विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक राणा
१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक, भाषातज्ञ डॉ. अशोक राणा यांची निवड;
छत्रपती संभाजीनगर : दि. २१-२२-२३ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक व भाषातज्ञ डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. डॉ. अशोक राणा हे १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे हाती घेतील. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी किशोर ढमाले व विद्रोही १९ वे विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजि. सतिश चकोर, निमंत्रक धनंजय बोरडे हे उपस्थित होते.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक जाहीरनामा आहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण म. जोतीराव फुले यांना दिले; तेव्हा ‘‘तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही.’’ असे म्हणत म. फुलेंनी ‘‘उंटावरून शेळ्या वळणार्या घालमोड्या दादाच्या’’ त्या संमेलनात सहभागी होण्यास ठाम नकार दिला होता. आमचे ग्रंथकार तयार होतील, तेव्हा ते स्वाभिमानाने आपली संमेलने भरवतील असेही म्हटले होते. ग्रंथकार सभेचे २० व्या शतकातील स्वरूप म्हणजे अ.भा. मराठी साहित्य संमेलन आहे. अ. भा. साहित्य संमेलन आणि महामंडळ यांचा आजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनात परशुरामाची मूर्ती स्टेजवर ठेवण्याचा आग्रह, ठाण्यात संमेलन स्मरणिकेत महात्मा यांच्या खुन्याचा पंडित नथुराम' असा उल्लेख करणे असेल.
संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णाभाऊ साठे, शा. गव्हाणकर, शा. अमर शेख, शा. वामनदादा कर्डक,शा. यशवंत चकोर, क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, यांना संमेलनासाठी साधे निमंत्रणही न देणे; उलट अनेक दांभिकांना अध्यक्षपदे बहाल करणे, स्वातंत्र सैनिक व थोर गांधीवादी नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे, संविधान जाळण्याचे समर्थन करणारांना प्रतिष्ठा देणे अशी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाची असंख्य उदाहरणे आहेत. किंबहुना विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे ते मूखंडच आहे. म्हणूनच ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणार्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटित कृती केली पाहिजे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती व साहित्य विचारांचा पुरस्कार करते. विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी (नवी मुंबई), पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळनेर इत्यादी ठिकाणी साहित्य संमेलने, एक आंतरराज्य (निपाणी), एक विद्रोही महिला साहित्य संमेलन (पुणे) यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे. कालकथित बाबुराव बागुल, कवी वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे. विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.
१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक, ख्यातनाम इतिहास संशोधक, भाषातज्ञ डॉ. अशोक राणा यांची निवड :
दि. २१-२२-२३ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित संविधान मूल्यांना समर्पित १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक व भाषातज्ञ डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. डॉ. अशोक राणा हे १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे हाती घेतील.
डॉ. अशोक राणा हे मराठी साहित्य, भाषा, इतिहास, लोकसंस्कृती, प्रबोधन, संत वाङमय, आधुनिक समीक्षा, चित्रकला, नाट्य अशा विविध विषयांमध्ये पारंगत संशोधक म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांची संशोधन व प्रबोधनपर ७६ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी ‘‘विलास सारंग यांच्या कथांवरील अतिवास्तववादी छाया’’ तसेच ‘‘मराठी कथा व कवितांमधील नाग मिथक व प्रतिमा’’ अशा आधुनिक व प्राचीन विषयांवरील अभ्यासापासून तरूण वयात संशोधनाला सुरूवात केली.
