डोळस असून आंधळा: डॉ. रुपेश पाटकर

आपल्याला ताप आला तर आपल्याला आपण ठीक नसल्याचे कळते. अपचन झाले तर कळते, पाय मुरगळला तर कळते. मी थोडा विचार केला तेव्हा मला जाणवले की मला टेंशन आले तरी बरे नाही हे कळते, चिंता वाटली तर कळते, निराश वाटले तर कळते. मग ज्याला आजार आहे पण त्याला बरे नाही असे वाटतंच नाही असा पेशन्ट कसा असेल? मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केलेलं अनुभवकथन.;

Update: 2022-08-11 13:00 GMT

मी एमबीबीएस झाल्यानंतर इंटर्नशिपसाठी गोवा मेडिकल कॉलेज निवडले होते. त्याकाळी आमच्या विद्यापीठात इंटर्नशिपच्या बारा महिन्यांपैकी दोन महिने तुम्हाला आवडेल त्या विषयात काम करण्याची सोय होती. त्यातील एक महिना मी सायकीयॅट्री विषय निवडला. त्यावेळी गोवा मेडिकल कॉलेजचे सायकीयॅट्री डिपार्टमेंट पणजीतील आल्तिन्हो या टेकडीवर होते. पहिल्याच दिवशी ओपीडीत जायच्या आधी माझ्या सिनीयरने पेशन्टची हिस्ट्री कशी घ्यावी, त्याच्या मानसिक अवस्थेची तपासणी कशी करावी या गोष्टी समजावून दिल्या. शारीरिक आजारांच्या तुलनेत मानसिक आजारांची तपासणी अनेक बाबतीत वेगळी होती. त्यातील एक मुद्दा तर मला खूपच विलक्षण वाटला. तो म्हणजे इनसाईट (insight). इनसाइट म्हणजे पेशंटला आपल्या आजाराची किती जाणीव आहे, हे तपासणे.

सिनयर म्हणाला, काही पेशन्टना झिरो इनसाइट असते म्हणजे आपल्याला आजार झालाय हेच त्यांना ठाऊक नसते. मी त्या क्षणापर्यंत असेदेखील असू शकते याचा विचारच केला नव्हता. आपल्याला ताप आला तर आपल्याला आपण ठीक नसल्याचे कळते. अपचन झाले तर कळते, पाय मुरगळला तर कळते. मी थोडा विचार केला तेव्हा मला जाणवले की मला टेंशन आले तरी बरे नाही हे कळते, चिंता वाटली तर कळते, निराश वाटले तर कळते. मग ज्याला आजार आहे पण त्याला बरे नाही असे वाटतंच नाही असा पेशन्ट कसा असेल? मला त्याची कल्पनाच करता येईना. पण त्यादिवशी ओपीडीत सायकोसिसचे चार पेशन्ट पाहिले आणि मला हा मुद्दा पटला की आजारी असून आजारी नाही असे वाटणे म्हणजे काय.

नंतर मी सायकीयॅट्री याच विषयात पोस्ट ग्रॅज्युएट होण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत गेलो. पण सायकोसिस वगळता इतर कोणत्या आजारात इनसाइट झिरो असेल याची कल्पना मात्र मला येत नव्हती. आमच्या डिपार्टमेंटमध्ये श्वेता म्हणून एक सायकॉलॉजिस्ट होत्या. माझ्या इनसाइटबाबतच्या कुतूहलासाठी त्यांनी मला पहिल्यांदा ऑलिव्हर सॅक्स यांचे 'मॅन हू मिसटूक हिज वाईफ फाॅर ए हॅट' असे लांबलचक नाव असलेले पुस्तक वाचायला दिले. त्यातील पाहिल्याच कथेचे नाव पुस्तकाला देण्यात आले होते. मी ती पहिली कथा त्याच दिवशी वाचून काढली. ती एका संगीत शिक्षकाची कथा होती. एकदम अजब. मी अशी केस माझ्या त्यापूर्वीच्या मेडिकल शिक्षणाच्या काळात पाहण्याचे सोडाच, ऐकली देखील नव्हती. डॉ.ऑलिव्हर यांच्याकडे त्या संगीत शिक्षकाला डोळ्यांच्या डॉक्टरकडून रेफर करण्यात आले होते. त्याला पाहताच त्याला काही आजार असेल असे वाटत नव्हते.'काय म्हणता डॉ. पी? काय प्रॉब्लेम आहे?' डॉ. ऑलिव्हरनी विचारले.

'मला तर सगळे ठीक वागतेय. पण आमची मंडळी म्हणतात की काही नजरेचा प्रॉब्लेम आहे. डोळ्यांच्या डॉक्टरना दाखवले पण त्यानाही काही आढळले नाही. आणि हा, नुकतेच डायबेटिस झाल्याचे कळले,' डॉ. पी म्हणाले. डॉ. पींची डॉक्टरेट संगीत विषयात होती.

