१ मंत्री २ खासदार.. २ गावांचा 'वनवास' कधी संपणार?

आपल्या जिल्ह्याचा नेता मंत्री झाला किंवा खासदार झाला तर आता विकास होणार अशी भाबडी अपेक्षा नागरिकांना असते. पण सातारा जिल्ह्यात १ मंत्री आणि दोन खासदार असूनही २ गावांचा मुलभूत हक्कांसाठीचा संघर्ष थांबलेला नाही. पाहा मॅक्स महाराष्ट्रचा वस्ती रिपोर्ट....;

Update: 2020-10-02 14:20 GMT

"एखाद्या बाईला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या की आमच्या पोटात गोळा उठतो, डालीत घालून तिला दवाखान्यात पोहचवताना रक्ताची धार लागते. त्यात आमची गडी माणसं भिजून जातात. दीड फुटाच्या रस्त्यावर रक्ताचे डाग पडलेले असतात. एवढं करून शिंगणवाडी तिथे सोय झाली नाही तर चाफळ आणि मग उंब्रज, कराडला देखील न्यावे लागते." कोळेकर वाडी येथील सुलाबाई कोळेकर यांची ही वाक्ये आहेत. पुढे त्या सांगतात, " या गावात आमच्या चार डूया संपल्या. पाचवी सुरू आहे. तरी अजून रस्ता झाला नाही. पुढारी येतात, रस्त्याचे आश्वासन देतात मते नेतात मात्र रस्ता कुणीही केला नाही."

सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे हतबल झालेल्या वनवास वाडी, कोळेकर वाडी या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दोन गावांमधील प्रत्येकाच्या भावना आहेत. जुळ्या भावंडाप्रमाणे वसलेली दोन गावे आहेत. दोन वेगवेगळ्या गट ग्रामपंचातींमध्ये ही गावं येतात पण त्यांच्या समस्या सारख्याच आहेत. तीन किमी डोंगरावर वसलेल्या या गावांना जाणारा रस्ता म्हणजे उभ्या डोंगरावर उभी जाणारी दीड फुटाची पाय वाट आहे. खाच खळगे तुडवत, पावले या झिजलेल्या रस्त्याच्या खोबणीत बसतील अशी वेडी वाकडी करत गावात जावे लागते. काही ठिकाणी गवत एवढे वाढले आहे की स्वतःची पावलेही दिसत नाहीत. जरासा तोल गेला की पलीकडे दरीत पडण्याची भीती.... या रस्त्यातून येथील गावकऱ्यांच्या पाच पिढ्या प्रवास करत आहेत.


 



राज्याच्या राजकाऱणात कायम पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा प्रभाव राहिलाय. राज्याची स्थापना झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्राने सर्वाधिक सत्ता उपभोगली आहे, त्या सातारा जिल्ह्यातील ही दोन गावे आहेत. संपूर्ण देश जिथे ५ जी नेटवर्कची वाट पाहतोय तिथे पाटण तालुक्यातील वनवासवाडी आणि कोळेकरवाडी या दोन गावांमधील लोक अजूनही रस्त्याची प्रतीक्षा करत आहेत. श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले असे दोन खासदार तसंच शंभूराज देसाई यांच्या रुपाने एक मंत्री जिल्ह्याला लाभलाय. पण अजूनही या गावकऱ्यांच्या हालअपेष्टांची दखल घेतली गेलेली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही याच जिल्ह्यातले आहेत.

या गावांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर हे चालत या गावांमध्ये पोहोचले. यावेळी रस्त्यात त्यांना दवाखान्यातून परतत असलेले एक वृद्ध दांपत्य भेटले. कंबरेत वाकलेले, हातातील काठीचा तेवडा आधार घेत ते वनवास वाडीतील आपल्या घराकडे निघाले होते. कॅमेरा काढताच ते म्हणाले, हे एवढं पंचायत समितीला दाखवा. आमचं आयुष्य संपत आलं तरी आम्हाला येणं जाणं असंच करावं लागतंय.

वनवास वाडी येथील विष्णु डीगे यांच्या मुलीला बाळंतपणासाठी डालीतून दवाखान्यात नेताना ती रस्त्यातच झाडाखाली बाळंत झाली. तिला पुन्हा उचलून घरी आणावे लागले. आजही त्यांना आपल्या पत्नीला दवाखान्यात याच रस्त्यावरुन न्यावे लागते आहे. एवढा रस्ता करा अशी मागणी हात जोडून सरकारकडे ते करतात.

या गावात फक्त रस्ता ही एकमेव समस्या नाही. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारत ही पत्र्याच्या झोपडीप्रमाणे आहे. एखादे तुरुंग वाटावी अशा शाळेत वाऱ्याने हलणाऱ्या तुटक्या पत्र्याच्या आवाजात मुले शिक्षण घेतात. रस्ता नसल्याने आठवड्यातून कधी तरी शिक्षक शाळेत येतात. चौथीनंतर शाळेसाठी बाहेर जावे लागत असल्याने अनेक मुलांनी शाळा सोडलेली आहे. गावात दहावीनंतर शिकलेली मुले क्वचित आढळतात. उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय असते. गावात पक्के घर नाही शौचालय नाही. अंगणवाडीची इमारत नाही.

