लेक आणि सूनेत भेदभाव केल्यामुळे शरद पवारांवर महिला नेत्यांची टीकेची झोड...!

Update: 2024-04-13 07:40 GMT

राज्यात सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे व त्यांची भावजयी तथा अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यातील राजकीय लढाई आता टोकाला पोहोचली आहे. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रांसाठी निवडणूकीच्या प्रचाराचा वसा हाती घेतला असून भावनिक आव्हानावर त्यांनी जोर दिला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनीही आपल्या लेकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सुनेला निवडून द्यायते की मुलीला याविषयी बारामती गोंधळात असतानाच शरद पवारांनी लेकीला 'मूळ पवार' व सुनेला 'बाहेरची' संबोधल्यामुळे आता त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे.

अशी झाली वादाची सुरुवात

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये म्हणाले होते की, तुम्ही आतापर्यंत मुलाला म्हणजेच मला मतदान केलात, त्यानंतर शरद पवार शरद पवारांना मतदान केलात, नंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना मतदान केलात. आता सूनेला मतदान म्हणजे पवार कुटूंबाला मतदान केल्याचं समाधान मिळेल. मी सांगतो पवार त्याठिकाणीच मतदान करा, असं अजित पवार यांनी वक्तव्य केल्यावर त्यावर आपल्या शैलीवर प्रतिउत्तर देताना शरद पवार म्हणाले होते की, पवार आडनावाला मतं द्या, यात चुकीचं काय? इथून या वादाची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.

महिला नेत्यांची शरद पवारांवर टीकेची झोड

अंजली दमानिया

शरद पवार यांना नेमकं काय म्हणायचं आहे? एखाद्या सुनेला लग्न होऊन ४०-५० वर्षे झाले असले तरीही ती बाहेरची असते का? ती घरची होत नाही. त्यांचं हे वक्तव्य मला अजिबात पटलं नाही, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

चित्रा वाघ

आतापर्यंत आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये मुलगा आणि मुलीमध्ये भेद न करणाऱ्या शरद पवारांनी मुलगी आणि लेक यांमध्ये फरक केला हे फार दुर्दैवी आहे. गेल्या ४० वर्षांपासून पवारांच्या घरात नांदणारी मराठवाड्यातील पाटलांची लेक त्यांना आज आपली वाटत नाही, परकी वाटते यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकते? असं भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ म्हणाल्या.

रुपाली ठोंबरे पाटील

लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले आहेत, हे खेदानं म्हणावे लागतंय. जी मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आली, तुमचं कुळ तिने वाढवलं. आता तिला मानसन्मान देण्याची वेळ आली, तेव्हा दुधातल्या माशीप्रमाणे बाहेर काढण्याचं शरद पवारांचं विधान आहे. त्यांच्या या अशा विधानामुळे राज्यातील सर्वच सुना दुखावल्या गेल्या आहेत, असं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

शीतल म्हात्रे

सूनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. कदाचित मुलीच्या प्रेमापोटी तुम्ही तुमचे विचार बदलले. बारामतीच्या काकांचे हे वाक्य महाराष्ट्रातल्या समग्र लग्न करून सासरी गेलेल्या सूनांचा अवमान आहे, असं शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत म्हटलं आहे.

Full View

Tags:    

Similar News