वास्तववादी लेखन वैश्विक होते - मनोज भोयर

सिंगापूरच्या साहित्य संमेलनात मनोज भोयर यांचं उदघाटकीय भाषण;

Update: 2025-01-20 15:18 GMT

सिंगापूर इथे आयोजित नवव्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन.गेल्या काही वर्षात भरलेल्या संमेलनांच्या पत्रिकांवरून मला लक्षात आले की,अध्यक्ष आणि उदघाटक हे एकतर साहित्यिक होते अथवा त्याचे अभ्यासक.माजी अध्यक्ष संजय आवटे संपादक जरी असले तरी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. माझ्याबाबतीत असं काहीही नाही.माझे वडील भीमराव भोयर साहित्यिक आहेत. आणि पद्मगंधा प्रकाशित त्यांच्या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके आणि ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांची प्रस्तावना लाभली आहे. असं सगळं असतांना मला मात्र गेल्या २६ वर्षाच्या पत्रकारितेत एकही पुस्तक लिहिता आले नाही. हे वास्तव जरी असले तरी भारतातल्या महत्वाच्या घडामोडींचा मला साक्षीदार होता आले. तरीही संमलेनाचे मला उदघाटक का करण्यात आले ? याची मला फारशी कल्पना येत नाही. मी ही संधी आधी नाकारूनही पाहिली. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. असो. संधी मिळालीच तर ती घेतली पाहिजे.आणि बोललं तर पाहिजेच. भलेही साहित्यावर बोलण्याची माझी प्राज्ञा नसली तरी.


आपण बुद्धांच्या देशातले

इतक्या दूर आपण सिंगापूर इथे आलोत ते केवळ फिरण्यासाठी नतर नव्हेच. तो मुळात आयोजकांचा उद्देश नाहीच. साहित्य विचारांची देवाणघेवाण करत हे अवतीभवतीचे जग आपल्याला समजावून घ्यायचे आहे. विलियम वर्डस्वर्थ,शेक्सपियर आणि असे अनेक विदेशी इंगजी साहित्यिकांचे, इतिहासकारांचे वाचन आपण अभ्यासक्रमात आणि अन्यत्र केले आहेच.मात्र आज आपण आपले साहित्य घेऊन इथे आलो आहोत.भारतातून हा साहित्याचा रथ घेऊन आपण विदेशी जमीनीवर अवतरलो आहोत. भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा साहित्य संमेलने आयोजित होतातच आहे.मूळ अखिल भारतीय साहित्य संमेलन, या संमेलनाला समांतर भरवले जाणारे विद्रोही साहित्य संमेलन,शेतकरी साहित्य संमेलन,नव्याने सुरु झालेलेशासकीय विश्व साहित्य संमेलन आणि असे अनेक. मग आपण काय वेगळे करायला निघालो आहोत.तर आपण भारतापासून हजारो किलोमीटर दूर इथे येत आपल्याच देशाबाबत आणि पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीबाबत नव्याने चिंतन करणार आहोत. कारण हे विषय साहित्यापासून कदापिही दूर होऊ शकत नाही. या अर्थाने या व्यासपीठाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. माझ्या देशाची सीमा ओलांडून मी इथे आलो आहे. ज्या देशाला बुद्धांचा, गांधींचा आणि आंबेडकरांचा आणि विवेकानंदांचा देश म्हणून उभ्या जगात ओळखले जाते. त्या भारताला इतर कुठल्याही नावाने ओळखले जात नाही.अशा या महान भारत देशात मी साहित्य संमेलन पूर्ण करून जेव्हा परत जाईल तेव्हा एक वेगळा उदात्त विचार माझ्या मनात असेल जो शब्दातून, लेखणीतून व्यक्त होणारा असेलच पण त्याला सामाजिक भावनेची प्रखर किनारही असेल.


