आडूनपाडून बोलणं हा रवीन्द्र लाखेंचा स्वभाव नाही. सरकारचा केशवसुत पुरस्कार प्राप्त झाला, म्हणून लाखे लगेच सरकारची बाजू घेऊन बोलतील, याची शक्यता नाही. मराठी भाषा आपण केव्हाच मारलीय, असं ते स्पष्टपणे मांडतात. मराठी भाषा दिनानिमित्त मॅक्समहाराष्ट्र : सकळ मराठी, प्रबळ मराठी या उपक्रमात लाखेंनी आपली भूमिका मांडलीय.
दिन साजरे करून त्याच्यातून आपण काहीही साधत नाही..हे रूढी परंपरा म्हणून केलं जातं, असं मला नेहमी वाटतं. एक प्रकारचा दरवर्षाला विधी केला जातो; त्यासाठी जे प्रयत्न सरकारनी करायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तींनी करायला पाहिजे हा भाग वेगळाच; पण सरकारने जे करायला पाहिजे, ते काही होत नाही.
हा एक दिवस फक्त जसा एखाद्या मृतकाच्या नावाने आपण करतो साजरा, स्मृतिदिन..स्मृतिदिन म्हणा तुम्ही याला...मराठी दिन...नाही , मराठी स्मृती दिन ! याच दिवशी आपल्याला मराठी भाषेची आठवण होते..त्यामुळे याला स्मृतिदिन म्हणा...कारण की मारलेलीच आहे आपण भाषा !!
आपला माणूस इथ मुंबईत बोलताना हिंदीतूनच सुरुवात करतो बोलायला. मराठीत बोलत नाही. मराठीत सुरुवात करत नाही आणि मराठीत सुरूवात केली तरी तो समोरचा माणूस भैय्या किंवा कोणी तो बेमुर्वतपणे सांगतो कि, “मराठी आती नहीं, हिंदी मे बात किजीये” मग आपण हिंदीमध्ये बोलतो. प्रतिक्रिया तीव्र आहेत, त्या बाबतीत माझ्या..
एक बंधनकारक केलं पाहिजे, जस कर्नाटकामध्ये, साउथ कडे आहे कि, हीच भाषा बोलली गेली पाहिजे, सगळे व्यवहार यातच झाले पाहिजेत, तसं आपल्याकडे होत नाही..कारण सरकारच त्याच्यात लक्ष घालत नाही.
मराठी शाळांची परिस्थिती अशी आहे कि, मुले पकडून आणावी लागतात आणि शाळा बंद पडल्यात. मराठीच्या कॉलेजेसमधून मराठी भाषेचे विद्यार्थी नसतात, काही ठिकाणी ३ ते ४ ते ५ मुले असतात, त्यामुळे तेसुद्धा विभाग बंद झालेले आहेत.
मग याच मूळ कुठे आहे? याच मूळ आहे ते इंग्लिश मिडीयम मधून शिकवणाऱ्या ज्या काही शाळा आहेत, या शाळा मूळ आहेत असं मला वाटतं. खाजगी शाळा वाढल्या आणि सरकारी शाळा कमी झाल्या. सरकारी शाळांमधून खरंतर शिक्षण चांगल मिळत, असं माझं स्पष्ट मत आहे.
मी सुद्धा सरकारी शाळेत शिकलेलो आहे आणि खाजगी शाळामध्ये संरचना अशी आहे की तिथला शिक्षक हा तात्पुरता असतो, तो कायम नसतो. त्याला दुसऱ्या वर्षी आपली नोकरी असेल याची खात्री नसते, त्यामुळे तो शिकवतानासुद्धा बोटचेपीगिरी करतो आणि जेवढ शिकवायचं तेवढंच...ते ही...मुले वर्गात आहेत आणि आपण समोर आहोत एवढंच..
बहुतेक सगळे पालक या इंग्लीश मिडीयम मधल्या मुलांचा अभ्यास घेत असतात, असं इतकं सगळं मोठं चक्र आहे. हे त्याच मूळ असलेल्या सगळ्या खाजगी शाळा बंद झाल्या पाहिजेत, मुख्यत: इंग्लिश मीडियमच्या...मराठी माध्यमाच्या शाळा चालतील; पण हे इंग्लिश, कॉन्वेंट, सी.बी.एस.सी, हे जे काही प्रकार आहेत, त्यावर बंदी असावी; कारण हे सगळ भयानक आहे. जो काही सगळा प्रकार आहे...त्याला सरकारनेच काहीतरी करायला हवं, असं मला वाटतं.