EXLCUSIVE : संजय राठोड अजूनही मंत्रीपदी,राजीनामा मुख्यमंत्र्यांकडेच पडून
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना दबावामुळे घ्यावा लागला. पण आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी अद्याप पाठवलेलाच नाही अशी माहिती राज्यपालांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. याचाच अर्थ पूजा चव्हाण प्रकऱणावरुन निर्माण झालेल्या तणावावर ही मलमपट्टी आहे का? आजही संजय राठोड टेक्निकली मंत्री आहेत. अशाप्रकारे राजीनामा घेऊन स्वत:कडे राजीनामा ठेवणे फ्लोअर मॅनजमेंटचा भाग आहे का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेतील आपल्या भाषणात राठोड यांचा राजीनामा पाठवला गेला नाही असा उल्लेख केला होता. त्यामुळे अधिवेशनात वेळ मारुन नेण्यासाठी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा देखावा करण्यात आला का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे गेला नसल्याने त्यांना मंत्री असण्याचे सर्व फायदे मिळत आहेत. विरोधी पक्षाने जोरदार आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही यासंदर्भात संपर्क साधला तेव्हा त्यांनीही राज्यपालांकडे राजीनामा अद्याप गेलेला नाही असे सांगितले.
यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले की, राजीनामा घेऊन स्वत:कडे ठेवला असेल तर गंभीर आहे. एका वृत्तपत्रात असं छापून आलं आहे की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राजीनामा मंजूर करू नका, असं राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे हे सर्व गंभीर आहे. आज फडणवीस म्हटले त्याप्रमाणे राजीनामा फ्रेम करून ठेवण्यासाठी दिलेला नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवणं योग्य नाही, असं बोलणं म्हणजे चौकशी अगोदर क्लिन चीट देणे आहे. कदाचित अधिवेशन होईपर्यंत राजीनामा घेतला आहे. त्यानंतर पोलिस चौकशीस काही आढळलं नाही, असं म्हणत पुन्हा घेऊ शकतात. हे त्यांचे नियोजन असेल. मात्र, असं योग्य नाही. जर राजीमामा मंजूर झाला नसेल तर त्यांनी कामावर हजर व्हावं फुकट मानधन घेणं योग्य नाही, असं मतही हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.