कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल असे मुख्यमंत्र्यांपासून सगळेच सांगत आहेत. पण शरद पवार यांच्या बारामतीमध्येच लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. बारामतीच्या शासकीय महिला रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीये. ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध नसल्याचा फलक लावण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अनेकजण शहरातील शासकीय रुग्णालयात जात आहेत. पण गेल्या चार-पाच दिवसांपासून लस संपल्याचे सांगून त्यांना परत पाठवले जात आहे.
दरम्यान,कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,काटेवाडी गावातील २ हजार ६९४ लोकांनी लसीसाठी नोंद केलेली आहे. यामध्ये ६० वर्षांवरील १८९७ व ४५ वर्षांवरील ७९८ नागरिक आहेत. पण आतापर्यंत फक्त ४१२ लोकांना लस मिळाली असून,तब्बल २२८२ लोकांना लस मिळालेली नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. काटेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्शनी भागातच लस उपलब्ध नसल्याचे फलक लावलेले बघून नागरिकांना परत फिरावे लागले. तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारले असता,लवकर लस उपलब्ध होईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.