जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याची घटना गंभीर, खासदार राजेंद्र गावितांनी व्यक्त केली खंत

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. त्यावरून राजेंद्र गावित यांनी चिंता व्यक्त केली.

Update: 2022-08-19 16:23 GMT

एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना दुसरीकडे एका गरोदर मातेला वेळेत उपचार न मिळाल्याने दोन जुळ्या बालकांना प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. खासदार राजेंद्र गावित यांनी या घटनेचा खेद व्यक्त करत शुक्रवारी 19 तारखेला पीडित कुटूंबाला घटनास्थळी भेट देऊन सांत्वन केले.

मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडीला रस्ता नसल्याने, वंदना यशवंत बुधर या सात महिन्याच्या गरोदर मातेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. यावेळी कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला. आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली. तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिलेची घरातच प्रसूती झाली. त्यात जुळ्या बालकांना जन्मही दिला. मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते. त्यानंतर रुग्णालयात पोहचल्यानंतर तात्काळ दाखल करणे आवश्यक होते. मात्र तेथेही उशीर झाला. त्यामुळे काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला.

दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती. तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले तेथून तिला एमबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याने मर्कटवाडीच्या रस्त्याचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला. याची खासदार गावितांनी गंभीरतेने दखल घेऊन जव्हार मोखाड्यातील अधिकारी सह लोकप्रतिनिधींची दिनांक 19 तारखेला खोडाळा येथे आढावा बैठक घेऊन जव्हार मोखाड्यातील संपर्क तुटणाऱ्या गावपाड्यांचा रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधकाम विभागाने तात्काळ आराखडा तयार करून पुढील प्रक्रिया करावी, अशी मागणी केली. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्याबाबतही खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच आदिवासींच्या समस्यांबाबत कोणत्याही प्रकारची आडकाठी आणू नये असं अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजावेत अशा सूचना दिल्या.

यावेळी आयुषी शिंग प्रांत अधिकारी मनोहर जाधव, वीज कार्यकारी अभियंता झेडपी सदस्य प्रकाश निकम, कुसुम झोले, संतोष चोथे, जिल्हा मिलिंद झोले, भाजपा उपाध्यक्ष भाजपा अमोल पाटील त्यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभाग, वन विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, कृषी विभाग, वीज महामंडळ अश्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर खासदारांकडे विविध समस्यांचे गाऱ्हाने मांडण्यासाठी गावपाड्यातुन आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:    

Similar News