जिवंतपणी मरण यातना सोसणाऱ्या या गावातील लोकांचा मरणानंतरही संघर्ष थांबत नाही. स्मशानभूमी नसल्याने पावसात प्रेत दहन करताना अनेक अडचणी येत असतात. या सर्व अडचणीमुळे येथील मुलांची लग्ने जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत. महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघात ही गावे येतात. या परीसराला सध्या डॉ. श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले असे दोन खासदार लाभले आहेत. याच साताऱ्यातल्या प्रचारसभेत अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात सभा घेतली होती. त्याच पावसातील सभेनंतर राजकीय समीकरणं बदलल्याचे सांगितले जाते.

असे असताना इथल्या गावकऱ्यांना, वृद्धांना मात्र घामाने भिजत दररोज तीन किमीचा डोंगर पार करावा लागतो, याची ना कुठे चर्चा होते ना कुणी हा प्रश्न सोडवतो. या गावातील सुलाबाई कोळेकर सांगतात आमच्या गावातील बाईला बाळंतपणासाठी डालीतून नेताना आमच्या गड्या माणसांचे कपडे रक्ताने भिजत असतात. हा रक्ताचा शिंतोडा त्या लोकांच्या अंगावर पडलेला नसून पुढारलेल्या पश्चिम महाराष्ट्राचा टेंभा मिरवणाऱ्या इथल्या लोकप्रतिनिधींच्या पांढऱ्याशुभ्र कपड्यांवर पडलेला आहे. त्याची शरम इथल्या लोकप्रतिनिधींना वाटणार का ? ते या रस्त्यासाठी पुढाकार घेणार का हा खरा प्रश्न आहे.




 


निवडणुकांपुरते राजकारणी य़ेतात आणि आश्वासने देऊन जातात, असाच अनुभव इथल्या गावकऱ्यांना येतो आहे. या भागाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी आम्ही संपर्क साधला. तेव्हा "ग्रामपंचायतचे किंवा ग्रामस्थांचे लेखी निवेदन मिळाले तर ही समस्या सोडवता येईल. आमच्याकडे हा विषय कधीच आला नाही. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी काय केले माहीत नाही, सदर रस्ता होणेबाबत आम्ही पत्र लिहून पाठपुरावा करतो. पण ग्रामपंचायतीने ठराव किंवा संबंधितांना निवेदन घेऊन पाठवावे. मी रस्त्यासाठी पाठपुरावा करेन" असे आश्वासन त्यांनी दिले.

यानंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि काही सरकारी अधिकारी येऊन गेले आणि रस्त्याबाबत पाहणी करुन गेल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पण मुळात चांगले रस्ते हा मुलभूत हक्क आहे. मग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही या लोकांना या हक्कापासून का वंचित ठेवले गेले, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

या लोकांची नावे मतदार यादीत येतात, मग कामांच्या यादीत या गावांचे नाव का येत नाही. फक्त रस्ते करुन या गावकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीयेत. इथं इतरही सुविधा नाहीत, त्यांचे काय? इथल्या मुलांना शिक्षणाचा मुलभूत हक्क हिरावला जातोय, त्याचे काय? केवळ रस्ता नसल्याने शिक्षक दररोज येऊ शकत नाही ही प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी केवढी शरमेची बाब आहे. या गावातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचत नाहीयेत. मग सरकारी यंत्रणा काय करताय, या सर्व प्रश्नांची उत्तरे इथले लोकप्रतिनिधी देणार आहेत का आणि या गावकऱ्यांच्या ५ पिढ्या जी कष्ट सोसत आहेत, त्या कष्टांचे कधीतरी चीज होणार आहे का, असा सवालच इथल्या वृद्धांच्या डोळ्यांमध्ये कायम आहे.

Full View

या गावात फक्त रस्ता ही एकमेव समस्या नाही. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची इमारतही पत्र्याच्या झोपडीप्रमाणे आहे. एखादे तुरुंग वाटावी अशा शाळेत वाऱ्याने हलणाऱ्या तुटक्या पत्र्याच्या खाली मुले शिक्षण घेतात. रस्ता नसल्याने आठवड्यातून कधी तरी शिक्षक शाळेत येतात. चौथीनंतर शाळेसाठी बाहेर जावे लागत असल्याने अनेक मुलांनी शाळा सोडलेली आहे. गावात दहावीनंतर शिकलेली मुले क्वचितच आढळतात. उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय असते. गावात पक्के घर नाही शौचालय नाही. अंगणवाडी इमारत नाही.

जिवंतपणी मरण यातना सोसणाऱ्या या गावातील लोकांचा मरणानंतरही संघर्ष थांबत नाही. स्मशानभूमी नसल्याने पावसात प्रेत दहन करताना अनेक अडचणी येत असतात. या सर्व अडचणीमुळे येथील मुलांची लग्ने जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत.

राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मतदारसंघात ही गावं येतात. या परीसराला सध्या डॉ श्रीनिवास पाटील, उदयनराजे भोसले असे दोन खासदार आहेत. असे असतानाही इथल्या सामान्य नागरीकांना दररोज तीन किमीचा डोंगर पार करावा लागतो.

Tags:    

Similar News