अमेरिकन सरकारच्या अतिशय प्रतिष्ठेच्या व विविध क्षेत्रातील आश्वासक प्रतिभावंतांसाठी असणा-या “आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रम “ ( इंटरनॅशनल व्हिजीटर्स लीडरशीप प्रोग्राम - आयव्हीएलपी ) अंर्तगत उच्चस्तरीय कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील मर्मबंधा गव्हाणे यांची सन्मानजनक निवड करण्यात आली आहे. हा आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रम ( इंटरनॅशनल व्हीजीटर्स लीडरशीप प्रोग्राम) १९४० पासून म्हणजे ८५ वर्षांपासून जगभर राबविण्यात येतो आहे.
अमेरिकन सरकारच्यावतीने भारतातील चित्रपट क्षेत्रातील पटकथा लेखिकांसाठी हा पहिलाच कार्यक्रम आहे. या विशेष कार्यक्रमाचा बीजविषय “ परिवर्तनासाठी पटकथालेखन“ ( स्क्रीप्टींग चेंज ) असा आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट पटकथा लेखन विषयक नेतृत्व कार्यक्रमाचा संपूर्ण प्रवासनिवास आदि खर्च अमेरिकन सरकार करणार आहे.
देशातील पाच महिला पटकथा लेखिकांची निवड
अमेरिकेत जानेवारी -फेब्रुवारी या काळात या आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. चित्रपट विषयक या आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमासाठी भारतातील मर्मबंधा गव्हाणेसह पाच प्रतिभावान व आश्वासक युवा महिला पटकथा लेखिकांची निवड करण्यात आली आहे, त्यात अतिका चौहान , अनुभूती बॅनर्जी , परसीस सोडावॅाटरवाला , पूजा तोलानी यांचा समावेश आहे. मर्मबंधा गव्हाणे या यातील एकमेव मराठी चेहरा आहे हे विशेष होय. भारतीय चित्रपटसृष्टीत महिला पटकथा लेखिकांची संख्या फक्त १२ टक्केच आहे व त्यातील अवघ्या १% महिला पटकथाकारांनी शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, म्हणून नव्या पिढीतील प्रतिभावान व आश्वासक महिला पटकथा लेखिकांसाठी हा आंतरराष्ट्रीय स्तराचा कार्यक्रम आखला आहे . यामध्ये अमेरिकन चित्रपट सुष्टीतील नामांकित महिलापटकथाकारांशी देवाणघेवाण, संयुक्त लेखन ( कोलॅबरेशन) , महिलाविषयक सकारात्मक दृष्टिकोन चित्रपटात प्रतिबिंबित होण्याचे जागतिक प्रयोग , आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्थांना भेट व चर्चा होणार आहे. पुढील तीन दशकं या पटकथा लेखिका भारतीय चित्रपटसृष्टीत महिला समानतेविषयक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी नेतृत्व करावे असा व्यापक हेतू या कार्यक्रमाच्या मागे आहे.
मर्मबंधा गव्हाणे यांचा अल्पपरिचय
या संभाजीनगर शहरातील असून त्या मुंबईत गेल्या १९ वर्षापासून आहेत व पटकथा व संवादलेखनातील अनुभव १६ वर्षांचा आहे. त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या फिल्मसिटी मुंबईतील व्हिसलींग वूडस इंटरनॅशनल या फिल्म इन्टीट्यूटमधून दोन वर्षांचा पटकथा लेखन व चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम गुणवत्ता शिष्यवृत्तीसह पूर्ण केला आहे. मर्मबंधा गव्हाणे यांनी बालपणापासूनच कथाकथन स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळवले होते व आपल्या करीयरचे तेच क्षेत्र निवडले. नामांकित पटकथा लेखक निरंजन अय्यंगार यांनी त्यांना हिंदी पटकथा लेखनात सहाय्यक म्हणून विद्यार्थी दशेतच संधी दिली. त्यानंतर “ नक्षत्र “या हिंदी चित्रपटाचे व प्रमोद प्रॅाडक्शनच्या “ फ्रॅाम सिडनी वुइथ लव्ह “ या ॲास्ट्रेलियात चित्रीकरण झालेल्या हिंदी चित्रपटाचे संवाद लेखन केले . कलर टीव्हीसाठी “छोटी आनंदी” या ॲनिमेशन मालिकेचं पटकथा व संवादलेखन केलं आहे. ही मालिका आता “व्हूट”या
ओटीटीवर आहे. त्यानंतर त्यांना “ ॲस्ट्रा फोर्स “ या डिस्नी इंडिया , ग्राफिक इंडिया व अमिताभ बच्चन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन शोचं पटकथा व संवाद लेखन केलं. याचं प्रसारण डिस्नी चॅनल व नंतर अमेझॅान प्राईमवर केले गेले. या दोन्ही लेखनाला “फिकी” चे समीक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी मराठी फिल्म “ ती आणि ती” चे संवाद लेखन केले असून चित्रपटगृह व झी ५ वर त्याचे प्रदर्शन झाले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅाक्स स्टार स्टुडिओत स्क्रिप्ट रीडर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. फिल्मस्टॉक या मुंबईतील चित्रपट निर्मिती कंपनीत हेड ॲाफ कंटेंट असताना महान लेखक “मंटो “यांचेवरील गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली गेली. अलीकडील त्यांचा अमेझॉन प्राईमवर प्रसारित झालेला व लंडनला चित्रीकरण झालेला मराठी चित्रपट “ वेल डन बेबी“ होय. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन मर्मबंधा गव्हाणे यांचे असून या चित्रपटाच्या त्या सहयोगी दिग्दर्शकही होत्या. सद्या त्या सत्यकथेवर आधारीत दोन हिंदी चित्रपटाचे पटकथा -संवाद लेखन करीत आहेत. प्रा. डॅा. शुभांगी व प्रा. डॅा. सुधीर गव्हाणे यांच्या त्या कन्या आहेत. मराठवाड्यातील चित्रपट पटकथा लेखिकेचा झालेली ही आंतरराष्ट्रीय निवड गौरवास्पद आहे.