चहा विकून पोराला अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिलेल्या बीडच्या ध्येयवेड्या बापाच्या जिद्दीची कहाणी वाचा हरिदास तावरे यांच्या विशेष रिपोर्टमध्ये.....
“मी केलेले कष्ट पोराच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याला अधिकारी बनवण्याचे स्वप्न पाहिलं. चहाची भांडी घासून चहा विकून जमा केलेले पै पै त्याच्या शिक्षणासाठी लावले. माझ्या पत्नीने शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावला. आज मला समजलं माझा दिपक अधिकारी झाला. चहा विकून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण मी चहा विकून आज अधिकाऱ्याचा बाप झालोय ”
गॅसवर उकळलेला चहा खाली उतरवून घेत ओळीत ठेवलेल्या कपात ओतत बीडचे अशोक कांबळे हे अभिमानाने सांगतात. त्यांचा मुलगा दिपक अठराव्या वर्षापासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत होता. पण प्रत्येक वेळी अपयश येत होतं. मुलाच्या अपयशाने खचून न जाता त्याला पुन्हा अभ्यास करण्यासाठी अशोक यांनी प्रेरित केले. त्याची आई देखील घरी शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. बापाचे स्वप्न साकार करण्यासाठी दिपकने पडेल ते काम केले अहोरात्र अभ्यास केला. अनेकदा अपयश आले परंतु खचून न जाता पुन्हा ध्येयाचे दिशेने वाटचाल करत राहिला...
दिपकचा मित्र असलेला रवी जाधव सांगतो “ पैशांची चणचण भासल्यावर दिपकने रंगकाम केले, मिळेल ते काम केले पण अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न केला आज त्याच्या आणि कुटुंबाच्या कष्टाचे चीज झाले आहे.
आलेल्या परिस्थितीसमोर हतबल न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपक आज महानगर पालिकेत अधिकारी झाला आहे. परिस्थितीशी दोन हात करत त्याने मिळवलेले यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे....