सरकारी अधिकारी लोकसेवकच असल्याचे सिद्ध करण्यासाठी मानवी हक्क कार्यकर्त्याचा लढा
भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी कुठवर आली अशी विचारणा केली म्हणून शासकीय अधिकारी पंकज जावळे यांनी आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे सचिव मनीष देशपांडे यांनी केला आहे. तसेच जावळे यांच्याविरोधात त्यांनी खटला दाखल केला आहे. लोकसेवक यांनी शिवीगाळ केली त्यामुळे कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी आपण लढत असल्याचे देशपांडे यांचे म्हणणे आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील भुयारी गटाराच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे व चुकीचे काम झाले आहे. तसेच बार्शीतील रस्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मोठा खर्च केला जात आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन काहींना कायमचे अपंगत्व आले आहे, तर काहींनी जीव गमावले आहेत, असे देशपांडे यांचे म्हणणे आहे. या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मनिष देशपांडे यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, बार्शी नगरपरिषद व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार केली होती.
पण कोणतीही कार्यवाही न झाल्याने या प्रकरणी देशपांडे यांनी लोकआयुक्तांकडे तक्रार केली. तसेच नागरीकांच्या सुरक्षित जीवन जगण्याच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.
शासकीय अधिकारी लोकसेवकच असतो-देशपांडे
देशपांडे यांच्या तक्रारीनंतर राज्य लोकआयुक्त कार्यालयाकडून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करुन लोकआयुक्त कार्यालयाला अहवाल पाठवण्याचे आदेश दिले. त्यानंतर दिलेल्या मुदतीत सोलापुर जिल्हा प्रशासनाने लोकआयुक्तांच्या आदेशाप्रमाणे अहवाल पाठवला का याची विचारणा करण्यासाठी देशपांडे यांनी सोलापुर जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांना फोन केला. तसेच आपण लोकसेवक आहात त्यामुळे आपण माहिती द्यावी, असे म्हणताच जावळे यांनी आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप मनीष देशपांडे यांनी केला आहे. याविरोधात मनिष देशपांडे यांनी पुण्यात दत्तवाडी पोलिस ठाणे येथे तक्रार केली. त्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता देशपांडे यांनी शिवाजीनगर,पुणे न्यायालयात दाद मागितली असून त्याची पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार आहे.
पंकज जावळे यांचे म्हणणे काय?
यासंदर्भात आम्ही पंकज जावळे यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की अशी कोणतीही शिविगाळ झालेली नाही, त्यामुळे या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नाही.
देशपांडे यांचे म्हणणे काय?
शासनाचा प्रत्येक सेवक (शासकीय अधिकारी व कर्मचारी) हा प्रथमतः लोकसेवक असतो. यासाठी कोर्टात गेल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे.