शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी केलेली ‘त्या’ पॅकेजची घोषणा हवेतच?

Update: 2020-02-07 16:30 GMT

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी भल्या पहाटे उठून शपथ घेतली. ही घटना सर्व महाराष्ट्र कधीही विसरु शकत नाही. फडणवीसांच्या दुर्दैवानं हे सरकार फक्त 4 दिवसातच गडगडलं.

त्यावेळेस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आले होते. शेतकरी हवालदिल झाला होता. त्यात राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळेस राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन शेतकऱ्यांना 5380 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

 

या संदर्भात बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन संजय यादव यांनी माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये माहिती मागितली होती. आपल्या माहिती अधिकारात त्यांनी 23/11/2019 ते 26/11/2019 या कालावधीत मुख्यमंत्री सचिवालयाला प्राप्त झालेल्या फाईल आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या (स्वाक्षरी केलेल्या) फाईल याची माहिती मागितली होती.

या माहिती अधिकाराला उत्तर देताना जनमाहिती अधिकारी वृषाली चवाथे यांनी दिलेल्या माहितीनुसार 23/11/2019 ते 26/11/2019 या कालावधीत एकही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात आली नाही अथवा बाहेर गेली नाही. यावरुन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर अकांउट वरुन दिलेली माहिती खोटी होती का?

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असताना शेतकऱ्य़ांना मदत न करता फक्त घोषणा देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं का? त्यामुळे एक प्रकारे फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

या संदर्भात आम्ही नितिन संजय यादव यांच्याशी बातचित केली असता त्यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी धांदात खोटं बोलण्याचे काम केलं आहे. हे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत सरळ सरळ स्पष्ट होते असं मत व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना महाराष्ट्रावर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड असं नुकसान झालं होतं. पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती होती. त्यावळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी साधारण 5 हजार 380 कोटी रुपयांची घोषणा केली होती.

यामध्ये माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये देवेंद्र फडणवीस .यांच्या काळात एकही फाईल मुख्यमंत्री कार्य़ालयात गेली नाही. अथवा आली नाही. य़ाचाच अर्थ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा पोकळ होती का? या घोषणेचा मोठा मोठा गाजा-वाजा करण्यात आला होता.

या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य़ालयाशी संपर्क केला असता, त्यांनी हा निधी राज्याच्या आकस्मित निधीतून देण्यात आल्याची माहिती दिली. तसंच हा निधी मंजूर देखील करण्यात आला होता. असा दावा त्यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या घोषणेची मोठी जाहीरातबाजी केली गेली. शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया नितीन यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिली आहे.

Similar News