त्यांनी भाषा व साहित्य या विषयात ‘साहित्याची भाषा’, साहित्य निर्मिती प्रक्रिया’, ‘मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी’, ‘बहुजन साहित्य म्हणजे काय?’, ‘साहित्याची जात्यांधांची झुंडशाही’, इत्यादी ५,
प्राचीन इतिहास- मिथके- पुरातत्व-सण-उत्सव अशा लोकसंस्कृती संदर्भातील ‘सिंधू जणांनी निऋती’, ‘शोध सरस्वतीचा’, ‘गणेश जन्माच्या कथेचा अर्थ’, ‘देवादिकांचे रहस्य’, ‘नागकथा व भूतपिशाच्च’, ‘कृषि विरूद्ध ऋषी’, ‘बौद्ध गणपती व सरस्वती’, ‘आदिमाया’, ‘सणांची सत्यकथा’, ‘मिथक साहित्य व संस्कृता’r इत्यादी २३,
प्रबोधनपर ‘गाडगे बाबा, बाबासाहेब व भाऊसाहेब’, ‘डॉ. आंबेडकर व मातृदेवता’, ‘बुद्ध व बुद्धिप्रामाण्यवाद’, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा’, ‘समरसतेचे वारकरी’, ‘मनुस्मृती-संघ व संविधान’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी विचार इत्यादी १३,
संत वाङमयासंदर्भातील ‘वेदोक्त प्रकरण व संत साहित्य’, ‘रामदासी परंपरा व संत तुकाराम’, ‘सार्वकालिक संत तुकाराम’, ‘विठोबा कोणाचा?’ इत्यादी ५,
जिजाऊ, शिवकाल, छत्रपती संभाजी, आहिल्यामाई या मध्य युगाच्या अंतिम चरणातील इतिहासाबद्दल : ‘आरोपीच्या पिंजर्यात संभाजी’, ‘शिवशाहीचा उदय’, ‘शिवरायांचा प्रताप’, ‘शिवचरित्राची शिकवण’, ‘शिवाजी शूद्र कसे?’, ‘शिवराज्याभिषेक १ ला व २ रा’ अशी ११ पुस्तके,
धर्म-ब्राह्मणी धर्म, शिवधर्म या संदर्भात ‘शिवधर्म चिंतन’, ‘शिवधर्माची प्राथमिक संहिता’, ‘ब्राह्मणी धर्म व शिवधर्म इत्यादी ५, आणि
संशोधन पद्धती इत्यादी संदर्भात ‘इतिहास संशोधन क्लासिकल व मासिकल’, ‘इतिहासाचे विकृतीकरण’, ‘असत्याची सत्य कथा’, ‘डॉ. आ.ह. साळुंखे-साहित्य व विचार इत्यादी ३,
अशी एकूण ७६ पुस्तके डॉ. अशोक राणा यांनी लिहिलेली आहेत आणि पाश्चात्य व आप्रिâकी मातृदेवता, भगवत गीतेतील चार्वाक, ‘सरस्वतीची सत्यकथा’, ‘कॉ. शरद पाटील यांची मिथक चिकित्सा’, ‘बसवेश्वरांचा देव’ इत्यादी विषयांसंदर्भातील २६ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
साप्ताहिक चित्रलेखा (संपादक-ज्ञानेश महाराव) मधील ‘असत्याची सत्य कथा’ आणि मातृपूजन विश्वभजन या डॉ. अशोक राणा यांच्या लेखमाला विशेष गाजल्या.
‘रूजलेल्या व लादलेल्या मिथकांनी विकृत वळण घेऊन इतिहासाचा ताबा घेऊ नये याची संयतपणे काळजी घेत मिथकांमागील अर्थ-अन्वयार्थ स्पष्ट करण्याचा निरंतर प्रयत्न डॉ. अशोक राणा करत आहे. सत्याची कास धरत ते ‘भूतभाषा पैशाची’ संदर्भात लिहितात, नागभाषेचा मागोवा घेत ते कॉ. शरद पाटलांच्या संशोधक पाऊलवाटेने स्त्रीराज्याची आद्य राणी गणमाता निऋती पर्यंत पोहोचतात. छत्रपती संभाजी महाराजांवरील ब्राह्मणी छावणीने घेतलेल्या आक्षेपांचा सामना ते करतात. गाडगे बाबा व तुकडोजी महाराज यांच्या प्रबोधनाचा पुनरूच्चार करतात. बुद्ध, तुकाराम, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचा सांगावा सांगतात.
इतिहासाला व संशोधनाला सत्याच्या पायावर उभे राहत या मातीशी व माणसांशी जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा साहित्यिक व अभ्यासक म्हणून मराठी बहुजन जनता डॉ. अशोक राणा यांना ओळखते. वारकरी सार्वकालिक तुकारामांचा परिचय करून देणार्या डॉ. अशोक राणा यांनी शिवधर्म मांडणी व उभारणीत मोलाचा वाटा उचलला आहे. आजच्या विद्वेषाच्या कालखंडात संविधानिक लोकशाहीवर हल्ला होत असताना माणूसकीचा इतिहास, वारसा व त्याची पुर्नमांडणी करणार्या डॉ. अशोक राणा यांची १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करताना आम्हाला आनंद होत असल्याचे प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले.
आजच्या पत्रकार परिषदेस विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी इंजिनीयर चंद्रशेखर शिखरे, प्राध्यापक रामप्रसाद तौर ,अर्जुन बागूल, अमिन शेख व १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष-खालिद अहमद, खजिनदार-के.ई. हरिदास, कार्यवाहक-भाऊसाहेब जाधव, राजानंद सुरडकर, मुख्य समन्वयक-प्रा. भारत सिरसाट, अॅड. वैशाली डोळस, सहकार्यवाह-अंनत भवरे, सविता अभ्यंकर, डॉ. सुनिता शिंदे, कॉ. मधुकर खिल्लारे, ग.ह. राठोड, हे उपस्थित होते.