आपली सामूहिक लढाई द्वेषाविरुद्ध - ॲड.असीम सरोदे
विकसित होण्यासाठी गांधीजींचे बोट धरून चालावे - ॲड. असीम सरोदे;
आज सगळ्या क्षेत्रात द्वेषाचे प्राबल्य वाढल्याने भारताला विकसित व्हायचे असेल तर आपली सामूहिक लढाई द्वेषासोबत आहे व त्यासाठी महात्मा गांधींचेच बोट धरून चालावे लागेल असे मत संविधान विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी मांडले. मुंबई सर्वोदय मंडळ, नाना चौक मुंबई येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सभेत
अध्यक्षीय भाषणात ॲड.सरोदे बोलत होते. यावेळी गांधीवादी विचारवंत जयंत दिवाण, हुसेन शेख व राष्ट्रीय युवा संघठनचे बजरंग सोनवणे, मूलभूत अधिकार समितीचे दिनेश राणे उपस्थित होते.
चळवळीतील कार्यकर्ते संजय मं. गो. यांनी प्रमुख वक्ते म्हणून भाषण करतांना आज राजकारणातील तत्वहीनता सतत महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देते. नैतिकतेशी संबंध नसणारे नेते आजच्या विचारहीन राजकारणाचे प्रॉडक्त आहे असे ते म्हणाले.
समाजकारण, राजकारण, धर्मव्यवस्था, अर्थकारण, पोलीस व न्यायव्यवस्था या सगळ्या आज द्वेषाने बरबटून टाकण्यात आल्या आहेत. अनेक मूलभूत अधिकार न्याय मागण्या योग्यच (जस्टीशियेबल) ठेवण्यात आले नाहीत यामागे नागरिकांचे अधिकार संकुचित करण्याचे राजकीय षडयंत्र आहे. एखाद्या जातीविरोधात किंवा धर्माच्या विरुद्ध मनात विष पेरलेल्या मानवी झुंडी ज्यांच्या राजकारणाची गरज आहे त्यांना ओळखण्यासाठी गांधीजींनी सांगितलेला शांतता व अहिंसा यांचाच मार्ग आम्हाला एक विकसित देश बनवेल असेही ॲड. असीम सरोदे म्हणाले. भयग्रस्त समाज निर्माण करून वाट्टेल तसे राजकारण करणारे लोकशाहीला धोका निर्माण करीत आहेत त्यामुळे आज महात्मा गांधींची गरज कधी नव्हती इतकी निर्माण झाली आहे. आपल्याला भीतीपासून व विद्वेशापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रेम हाच मार्ग आहे. आज प्रेमालाच विरोध असणारे सत्ताधारी झाले आहेत. अस्सल नागरी स्वातंत्र्य व लोकांची सत्ता निर्माण होण्यासाठी गांधीविचारांच्या छताखाली यावे लागेल असेही ठाम मत ॲड. असीम सरोदे यांनी मांडले.