प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी
राजीनामा घेण्यासाठी इतका जीव टांगणीला लावणारी ही व्यवस्था सहआरोपी करण्यासाठी काय करायला लावील...आणि ते करायला उतरणार तरी कोण आहे संतोष....?;
तुमचे ते फोटो काल सगळीकडे दाखवले जाताना बघण्याची हिम्मतच झाली नाही...बघण्याची आमची हिंमत नाही,तुम्ही ते कसे सहन केले असेल ? ती नुसती वर्णनेच मनात भीतीची वादळे आणतात...थरकाप होतो.
आणि बघून तरी मी काय करू ? माझी हतबल भेकड अगतिक अवस्था मलाच लज्जित करते संतोष....असे ठिकठिकाणी घडताना आपण जिवंत आहोत आणि तितकेच असहाय आहोत याने जास्त त्रास होतो...त्यापेक्षा ते बघूच नये असे वाटते. ते अज्ञान एक बनचुकी क्षुद्र सुरक्षितता देते...
केवळ कल्पनेनेच बघुन त्यातील क्रौर्य अनुभवले..क्षणभर त्या जागी स्वतःला ठेवून भयचकित झालो. मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येताना आणि जीवाची काहीली होताना...सहन होत नसताना पाईप तुटेपर्यंत होणारी मारहाण...मृत्यूच सुटका करील यातून अशी अगतिक मन:स्थिती आणि अखेरच्या क्षणी बायको मुलांचे डोळे समोर येताना डोळ्यात अश्रू येताना समोर निर्लज्ज हसणारे हैवान...आणि शेवटी लायटर ने डोळे जाळल्यावर फक्त अंधार...जगण्याचा आणि मरण्याचाही...
काल वन्यजीव दिन झाला आणि या दिनाचे औचित्य साधून तुमच्या भीषण, अमानुष, क्रूर हत्येचे फोटो राजीनाम्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी व्हायरल करण्यात आले..माणसातील वन्य प्राणी यामुळे बघता आले.. वन्य प्राणीसुध्दा आपल्या जातीच्या प्राण्याला मारत नाहीत..आणि ही माणसातील जनावरे...आणि या जनावरांना लपायला जागा करणारी ही सत्तेची जंगले आणि ठेकेदारीच्या चकवा देणाऱ्या अंधाऱ्या गुहा...
त्या गुहांमध्ये ही श्वापदे लपून बसली...माध्यमांच्या प्रकाश वाहिन्यांनी त्या अंधाराला भगदाड पडले नाही...
ओरडाणारा विरोधी आवाज शब्दशः अरण्यरुदन ठरला...
तुमच्या कुटुंबियांच्या अश्रूंनी त्या सत्तेच्या गडद जंगलात ओरखडा ही उमटला नाही..गुहेच्या त्या पाषाणहृदयी दगडांना तुमच्या मुलीच्या केविलवाण्या टाहोने पाझर फुटला नाही..
संतोष तुमचा मृत्यू आमचा महाराष्ट्राचा बुरखा फाडणारा आहे..त्या मृत्यूने किमान लाज ही इथल्या राजकीय व्यवस्थेला वाटली नाही. दगडांच्या देशा हे महाराष्ट्राचे वर्णन आमच्या पाषाणहृदयी,कोडगेपणाला उद्देशून म्हटले
आहे का ? असा प्रश्न आमचा एकूण राजकीय व्यवहार बघून वाटते.
जनतेचा आक्रोश सत्तेचा माज कसा लाथाडतो , कसा टोलवाटोलवी करतो..सांडलेले लाल रक्त, लाल दिव्याला
किंचितही विचलित करत नाही...या महाराष्ट्राने खैरलांजी चे भोतमांगे कुटुंबाचे आक्रोश असेच जिरवले आहेत. न्याय मागून भय्या भोतमांगे अखेर तसेच गेले..असाच नितीन आगे मारला गेला...भटक्यांच्या पालावर , पारधी बेडावरअसेच मृत्यू...
आवाज उमटत जातो..सन्नाटा होत जातो.त्या मालिकेत तुमचा मृत्यू.... विषण्ण करणारा.
लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा हा की कोणत्याही विषयावर ओरडता येते आणि तोटा हा की त्या ओरडण्याचा काहीही उपयोग होत नाही....
मंत्री पंकजाताई मुंडे यांचा व्हिडिओ फिरला. त्या म्हणतात की ' 'धनंजय मुंडे यांचे पान ही ज्यांच्या शिवाय हलत नाही ते वाल्मीक कराड '...आणि समोरची गर्दी टाळ्यांचा कडकडाट करते...इतका मोठा पुरावा जनतेच्या न्यायालयात बहिणीने दिल्यावर खरे तर त्या व्यक्तीला सह आरोपी करायला हवे पण केवळ फक्त राजीनामा..?
त्या क्रौर्य आणि उलट्या काळजाच्या आरोपीला जो व्यक्ती पाठीशी घालतो त्याला शिक्षा फक्त मंत्री कार्यालयात न येणे इतकेच ? पण त्यासाठी तुमच्या भावाला दुःख विसरून मरण्याची धमकी द्यावी लागते ?
बीड जिल्ह्याची धर्मसत्ता, तिथली जातसंस्था,राज्याची राजसत्ता यांच्या मागे उभे राहते. ज्याच्या मांडीला मांडी लावून आपण बसतो त्याबद्दल इतर मंत्रिमंडळ सदस्यांना काहीच वाटत नाही आणि शेवटी अधिवेशन सुरळीत चालावे, तिथे कोंडी होऊ नये म्हणून साळसूदपणे राजीनामा घेतला जातो... म्हणजे केवळ सोय म्हणून.
राजीनाम्याची पार्श्वभूमी म्हणून फोटो व्हायरल केले जातात हे हत्येइतकेच क्रूर आहे..केवळ राजीनामा देण्याचा दबाव निर्माण होण्यासाठी पार्श्वभूमी म्हणून हे फोटो वापरले गेले...?
यावरून सत्तेचे हे ठेकेदार किती गणिती आणि खेळी खेळण्यात रमले आहेत ? संवेदना नावाची गोष्ट किती कोसो दूर आहे...?
सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी सामान्य माणसांना आदर्श घालून द्यायचा असतो..तिथे एक माणूस दोन लग्न करतो,त्याची बेशरम कबुली नाईलाजाने देतो.
ती पत्नी गावात आल्यावर तिच्यावर इतर महिला पाठवून बायकोवर अट्रोसिटी लावतो. स्वत:च्या बायकोला १४ दिवस तुरुंगात पाठवतो आणि त्याच्याही पुढे जाऊन गावागावात असे क्रूरकर्मे पाठीशी घालतो...आणि असा माणूस तुरुंगात टाकणे दूरच पण केवळ राजीनामा घेण्यासाठी ८४ दिवस संपूर्ण मीडिया, सोशल मीडिया आमदार विरोधी पक्ष टोकाला जातो तेव्हा फक्त पदावरून दूर केले जाते..शिक्षा तर दूरच...काल अंजली दमानिया यांचे अश्रू या हतबल संघर्षाचे प्रतीक होते...अंजली दमानिया यांचे अश्रू कोणीच या उजळमाथ्याने वावरणाऱ्या गुन्हेगार रक्षक व्यक्तीला हात लावू शकत नाही ही हतबलता सांगत होते...ती अगतिकता आज गावागावात लोक अनुभवत आहेत...
हे प्रकरण माध्यमांनी लावून धरले म्हणून अन्यथा असेच दडपले गेले असते..हे बघून वाटते की तुमचे खरेच चुकले संतोष. उगाच जीव पणाला लावला. त्या दोन कोटी खंडणी त वाटा मागायला हवा होता. जीव वाचला असता आणि त्या पैशावर राजकारण करायला हवे होते. तिथल्या पुढच्या अनेक निवडणुकीचा निधी वाल्मीक आणि मुंडेंनी मिळवून दिला असता..असल्या उलट्या काळजाच्या राजकारणात का जीव पणाला लावला तुम्ही....
राजीनामा घेण्यासाठी इतका जीव टांगणीला लावणारी ही व्यवस्था सहआरोपी करण्यासाठी काय करायला लावील...आणि ते करायला उतरणार तरी कोण आहे संतोष....?
हेरंब कुलकर्णी