2019च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत आहे. एकीकडे भाजपाने कलाकरांच्या लोकप्रियतेचा विचार करत त्यांना पक्षात सामील करुन घेत असतानाच काँग्रेसनेही लोकप्रिय कलाकारांना पक्षात सामील करुन घेण्यास सुरुवात केली आहे.
बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री आणि 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (ता. 5 फेब्रुवारी) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कोण आहे शिल्पा शिंदे ?
शिल्पा शिंदेचा जन्म महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरात 28 ऑगस्ट 1977 रोजी झाला आहे. तिचे वडील डॉ सत्यदेव शिंदे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. शिल्पाच्या वडिलांना तिने कायद्याचे शिक्षण घ्यावे, अशी इच्छा होती. पण शिल्पा शिंदेला अभिनेत्री व्हायचे होते व संधीचं सोनं करत यशस्वी अभिनेत्री झाली. 2013 रोजी तिच्या वडिलांचे निधन झाले.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिल्पा शिंदे निवडणुकांच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1092737798363328512