वास्तवाचे भान साहित्यात हवे

म्हणून मला असे प्रकर्षाने वाटते की,करमणूकीसाठी साहित्य प्रसवण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत.ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या मीही वाचल्या आहेत. पण तो काळ गेला.स्वतःच्या कोशात राहून केलेली साहित्याची निर्मिती बहुजनांना आता आपल्या कवेत कधीही घेऊ शकत नाही.त्यांच्या मनाला उभारीही देऊ शकत नाही.त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करू शकत नाही.मग अशा साहित्यांचे साहित्यिक मूल्य कितीका असेना. मी अशा साहित्याला तुच्छ मानत नाही. जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाला स्पर्श करणारे साहित्य सुद्धा असू शकते.सौंदर्यशास्त्र ही महत्वाचे आहेच. पण आज माझ्या आजूबाजूचा भवताल वेगाने बदलत असतांना आणि त्याचे भयंकर असे चटके मी सोसत असतांना, लेखक म्हणून मी स्वस्थ बसू शकत नाही. माझ्या लेखनात समाजातल्या वास्तव जीवनाचे भान उमटत नाही, मी कविता, कादंबरी, आणि इतर साहित्य प्रकारांमधून त्यावर भाष्य करत नाही.म्हणजे काय आहे ? मी बोललंच पाहिजे, मी लिहिलंच पाहिजे, मी व्यक्त झालं पाहिजे. व्यक्त होणं हेच माझ्या पुरुषार्थाचं खरं लक्षण आहे. असं समजून मी माझे उदात्त विचार या पुरोगामी महाराष्ट्राच्या नव्या जडणघडणीला पोषक ठरावे असे मांडले पाहिजे.असा जोरदार प्रयत्न 'रजनी ते रजिया' पुस्तकाच्या लेखिका आमी या संमेलनाच्या अध्यक्षा रजिया सुलताना यांनी केला आहे.त्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.त्या अमरावतीच्या आणि दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू सुद्धा अमरावतीचेच. पुणे विद्यापीठात त्यांनी आम्हाला दोन वर्ष शिकवलं. मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' नावाच्या अजरामर राजकीय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्याच मात्र त्यांच्या लेखनकौशल्याने समाजावर खूप मोठा प्रभाव टाकला आहे. पत्रकारितेत राहूनही त्यांनी आपल्या लिखाणातून मराठी समाजजीवनावर अमिट छाप सोडली. आज त्यांची मला विशेषत्वाने या ठिकाणी आठवण होत आहे.


शब्द हे आंतराष्ट्रीय व्यासपीठ

गेल्या २६ वर्षातली बदलती पत्रकारिता मी सुद्धा भारत फिरून पाहिली आहे. वेगवेगळ्या संमेलनांमध्ये वक्ता म्हणून तर कधी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिलो आहे. पण जी संमेलने तुमच्या आमच्या जगण्याचा कॅनव्हास मांडत नाही, ज्या चकचकीत संमेलनातून केवळ गुळमुळीत संवाद आणि परिसंवाद घडत राहतात त्या संमेलनाची आठवणसुद्धा आपल्याला राहत नाही. म्हणून शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन हे फार आगळेवेगळे ठरणार आहे. इथे आजच्या सामाजिक परिस्थितीचे उन्नत भान ठेवत चर्चा व्हावी. विवेक जागृत ठेवत नवे विज्ञानवादी विचार मांडले जावे. जेणेकरून आहे त्या परिस्थितीवर मात करण्याचे असीम धैर्य माझ्यात आणि आपल्या सर्वांमध्ये निर्माण होऊ शकेल.प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा वर्गसंघर्ष कायम आपण पाहतो. तो साहित्यामध्ये सुद्धा आहेच. पण गेल्या काही वर्षात हा संघर्ष मोडून काढण्याचे यशस्वी प्रयत्न होताहेत. वंचित विभागातील अस्सल साहित्य आणि साहित्यिकांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध होत आहे. मोठा मान मिळतो आहे. त्यांनीही आपल्या जगण्यासाठी आणि लेखनासाठी नवा अवकाश शोधला आहे. या अवकाशात माणुसकीची जोपासना होते आहे. नवनिर्मितीचा ध्यास घेतला जातोय. सृजनता वाढीस लागते आहे. अशा या अवकाशाची निर्मिती करणाऱ्या शब्द परिवाराचे मी मनापासून आभार मानतो.


माझा अवकाश कसा तयार झाला

गेल्या तीन दशकांपासून मी साहित्याचा वाचक, रसिक आणि श्रोता आणि मुख्य म्हणजे चळवळ्या या नात्यानं जोडला गेलोय. वर्ध्यात नारायण सुर्वेंची कविता त्यांच्या तोंडून ऐकली आणि पुढे गाव सोडल्यानंतर जमेल तसे,साहित्याच्या या प्रांगणात माझा वावर मी मोठ्या मेहनतीने कायम ठेवू शकलो आहे. मुंबईत 'अभिदानंतर' ही हेमंत दिवटे आणि बंडखोर कवीं मित्रांची चळवळ असो, चित्रकार आणि महानगरीय जाणिवेचा कवी मित्र मंगेश नारायणराव काळे यांचा 'खेळ' हा अंक असो. या आणि अशा आणि अनेक मित्रांच्या साहित्यिक निर्मिती प्रक्रियेशी मी जोडला गेलो आहे. साहित्य संमेलने, खास करून गावकुसावरचे, नाटक, चित्रपट महोत्सव, आणि संगीतांच्या मैफिली यातून माझ्यातला वाचक, प्रेक्षक आणि रसिक घडू शकला.अशा या चौफेर जगण्यामुळे मनाची कवाडे ही खुली आणि व्यापक होत जातात आणि अशा व्यक्तीला साहित्य आणखी संवेदनशील मनाने समजून घेता येऊ शकते असे मला वाटते.


सिंगापूरची बहुभाषी साहित्य संमेलने

ज्या सिंगापूर इथे मराठी भाषेचा झेंडा आपण फडकवतो आहे. तिथेच इंग्रजी, तमिळ, मल्याळम, हिंदी आणि मलय भाषांमध्ये साहित्याची समृद्ध परंपरा आहे, आणि या सगळ्या भाषांमध्ये विविध संमेलने व साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन होत राहतात.दरवर्षी "सिंगापूर साहित्य महोत्सव" (Singapore Writers Festival) आयोजित केला जातो, जो एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त साहित्यिक कार्यक्रम आहे. येथे विविध लेखक, कवि, विचारवंत आणि साहित्य प्रेमी एकत्र येतात आणि विविध चर्चासत्रे, वाचन सत्रे, कार्यशाळा आयोजित केली जातात.सिंगापूरच्या साहित्य संमेलनांचा उद्देश विविध भाषांतील साहित्यिक संवाद साधणे आणि विविध संस्कृतींचे आदानप्रदान करणे आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की,सिंगापूर इथे येऊन आपण जागतिक साहित्याच्या देवाणघेवाणीत तयार होत असलेल्या एका मोठ्या साखळीतील एक महत्वाची कडी झालो आहे. पण मला यापेक्षा आणखी आनंद होईल जेव्हा ज्या, ज्या देशात संमेलने भरवली जातील, तेव्हा त्या त्या देशातील चार दोन साहित्यिक, कवी आणि लेखक 'शब्द' च्या साहित्य संमेलनात सहभागी होतील. न पेक्षा ही आयोज़कांना माझी विनंतीच आहे. याने आपण आणखी व्यापक होऊन त्यांच्या व्यथा,वेदना, जगण्यातला संघर्ष, ते अनुभवत असलेला कोलाहल आपल्यालाही शब्दाच्या माध्यमातून कळू शकेल. जगाचे सामाजिक स्वास्थ्य फारच चिंताजनक झाले आहे, आणि याची आपल्याला पुरती जाणीव आहेच. रशिया-युक्रेन,सीरिया, इस्त्रायल-पॅलेस्टानी -हमास मधला जीवघेणा संघर्ष, तिथली युद्धजन्य परिस्थिती, अनाथ झालेलं बालपण, पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंसा, वांशिक उठाव. भारतात मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचार,नक्षलवाद,शेतकऱ्यांचे दिल्लीच्या तख्तावर धडकणारे मोर्चे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित अत्याचाराच्या कहाण्या,बीडमध्ये झालेली संतोष देशमुख यांची हत्या यामुळे जग आणि तिथला समाज ढवळून निघाला आहे. वेदनेचा हुंकार तिकडून ऐकायला येतो तर इकडूनही रडण्याचे हुंदके काही कमी ऐकायला येत नाहीये. हे सगळं आक्रंदन प्रत्येक देशात शब्दबद्ध होतंय कवितेत, पुस्तकात, कादंबऱ्यांमध्ये. आणि आपल्याला त्यांची भाषा माहित नसूनदेखील त्या कवितेतील शब्द आपल्या मनावर कोरले जाताहेत पटापट आणि ती कविता आपल्या दुःखाशी समरस होऊ पाहतेय. तो लेखक, कवी माझ्याच मातीत जन्मल्याचा भास आपल्याला होतोय ? का ? दुःख, संघर्ष, वेदनेला जातपात नसते, धर्म नसतो. ते जगद्व्यापी आहे. शब्दांच्या सामर्थ्याने ते वैश्विक होतं असतं. या अशा वैश्विक साहित्य मेळाव्याचे उदघाटन करण्याची तुम्ही मला संधी दिलीय त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद.

मनोज भोयर,संपादक,मॅक्स महाराष्ट्र

Tags:    

Similar News