ट्रॅक्टरचे स्टिअरिंग आणि संसाराची ड्रायव्हर सीट
पतीचं अचानक निधन झाल्यानंतर अनेक महिला खचून जातात. पण त्यानंतर मात्र त्या निर्धाराने उभे राहून संसाराचे गाडे एकट्या ओढतात. अशाचप्रकारे संघर्ष करुन परिस्थितीशी यशस्वी लढा दिलेल्या सविता कुंभार यांची कहाणी....;
सविता कुंभार यांच्या पतीची तब्येत अचानक बिघडली. त्यांना मांडीवर घेताच त्यांचा बांध फुटला आणि त्यांनी टाहो फोडला. वयस्कर सासू- व्यतिरिक्त घरात कुणी नव्हतं. अचानक काय झालं काही समजत नव्हतं. पाहता पाहता काही क्षणात त्यांचे शरीर थंड पडलं. शेतातील घर असल्याने आजूबाजूला देखील कोणी नव्हते. मांडीवर निपचित पडलेला पतीचा मृतदेह घेऊन त्यांनी नातेवाईकांना फोन केले. पतींचे निधन झाल्याची बातमी त्या स्वतः देत होत्या. त्यांच्या आयुष्यात त्यांना बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता. या धक्क्यानंतर सर्व काही संपलंय अशी त्यांची भावना होती. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात येणारे विठ्ठलापुर हे त्यांचे गाव.
घरातील पुरुष गेल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. आता मुलांचं काय? त्यांच्या शिक्षणाचं काय? कुटुंबाचे पोट ज्या दहा एकर शेतीवर भरत होते ती शेतीच त्यांना आधार झाली. त्यांचे पती अशोक हयात असताना त्यांना शेतीतील बहुतांश कामे शिकवलेली होती. ते दोघे खांद्याला खांदा लावून काम करायचे. त्यांनी अनेकदा त्यांना डाळिंबाच्या मार्केटची स्थिती, दराची स्थिती, व्यापारी तसेच खतांची माहिती करून दिली होती. व्यापाऱ्यांच्या संपर्काच्या नोंदी देखील त्यांनी ठेवलेल्या होत्या. त्यांना प्रोत्साहन देखील दिले होते.
पतीच्या या प्रेरणेने त्या स्थितीतही या परिस्थितीला तोंड द्यायचे असे ठरवून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्या सांगतात "मला दुःख बाजूला सारून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. दहा एकर शेत होतं. पण शेतीतील मुख्य कामे ही त्यांचे पती करायचे. दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर होती. त्यामुळे त्यांनी पडेल ते काम करायला सुरुवात केली. शेताला पाणी देणे, जनावरांची व्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे त्यांनी केली. शेतीच्या सुलभतेसाठी त्यांनी ट्रॅक्टर घेतला. त्यांच्या मुलाने त्यांना ट्रॅक्टर चालवायला शिकवले. आजही त्या स्वतः ट्रॅक्टर चालवतात. ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे ही सर्व कामे त्या करतात.
त्यांनी केलेल्या कष्टाच्या जोरावर त्यांच्या मुलांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सूना व नातवंडेदेखील आहेत. आजही कधी कधी त्यांच्या हातात नातवाच्या पाळण्याची दोरी असते तर दुपारी कमरेला पदर खोचून त्यांच्या हातात ट्रॅक्टरच स्टिअरिंग असतं. त्यांच्या ७६ वर्षाच्या सासू गोकुळाबाई या त्यांना मदत करत असतात. गावातील इतर शेतकरी तसेच नातेवाईक यांची देखील त्यांना मदत मिळत असते.
त्यांच्या एकूण दहा एकर असलेल्या शेतात डाळिंब, केळी गहू ज्वारी पिकत आहे. एकूण सहा एकरमध्ये असलेल्या भगवा या डाळिंबाच्या बागेतून प्रतिवर्षी प्रती एकर १० ते १२ टन डाळिंबाचे उत्पादन मिळत आहे. त्याला ९० ते १०० रुपये प्रति किलो भाव मिळतो. त्यांच्या शेतीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना ॲग्रो स्टार या कंपनीकडून यशस्वी शेतकरी हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
त्या सरकारला विनंती करतात की, राज्यामध्ये अनेक एकल महिला शेती व्यवसाय उद्योग क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत आहेत. या महिलांसाठी सरकारने विशेष योजना करायला पाहिजेत. त्यांच्यासाठी पुरस्कार घोषित करायला पाहिजेत, समाजात त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक नष्ट व्हावी म्हणून शासन स्तरावरून याबाबत जनजागृती करायला हवी.
सविता कुंभार यांनी केलेला संघर्ष, त्यांची खडतर पायवाट हा इतर महिलांना वाटचाल करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यांच्या या कर्तृत्वाने त्यांच्या विठ्ठलापुर या गावाची देखील वेगळी ओळख निर्माण झाली आहे.