोष्टी इथे प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे
१. अन्न नलिका बंद झाल्यामुळे रुग्णाला जेवता येत नाही
२. वजन कमी झालेले असते
३. रेडीओथेरपी दरम्यान तोंडाला छाले येणे, गिळताना त्रास होणे, थुंकी येणे, तोंड कोरडे पडणे, चव बदलणे, इत्यादी त्रास होतात
४. केमोथेरपी मुळे उलटी होणे, भूक न लागणे इत्यादी त्रास वाढतो.
वरील बाबी व दिर्घ काळ चालणारे रेडीओथेरपी /किमोथेरपी उपचार यामुळे खाण्या पिण्याच्या सवयीमध्ये फरक पडू शकतो आणि प्रकृती आणखीनच खालावते. हे सर्व त्रास टाळण्यासाठी तोंडाची निगा राखणे, गुळण्या करणे तसेच पौष्टिक अन्न घेणे गरजेचे असते. रेडीओथेरपी /किमोथेरपी उपचार सुरु करण्या अगोदर अन्न घेण्यसाठी नाकातून किंवा पोटात नळी टाकून घ्यावी.
या सर्व त्रासातून मुक्ती हवी असेल तर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे तसेच मद्यपान करणे बंद करावे.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई
docnik128@yahoo.com