Indrajeet Sawant Vs Prashant Koratkar : सावंत Vs कोरटकर प्रकरणात असीम सरोदेंनी राईट टू प्रायव्हसीची भीती
पोलिसांनी सावंत यांचा मोबाईल फोन जरुर ताब्यात घ्यावा. त्यातून इंद्रजित सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डिंग बाबात शहानिशा करावी, अशी मागणीही ॲड. असीम सरोदे यांनी केलीय.;
पुणे : इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत आणि नागपूर स्थित प्रशांत कोरटकर यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय. कोरटकर यांनी सावंत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. इंद्रजित सावंत यांच्याविरोधात कुठलीही केस दाखल झाली तर ती लढण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक वकील तयार असल्याचं ॲड. असीम सरोदे यांनी सांगितलं...
इंद्रजित सावंत यांच्याशी यासंदर्भात बोलणं झाल्यानंतर ॲड. सरोदे यांनी ही माहिती दिलीय. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत उद्धट व बदनामीकारक वक्तव्य करणारा फोन आला होता. तो इंद्रजित सावंत यांचा मोबाईल फोन पोलीस तपासासाठी जप्त करणार आहेत. पोलिसांनी सावंत यांचा मोबाईल फोन जरुर ताब्यात घ्यावा. त्यातून इंद्रजित सावंत आणि प्रशांत कोरटकर यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डिंग बाबात शहानिशा करावी, अशी मागणीही ॲड. असीम सरोदे यांनी केलीय.
सावंत यांच्या मोबाईलवरील इतरही माहिती पोलिसांनी बघावी. कारण त्यात काहीही बेकायदेशीर नसल्यानं तसा फरक पडत नाही. पण इंद्रजित सावंत यांचे त्या मोबाईल मधील इतर व्यक्तिगत कौटुंबिक फोटो, संवाद पोलिसांकडून लीक होणार नाही, याची जबाबदारी पोलिसांची आहे. इंद्रजित सावंत यांच्या खाजगी जीवन जगण्याच्या हक्कांचे (राईट टु प्रायव्हसी) चे उल्लंघन होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यात पोलिसांनी कसूर केली आणि इंद्रजित सावंत यांच्या राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन झाल्यास आम्ही त्यांच्यातर्फे कायदेशीर मार्ग वापरू. प्रशांत कोरटकर यांचे सगळे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत का हे सुद्धा पोलिसांनी सांगावे, असेही ॲड. सरोदे म्हणाले.
तसेच इंद्रजित सावंत यांनी कोरटकर यांच्या आवाजाची शहनिशा न करता नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांच्यावर आरोप केला असा दावा करून हे प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असे जाहीरपणे म्हणाले आहेत. हे बघायला महाराष्ट्र उत्सुक आहे की कशाच्या आधारे प्रशांत कोरटकर इंद्रजित सावंत यांच्यावर अब्रुनुकसानीची केस करतात. आणि इंद्रजित सावंत यांच्यावर कोणतीही केस दाखल झाल्यास मी त्यांना सगळी कायदेशीर मदत करणार आहे. माझ्यासहीत महाराष्ट्रातील अनेक वकील इंद्रजित सावंत यांच्या बरोबर असल्याचं ॲड. सरोदे म्हणाले.