आज मुंबईतील "शिवतीर्थ" या मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित केलं या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
१) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया..
२) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा. बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं मी पिणार नाही सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. आपल्या देशातील नद्यांची जी अवस्था आहे जिला आपण माता म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं काय लक्ष आहे त्यावर मी बोललो. स्व. राजीव गांधींनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं, पुढे २०१४ ला मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पण गंगा साफ करण्याचा प्रकल्प हाती घेतला. कुंभमेळ्यानंतर ज्यांनी तिकडे जाऊन स्नान केलं त्यातले लाखो लोक आजारी पडले. प्रश्न कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये तर गंगा स्वच्छतेचा आहे. ज्यागंगेला आपण माता म्हणतो तिची आजची परिस्थिती काय आहे हे दाखवणारी एक चित्रफीत मी आणली आहे... गंगा शुद्धीकरणावर ३३ हजार कोटी खर्च झालेत. तिकडे घाटावर मृत व्यक्तीला अग्नी दिल्यासारखं करतात आणि नंतर पाण्यात ढकलतात. हा कोणता धर्म ? आपल्या नैसर्गिक गोष्टींच्या आड जर धर्म येणार असेल तर काय उपयोग ? हजार वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता तीच परिस्थिती कशी चालेल ? आपण निसर्गासाठी काही सुधारणा करणार आहोत की नाही ? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करतोय. प्रत्येकाला धर्म प्रिय असतो पण त्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजेत.
३) महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे. सावित्री नदी केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे प्रदूषित आहेत.
४) प्रदूषणाच्या मानकांनुसार (स्टँडर्ड्स नुसार ) उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुछकुंडा, घोड, तितुर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर आणि ढोरणा या नद्यांच्या पात्रांमधील पाणी हे अति वाईट आहे.
भातसा, पेढी, मोर, बुराई, वेल,पांझरा, सिना, काळू, वेण्णा, कोयना, मांजरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी व कान या नद्यांच्या पात्रांचे पाणी वाईट या कॅटेगरीत म्हणजे तुलनेने कमी वाईट आहे.
५) मुंबईत ५ नद्या होत्या. त्यातल्या चार मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यांनी मारल्या. मिठी नदी पण मरायला टेकली आहे. मुंबईतील एकमेव राहिलेली नदी मिठी तिची काय अवस्था आहे ते बघा... दरवर्षी मुंबई महापालिका मिठी नदी साफ करणार असं म्हणते, जोपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला असलेली घरं हटवत नाही, तोपर्यंत मिठी नदी स्वच्छ होणार नाही. निसर्गाच्या हानीबद्दल कोणी बोललं की आपण म्हणणार धर्माच्या आड येतो. धर्माचं मला सांगूच नका. आपण भिंतीवर झाडं जगवा झाडं लावा असे संदेश लावतो. आणि देशातील हिंदूंचे अंतिम संस्कार लाकडांवर होतात. लाकडं कुठून येतात, जंगलं तोडूनच ना ? विद्युतदाहिन्या आल्या आहेत पण तरीही अनेक लोकं विद्युतदाहिनी नाकारतात. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. आत्ता ते मध्ये अंबानींच्या वंताराला गेले. म्हणजे त्यांना प्राण्यांची आवड आहे. मग जंगलं त्यांनी वाचवली पाहिजेत.
६) भारताचा जन्म-मृत्यूचा आकडा हा
दररोज ८१ हजार ७४६ जन्म होतात
दररोज २९ हजार ६७९ मृत्यू होतात.
दररोज पन्नास हजाराने लोकसंख्या वाढत आहे
७) महिन्याला २४ लाख ५२ हजार ३८० जन्म होतात
महिन्याला ८ लाख नव्वद हजार ३७० मृत्यू होतात
महिन्याला १५ लाख लोकांची वाढ होते.
८) वर्षाला २ कोटी ९४ लाख २८ हजार ५६० जन्म होतात, वर्षाला १ कोटी ६ लाख ८४ हजार ४४० मृत्यू होतात म्हणून दर वर्षी १ कोटी ८० लाखाने लोकसंख्या वाढते. एका बाजूला आपण दुष्काळाने त्रस्त आहोत म्हणून बोंबलत बसायचं आणि दुसरीकडे जंगलं तोडायची.
९) आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे.
१०) छत्रपती शिवाजी महाराज हा विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय स्थिती होती ? शहाजी राजे पण आधी आदिलशाहीत होते मग पुढे निजामशाहीत गेले. महाराजांचा लढा या सर्वांच्या विरोधात होता. त्यांना तुम्ही जातीत का पाहता ? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता आणि महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती ? आग्र्याच्या दरबारात संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय ? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं ते महाराजांनी केलं. मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला तेही हिंदू होते ना ?
औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही.
११) औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला.
१२) मरहट्ट्यानी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते... शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला... माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात.
१३) महाराष्ट्रात एअरपोर्ट असेल की बंदर असेल सगळं अदानीला देणं सुरु आहे. अदानी हुशार आहे आणि आपण अडाणी निघालो.
१४) लाडकी बहीण योजनेचं काय चाललं आहे? विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंजेबावर... तुमच्या प्रश्नावर नाही.
१५) आपण ज्यांना मुघल म्हणतो ते तुर्की -मंगोल आहेत. धर्माच्या आधारावर देश नाही उभं करता येत. हे समजलं टर्कीला. केमाल पाशा तिकडे आला. तिकडे इस्लाम आता मवाळ आहे. तिकडे मशिदी आहेत पण रस्त्यावर धर्म दिसत नाही. केमाल पाशानी ओट्टोमन खलिफाचे पद संपुष्टात आणले, जे इस्लामिक जगताचे धार्मिक नेतृत्व मानले जात होते.
१६) तुर्कीच्या राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले. इस्लामला राज्य धर्माचा असलेला दर्जा काढून टाकला. सध्याच्या टर्कीच्या अध्यक्षांनी पण मवाळ धर्म स्वीकारला. आज टर्कीला पर्यटनासाठी ५ कोटी लोक भेट देतात. विचार करा किती सुंदर देश बनवला असेल.
१७) आम्ही मशिदींवरचे लाऊडस्पिकर बंद करा म्हणून आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की रात्री १० ते सकाळी ६ लाऊड स्पीकर लावता येणार नाही. अहो प्रश्न सकाळी ६ ते १० चा नाहीच, दिवसभर भोंगे वाजतात त्याचं काय ? योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये मात्र मशिदींवरचे भोंगे उखडून टाकले. त्यांना जमतं मग आम्हाला का नाही जमत ?
१८) बीडमध्ये संतोष देशमुख यांना क्रौर्याने मारलं. जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून. राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. संतोष देशमुखांना वाल्मिक कराड यांच्या लोकांनी खंडणी आणि पैशाच्या विषयातून मारलं. मग त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी निघू शकते ?
१९) आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाहीये. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली ? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही ३० तारखेच्या आत पैसे भरून टाका.
२०) लाडकी बहीण योजना सरकार चालवू शकत नाही. सरकारला दरवर्षी ६० हजार कोटींचा या योजनेचा बोजा आहे. सरकारला या योजना परवडणार नाहीत.
२१) आज तरुण-तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये, त्यांना सगळ्यांना जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोकी फोडायला लावत आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे.
२२) टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देतो म्हणून आमिषं दाखवून लुटून गेली. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा.
२३) ( आज मी माझ्या आजोबांच्या उठ मराठ्या उठ या १९६६ सालातील पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे. तो काळजीपूर्वक ऐका...
"आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे -
गलबला बुद्धी नासते । नाना निश्चय सांगती ।
ऐकावे कोणकोणाचे । बोलताहे बहुचकी ।
करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।।
असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालिस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मऱ्हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्ता स्पर्धेच्या, शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत."
प्रबोधनकार ठाकरे । )
२४) तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या..
२५) आपला एक अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक प्रमोद अरणे हा कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन आजच्या मेळाव्याला चालत आला आहे. अशा सैनिकांमुळे मला ऊर्जा मिळते.
#गुढीपाडवामेळावा२०२५