'ट्रॅक्टरची डॉक्टर' धनश्री हातझाडे...
तुम्ही ट्रॅक्टर दुरुस्त करताना एरवी पुरुषांनाच पाहिले असेल. मात्र, 22 वर्षाची मॅकेनिकल इंजिनिअर झालेली धनश्री ट्रॅक्टर सारखे अवजड वाहन दुरुस्त करत आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रॅक्टरची डॉक्टर अशी धनश्रीची ओळख निर्माण झाली आहे. कसा आहे सर्व धनश्रीचा प्रवास पाहा मॅक्समहाराष्ट्रचे पत्रकार अभिजीत घोरमारे यांचा स्पेशल रिपोर्ट
उच्च शिक्षित झाल्यानंतर, मोठ्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची अपेक्षा असते. विशेष म्हणजे गावात राहून काम करण्याची इच्छा कोणताही तरुण आता व्यक्त करताना दिसत नाही. मात्र, भंडारा जिल्ह्यातील एका युवतीने मॅकेनिकल इंजिनीयरींगचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता वडिलांच्या गॅरेजमधील ट्रॅक्टर दुरुस्ती च्या व्यवसायात हातभार लावण्याचं काम करत आहे. धनश्री हातझाडे असं या युवतीचं नाव असून असं काम करणारी जिल्ह्यातील धनश्री ही पहिलीचं युवती ठरली आहे.
धनश्रीच्या वडिलांनी देखील उच्चशिक्षण घेतले. त्यांनाही बाहेर मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. मात्र, गड्या आपला गाव बरा... असं म्हणत प्रेमलाल हातझाडे हे उच्च शिक्षित असतानाही त्यांनी ट्रॅक्टर दुरुस्ती चं काम हाती घेतलं. गावात राहुन ट्रॅक्टर दुरुस्तीचं काम करत असताना त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रमाणे आपल्या मुलीला त्यांनी उच्च शिक्षण दिलं. आणि मुलीनेही आपलं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर उच्चशिक्षित झालेली धनश्री टाटा, महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागेल. असं वाटत असताना धनश्री ने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर कुठेही नोकरीच्या मागे न धावता... वडिलांच्या गॅरेज मध्ये ट्रॅक्टर दुरुस्ती चे काम शिकण्याचा निर्णय घेतला आणि आज ती वडिलांच्या पाऊलावर, पाऊल ठेवत ट्रॅक्टर दुरुस्ती चे काम करत आहे. विशेष बाबा म्हणजे पदवी मिळाल्यानंतर असे काम करणारी ती जिल्ह्यातील पहिली युवती ठरली आहे.
प्रेमलाल हातझाडे यांचा ट्रॅक्टर दुरुस्तीच्या गॅरेज मध्ये इतर कामगार देखील दुरुस्ती चे काम करतात. ट्रॅक्टर दुरुस्तीचं काम म्हणजे जड काम असा सर्वसामान्य समज आहे. मोठं मोठे नट बोल्ट खोलने सोप्पं नाही. त्यातच ती मुलगी असेल तर... शक्यच वाटत नाही. मात्र, धनश्री इतर कामगारांप्रमाणे सर्व काम करते. एकंदरीतच या युगातही महिला वर्कशॉप मधील अतिजड कामातही मागे नाहीत. हे तिने आपल्या कामातून दाखवून दिले आहे. विशेष बाब म्हणजे तिने आपण ज्या मुलींना काम शिकायचं आहे. त्यांना मी काम शिकायला तयार आहे. असं मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना म्हटलं आहे.
ती म्हणते माझं मॅकेनिकल इंजिनिअरिंग झालं आहे. माझी पहिल्यापासूनच वडिलांच्या व्यवसायामध्ये मदत करण्याची इच्छा होती. माझ्या मते कोणतंचं काम जड नसतं. ट्रॅक्टर खोलनं, तो नीट करणं, ही कामं मुलांप्रमाणेच मुली ही करू शकतात. यावर माझा विश्वास आहे.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलं आहे. If You Want Great Success, You need to work hard. त्या प्रमाणे मी काम करत असते. माझ्याप्रमाणेच बाकी मुलींनी सुद्धा या कामांमध्ये यावं. अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी मी त्यांना ट्रेनिंग सुद्धा देईल. वडिलांप्रमाणेच एक उत्तम मेकॅनिक बनण्याचे माझं स्वप्न आहे. आणि माझ्या या वेगळ्या करियर मधून नक्कीच बाकींच्या मुलींना सुद्धा प्रेरणा मिळेल अशी मी आशा करते. माझी दिनचर्या ही माझ्या कामासोबतच सुरू होते आणि कामासोबतच संपते. सकाळी वडिलांसोबत चर्चा करून मी गॅरेजमध्ये येते आणि माझा दिवस सुरू होतो.
