पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये घसरणीऐवजी वाढच होत चाललीय. त्यामुळं तटस्थपणे पत्रकारिता करणाऱ्या अनेकांना जीवाचा धोका निर्माण झालाय. समाजविरोधी घटकांची हिम्मत इतकी वाढलीय की आता पत्रकारांची गोळ्या घालून हत्या करण्यापर्यंत गेलीय.
बिहारमधील अररिया जिल्ह्यात ही दुर्देवी आणि संतापजनक घटना घडलीय. दैनिक जागरणचे पत्रकार विमल यादव (Journalist Vimal Yadav) यांची चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केलीय. विमल यादव हे अररिया जिल्ह्यातल्या राणीगंज इथं दैनिक जागरणचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. आज (१८ ऑगस्ट) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या चारही हल्लेखोरांनी विमल यादव यांच्या घराची कडी वाजवली. त्यानंतर विमल यांनी दरवाजा उघडला. हल्लेखोरांनी क्षणाचाही विलंब न करता विमल यादव यांच्यादिशेनं गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले. यादव कुटुंबियांनी जखमी अवस्थेत विमल यांना राणीगंज रेफरल रूग्णालयात हलवलं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी विमल यांना मृत घोषित केलं.
काही वर्षांपूर्वी विमल यादव यांच्या भावाचीही अशाच पद्धतीनं अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्या घटनेचे विमल यादव हे एकमेव साक्षीदार होते. या पार्श्वभूमीवर विमल यांनीही बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, अशी माहितीही कुटुंबियांनी दिलीय. मात्र, परवान्यासाठी अनेकवेळा अर्ज करूनही परवाना मिळू शकला नाही, असा आरोपही यादव कुटुंबियांनी केलाय. दरम्यान, याप्रकरणी सुपौल तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या रूपेश नावाच्या गुंडानंच विमल यादवची हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय. दरम्यान, याप्रकऱणावरून आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं केलीय.