होय, अण्णा हजारे चुकले आहेत – हेरंब कुलकर्णी

अण्णांनी हजारेंनी आपले नियोजित उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर सोशल मिडीयामधून टीका होते आहे. अण्णांच्या निर्णयाबाबत वेगवेगळी मतं असू शकतात, पण अण्णांच्या बाबतीत असे वारंवार का घडते आहे, याचे परखड विश्लेषण केले आहे त्यांचे समर्थक असलेले सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी....

Update: 2021-01-30 05:43 GMT

कदाचित माझी अशी पोस्ट बघून अनेकांना आश्चर्य वाटेल....मी अण्णांचा पक्का समर्थक आहे. चाहता आहे परंतु अंधभक्त नाही त्यामुळे आंधळेपणाने त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन नक्कीच करणार नाही पण त्याचवेळी ते चुकले म्हणून त्यांच्यावर वाईट भाषेत टीका करून माझी पातळीही दाखवणार नाही.

भक्त आणि नवभक्त केंद्र किंवा राज्य सरकार कितीही चुकले तरी कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत असतात. पण ती चूक मी कधीच करत नाही. बरोबर आणि चूक एवढेच बघायला हवे. अण्णा हजारे यांना मागील आठवड्यात फडणवीस भेटले तेव्हाच मी अण्णांनी भाजपला भेट नाकारायला हवी अशी पोस्ट लिहिली होती. कारण पुढे काय होणार आहे हे दिसत होते दुर्दैवाने ही भीती खरी ठरली.

अण्णांना आपल्या वागण्याचे परिणाम काय होतील, कोणत्या प्रवृत्ती बळावतील याचे भान नसते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. एकतर वयाच्या हिशोबाने अण्णांनी उपोषण हा विषय घ्यायला नको होता आणि घेतला तर माघार घ्यायला नको होती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बोलत आहात तर किमान शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी उपोषण करतो आहे, अशीच भूमिका घ्यायला हवी व ज्या दिवशी शेतकरी सन्मानाने दिल्लीतले आंदोलन संपवतील त्याच दिवशी माझे उपोषण संपेल अशी भूमिका घेतली असती तर अण्णांच्या वयामुळे व उपोषणाच्या धोक्यामुळे सरकारवर दडपण वाढायला मदत झाली असती व देशातील सर्व शेतकरी व आंदोलक यांच्याशी पुन्हा एकदा जोडले गेले असते. परंतु अण्णांनी त्यांच्या मागील उपोषणातील मागण्या इतकाच संदर्भ ठेवल्याने सरकारला त्याच मर्यादेत ठेवणे सोपे गेले व उपोषण मागे घेतले गेले, चूक असेल तर ही आहे. अण्णांनी देशातील संदर्भ लक्षात न घेता आंदोलन मागे घेतले ही खरी गंभीर चूक आहे.

अण्णा दोन्हीकडूनही मार खातात; ही पण एक समस्या आहे. समजा त्यांनी उपोषण सुरू केले असते व सरकारने त्यांना खूप महत्त्व दिले असते तर शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी व आंदोलनाचे श्रेय अण्णांना देण्यासाठी सरकार ही चाल खेळत आहे अशी टीका दुसरीकडून झाली असती त्यामुळे काहीही झाले तरी अण्णा आता टीकेतून सुटत नाही असे झाले आहे.

पण अण्णा भाजपाचे खेळणे आहेत व नागपूरच्या दडपणाखाली अण्णा काम करतात, अशी जी भाषा वापरली जाते, ती मात्र चुकीची आहे. याचे कारण समजा भाजपसाठी अण्णा काम करतात असे गृहीत धरले तर त्याबदल्यात अण्णा ना काय मिळवायचे आहे ? असा उलटा प्रश्न विचारायला हवा. एकतर पद्मविभूषणपर्यंतचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मंदिरात राहणारे संपत्ती घेऊन या वयात ते काय करतील ? त्यांना कोणाला तिकीट मिळवायचे नाही. त्यामुळे ही तडजोड ते दडपणाखाली का करतील याची चर्चा अशी टीका करायला हवी व मोदी त्यांच्या पत्रालाही किंमत देत नाही यावरून अण्णा भाजप नाते लक्षात घ्यावे. स्वभावदोष हा की कुणी आदर दाखवला की ते हुरळून जातात व फडणवीस यांना ते जमते.