वडिलांशी बातचीत केली असता ते असे म्हटले - मी या व्यवसायामध्ये गेली तीस वर्ष आहे. मला दोन्ही मुलीच आहेत. माझा व्यवसाय सुरु असताना माझ्या मुलीने माझ्याकडे इंजीनियरिंग करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिच्यासाठी ते क्षेत्र आम्ही निवडलं. एकदा असा प्रसंग घडला की, माझ्या वर्कशॉप मधील 9 वर्कर्स ने येण्यास नकार दिला आणि त्यादिवशी मला चार-पाच ट्रॅक्टर नीट करून नीट करून द्यायचे होते.
त्यावेळेस माझी मुलगी मला म्हटली की पप्पा मी तुम्हाला मदत करायला येते आणि तेव्हापासून ती माझ्यासोबत वर्कशॉप मध्ये येऊ लागली. माझ्या मुलींप्रमाणे बाकीच्या मुलींनी सुद्धा या कामांमध्ये पुढाकार घेत या क्षेत्रात उतरावं. यासाठी तिने एक ट्रेनिंग सेंटर सुरू करावं अशी माझी इच्छा आहे.
यासं दर्भात आम्ही तिच्या सोबत काम करणाऱ्या एका मॅकेनिकशी चर्चा केली. ते सांगतात... धनश्री आमच्या प्रमाणेच काम करते. ती मुलगी आहे. म्हणून तिला हे काम नको असं स्वत: ती कधीही ती म्हणत नाही. मी हे काम करु शकत नाही. असं तिच्या तोंडातून ऐकायला मिळत नाही. तिची निरिक्षण करण्याची क्षमता अधिक आहे. ती पाहते आणि काम करायला हातात घेते. तिची काम शिकण्याची इच्छा तिच्या कामातून दिसून येते. विशेष म्हणजे आमच्या पेक्षा तिचं शिक्षण जास्त असतानाही ती आमच्याशी सन्मानाने वागते. तिच्याकडे पाहून आपल्या मुलीलाही हिच्या प्रमाणे शिकावं. मोठं करावं. असं वाटतं. असं मत तिच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलं.
धनश्री बाबत एका ट्रॅक्टर मालकाशी चर्चा केली असता... ते म्हणतात... पोरगी बापावर गेली आहे. अगोदर वाटायचं शहरात शिकून आली आहे. हिला हे काम काय जमायचं...? ट्रॅक्टर दुरुस्ती हे गड्याचं काम. बापासोबत येत असंल अशीच... पण प्रत्यक्षात मला जरा अर्जंन्ट काम होतं. गॅरेजवर धनश्री काम करत होती. मी आल्यानंतर तिने माझं काम अर्जंन्ट असल्याचं सांगितल्यानंतर तात्काळ माझ्याकडे आली. ट्रॅक्टर आत घेतला आणि एका तासाभरात दुरुस्त करून दिला. तेव्हा मला वाटलं पोरी पण हे काम करु शकतात. विशेष बाब म्हणजे ट्रॅक्टर वारंवार खराब होऊ नये... म्हणून काही सूचना पण दिल्या. शेतीतील कामामुळे ट्रॅक्टर ग्रिसींगकडे मी फार लक्ष द्यायचो नाही. मात्र, आता ट्रॅक्टर ग्रिसिंग करतो. शेतीतल्या कामाप्रमाणेच ट्रॅक्टरचं वेळेवर ग्रिसींग, ऑइलींग महत्त्वाचं आहे. हे पण शेतीचंचं काम आहे. असं तिनं मला सांगताचं मी जरा चपापलो. आणि आता येता जाता. तिचं काम पाहून पोरींनी असंच पुढं जावं असं मनात वाटतं. मी कोणालाही धनश्रीचं उदाहरण देतो...
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता-पिता तयाचिया ।।१।।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देव
असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. त्या प्रमाणे आपल्या मुलीचं काम पाहून आईला ही तिचा अभिमान वाटतो.