"कुर्बानीचा नवा अर्थ" सांगणाऱ्या मुस्लिम युवकांशी महाराष्ट्र अंनिस चा संवाद

Update: 2021-07-23 06:41 GMT

बकरी ईद च्या सणाला मुस्लीम बांधव बकरा का कापतात? नवीन पद्धतीने बकरा न कापता कुर्बानी दिली जाऊ शकते का? मुस्लीम युवक का अस्वस्थ आहे. मुस्लीम तरुणांशी अंनिस ने साधलेला संवाद

बकरी ईद निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या "कुर्बानीचा अर्थ नवा" या उपक्रमां अंतर्गत "भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन" या विषयावर दोन युवा मुस्लीम कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

या ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये पुणे येथून आर्थिक कुर्बानी संकल्पना राबवणारे पैगंबर शेख आणि पत्रकार समीर शेख या दोघांशी अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य फारूक गवंडी यांनी संवाद साधला.

दोन तास चाललेल्या संवादाच्या कार्यक्रमांस श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विचारलेल्या प्रश्नांना अतिशय संयमी आणि अभ्यासू उत्तरे समीर आणि पैगंबर यांनी दिली.

का दिली जाते कुर्बानी?

पैगंबर शेख हे गेल्या आठ वर्षांपासून मुस्लिम समाजात बकरी ईद निमित्त 'आर्थिक कुर्बानी' ही संकल्पना चालवत आहेत. ही कल्पना त्यांना पवित्र कुराणातुन सुचली असल्याने सांगून त्यांनी या मागील आपला विचार सांगितला. प्रेषित इब्राहिम पासून ही परंपरा चालू असून त्यामागे आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग, समर्पण करणे ही प्रामाणिकपणाची भावना कुर्बानी मागे आहे. प्रेषित इब्राहिम यांनी अल्लाह च्या आदेशानुसार आपला मुलगा बळी न देता. प्रतीकात्मक रित्या विशिष्ट बोकड बळी दिला गेला आणि याचे प्रतीक म्हणून दरवर्षी मुस्लिम समाज बोकडाची कुर्बानी करीत आहे. मुस्लिम समाज पैसे खर्च करून बोकड विकत घेतो आणि तो अल्लाह साठी कुर्बान करतो आणि मांसाचा वाटा गरिबांना देतो.

काय आहे 'आर्थिक कुर्बानी' संकल्पना?

आताच्या काळात मांस कुर्बान करण्यापेक्षा आर्थिक कुर्बानी करून गरीब मुस्लिम समाजातील विद्यार्थी यांना शिक्षणासाठी हा पैसा उपयोगात आणून समाजासमोर एक चांगला पर्याय ठेवू शकतो. असे पैगंबर शेख यांनी सांगितले. अश्या प्रकारे आर्थिक कुर्बानीतून त्यांनी सांगली कोल्हापूर तसेच केरळ येथील पूरग्रस्तांना देखील मदत केली असल्याचे सांगितले. या उपक्रमास सुरुवातीच्या काळात विरोध झाला होता पण 'अल्ला ला संयमी व्यक्ती आवडतो' या कुराणातील शिकवणीनुसार या विरोधास अत्यंत सयंमीतपणे हाताळलेने सध्या या उपक्रमात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. असेही पैगंबर शेख यांनी सांगितले.

समीर शेख म्हणाला की, मुस्लिम समाजातील अंधश्रद्धा या इतर बहुसंख्य समाजातील अंधश्रद्धा या बहुतांशी एकच आहेत. कारण तो इतरांप्रमाणेच इथलाच भूमिपुत्र आहे. त्याने फक्त धर्म बदलला आहे. त्याची उपासना पद्धती बदलेली आहे. पण सगळे जगणे शेजारच्या इतर बहुसंख्य समाजासारखे आहे.

दर्ग्याच्या भोवती पसरलेली अंधश्रद्धा...

त्याच्या अंधश्रद्धा दर्ग्याच्या भोवती पसरलेल्या आहेत. त्यामुळे गंडे, दोरे,ताईत, करणी,भानामती, भुताने झपाटने, अंगात येणे, हे सर्व बहुसंख्य समाजासारखेच आहे. मुस्लिम समाजाच्या अनेक रूढी, प्रथा, परंपरा या त्याच्या जन्मापासून मरेपर्यंत एकच आहेत.

जगभरात कुठेही एकजिनसी समाज अस्तित्वात नाही. अनेक जाती, पंथ, विचार भेदात तो विभागलेला असतो. ही सर्वमान्य असलेली सामान्य बाब मात्र, मुस्लिम समाजाबाबत मान्य केली जात नाही. हे धक्कादायक असल्याचे त्याने सांगितले. आज मुस्लिम समाज बदलत आहे, चूकीच्या रुढी पंरपरेविरोधात सुशिक्षित मुस्लिम युवा विचार करत आहेत.

मुस्लिम तरुणांना सामाजिक चळवळीशी कसे जोडून घेता येईल? या प्रश्नाचे पैगंबर आणि समीर ने दिलेले उत्तर सर्वच श्रोत्यांना आतून विचार करायला लावणारे होते. ते म्हणाले

मुस्लिम तरुण प्रचंड अस्वस्थ आहे. दंगली, मॉब लिंचिंग मुळे

तो प्रचंड असुरक्षित फील करत आहे. इतर तरुणासारखेच त्याचे रोजी, रोटी, कपडा, मकान चे प्रश्न असताना त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे.

देशभक्तीचे सर्टिफिकेट खिशात घेउन फिरण्यासाठी त्याचेवर दबाब आहे. प्रसारमाध्यमे स्वतः च्या टीआरपी साठी एखाद्या विखारी मुस्लिम पुढाऱ्यास समोर आणून त्यांचे विखारी प्रचारास बढावा देतात आणि तिच्या विखारी भूमिका समस्त मुस्लिम समाजाची आहे हे भासवतात, हे अत्यंत चूक आहे, याचे अनेक गंभीर परिणाम मुस्लिम समाजाला भोगावे लागतात.

संयमीत, सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या मुस्लिम पुढाऱ्यांना प्रसारमाध्यमात मुद्दामहून डावलले जाते. हे कटूसत्य आहे. म्हणून पुरोगामी सामाजिक चळवळींनी आणि बहुसंख्य समाजाने मुस्लिम युवकांना सुरक्षितता, विश्वास आणि आधार दिल्यानंतर मुक्त विचारासाठी वातावरण तयार झाल्यास तो नक्की सामाजिक चळवळीत सहभागी होऊ शकेल.

संवादक फारूक गवंडी यांनी प्रास्ताविकामध्ये आणि प्रश्नोत्तराच्या दरम्यान अंनिसची भूमिका ही कोणत्याही देवाधर्माच्या विरोधात नसून अंधश्रद्धेच्या चुकीच्या रूढी प्रथा परंपराच्या विरोधात असल्याचे सांगितले. त्यासाठी अनेक उदाहरणे देऊन हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्या दहा वर्षांपासून अंनिस बकरी ईद निमित्ताने रक्तदानाचा अभिनव कार्यक्रम आयोजित करते. आणि यावेळी देखील अंनिसच्या अनेक शाखांकडून रक्तदानाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमांमध्ये वक्त्यांची ओळख अंनिस राज्य कार्यकारणी सदस्या मधुरा सलवारु, (सोलापूर) आणि बाळासो मुल्ला (गडहिंग्लज) यांनी करून दिली तर आभार संदेश गायकवाड (पेण) यांनी मानले.

Tags:    

Similar News