अण्णांना मी जवळून बघितल्यामुळे दोष हा दिसतो की गेल्या सहा वर्षात या सरकार विरोधात तुम्ही काहीच केले नाही ही टीका सातत्याने होत असल्याने त्या कॉम्प्लेक्समधून अण्णा या सरकार विरोधात काही करायला जातात व लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. मोदी-शाह त्यांना जुमानत नाही. वय साथ देत नाही, त्यामुळे त्यातून ते सन्मानाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा पुन्हा फसतात असे त्यांचे मनोविश्लेषण आहे. दुसरा भाग असा की कोणत्याच संघटनात्मक रचनेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले नाही की वाचन-चिंतन हेसुद्धा केले नाही. त्यामुळे संघटनेचे शास्त्र, आंदोलनाचे शास्त्र, चळवळी या संकल्पनांशी त्यांचे काहीच नाते कधी आले नाही व कार्यकर्ते टिकले नाहीत. त्यामुळे त्यांचा पूर्ण व्यवहार हा व्यक्तिवादी आहे. ते स्वतःच्या व्यक्तीवादा भोवतीच फिरत राहतात. आतासुद्धा पूर्वी मी केलेल्या मागण्या व त्याला प्रतिसाद इतक्‍याच स्वतःभोवती ते फिरत राहिले. परंतु शंभर शेतकरी जिथे मृत्यू पावले त्या आंदोलनाला जोडून घ्यावेसे त्यांना वाटले नाहीत.

तेव्हा त्यांचा एक हितचिंतक म्हणून विलक्षण वेदनाही होतात. अश्रू येतात आणि त्यांचा रागही येतो. पण तरीही सोशल मीडियात ज्या वाईट भाषेत त्यांच्यावर टीका होते, त्या भाषेत मी कधीच टीका करणार नाही याचे कारण या माणसाने विविध कायदे येण्यासाठी केलेले योगदान, दारूबंदी, दप्तर दिरंगाई, पाणलोट व हजारो गावांना दिलेली प्रेरणा, भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसाच्या मनात जागा केलेला संताप आणि दिलेला लढा आणि एक अर्धशिक्षित मनुष्य त्याच्या आयुष्यात एकांडेपणाने किती विषय पुढे नेऊ शकतो, याचे हे उदाहरण असल्यामुळे त्यांच्या भूतकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आणि त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना समजूनही घ्यावेसे वाटते. अण्णांनी आता शांतपणे निवृत्त व्हायला हवे व समाजानेही त्यांचा भूतकाळ आणि योगदान लक्षात घेऊन असभ्य भाषा न वापरता त्यांना समजून घ्यायला हवे, हेच वाटते हे लिहितानाही वेदना होतात. मतभेद टीका करायला हवी, पण ८० वर्षाच्या अण्णांवर थेरडा, म्हातारा,अशा नीच भाषेत टीका करणाऱ्यांना फक्त इतकेच विचारावेसे वाटते की, अशी हिंमत तुम्ही अजित पवार,राज ठाकरे ,उद्धव ठाकरे चुकले तर या भाषेत करणार का? नाही करणार कारण त्यांचे कार्यकर्ते घरात घुसून मारतील आणि अण्णा काहीच बिघडवत नाही म्हणून का? केवळ soft target म्हणून ही हिंमत? तेव्हा अण्णांना सोशल मिडीयातून सन्मानाने सेवानिवृत्त करू या आणि आपण आता लढू या. त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा ते जास्त महत्वाचे ठरेल.

हेरंब कुलकर्णी

(अण्णा हजारे यांचा समर्थक,चाहता)

Similar News