'यांना बर्‍याचदा माणसे ओळखता येत नाहीत,' डॉ. पींच्या सौभाग्यवती म्हणाल्या.

'दूर असलेले ओळखता येत नाहीत का?'

'तसं नाही. जवळ असलेल्या व्यक्तीला देखील कधीकधी ओळखत नाहीत.'

'अनोळखी व्यक्तींच्या बाबतीत असं होतं का?'

'नाही. यांच्या विद्यार्थ्यांनादेखील हे ओळखत नाहीत.'

'त्यांना ते दुसरेच कोणी वाटतात का?'

'नाही.'

'स्मृती किंवा लक्षात राहण्यात काही प्रॉब्लेम आहे का?'

'नाही. ते आजही विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक आहेत. कोणताही राग, कोणतेही गाणे ते अचूक म्हणतात.'

'त्यांना वेळेचे भान राहते का? सकाळ आहे की दुपार आहे वगैरे?'

'अगदी व्यवस्थित.'

'आपण कुठे आहोत, ते विसरतात का?'

'नाही.'

'डॉ. पी तपासणीच्या टेबलवर बसा,' डॉ. ऑलिव्हरनी त्यांची नेहमीची न्यूराॅलाॅजीकल तपासणी केली. स्नायूंची ताकद, टोन, स्पर्शज्ञान, रिफ्लेक्स तपासले. ते सर्व नॉर्मल होते. त्यांच्या बोलण्यात कोणतीच विसंगती जाणवत नव्हती. छान हसतमुख व्यक्ती होते, डॉ. पी!

डॉ. ऑलिव्हर आपल्या खुर्चीत येऊन बसले. पण मिनिट होऊन गेले तरी डॉ. पी तपासणीच्या टेबल जवळच घुटमळत होते. म्हणून डॉ. ऑलिव्हरनी कर्टन बाजूला केले. त्यांनी प्लांटार रिफ्लेक्स पाहण्यासाठी डॉ. पीना मोजे काढायला लावले होते. पण अजून डॉ. पीनी अजून मोजे परत पायात घातलेच नव्हते.

'डॉ. पी, मी मदत करू का?'

'मदत? कशासाठी?'

'मोजे घालायला.'

'हो. मोजे.'

डॉ. पी स्वतःच्या पावलाकडे पहात राहीले.

'मोजा...' म्हणून ते स्वतःच्या पावलाकडे हात वळवले.

'तो तुमचा पाय आहे. तो तिथे मोजा आहे. माझी फिरकी घेता का डॉ. पी?' डॉ. ऑलिव्हरनी विचारले.

डॉ. पी खळखळून हसले.

'हे अलीकडे असेच करतात. यांचा विनोद होतो आणि आमची दमछाक होते,' सौभाग्यवती पी म्हणाल्या.

'असेच म्हणजे कसे? जरा तपशीलाने सांगता का?' डॉ. ऑलिव्हरनी विचारले.

'अनेकदा असे होते की यांचा एखादा विद्यार्थ्यी यांच्याकडे येतो, पण हे त्याला ओळखत नाहीत. पण तो काही बोलले रे बोलला की ओळखतात. आणि जिथे कोणी नाही तिथे यांना माणसे दिसतात.'

'म्हणजे भास होतात का?'

'भास नाही. रस्त्याने जाताना पाण्याच्या नळाचा खुंट दिसला किंवा पार्किंगचा मिटर दिसला तर लहान मुल असल्यासारखे थोपटतात. यांचा एक मित्र म्हणतो हे आता झेन संप्रदायाचे झालेत, विरोधाभासी बोलतात.'

सौभाग्यवती पी यांचे हे वाक्य वाचताना मला जपानी शेतीतज्ञ मासानोबू फुकूओका यांची आठवण झाली. त्यांच्या पुस्तकात त्यांनी झेन तत्त्वज्ञान मांडताना विरोधाभासी भाषा वापरली आहे. 'या जगात काहीही नाहिये... मला काहीही समजलेले नाही असे मला वाटले....' असे वर्णन करून ते पुढे लिहितात, 'ज्याला खराखुरा निसर्ग म्हणता येईल तो माझ्यासमोर प्रकट झाला.' डॉ. पी असे काही मांडत असावेत का?

डॉ. ऑलिव्हर यांनी त्यांची तपासणी चालू ठेवली. डॉ. पी यांची नजर ठीक होती. त्यांनी जमिनीवर पडलेली टाचणी बरोबर उचलली. डॉ. ऑलिव्हरच्या टेबलवर 'नॅशनल जिऑग्राफीकल मॅगझिन'चा अंक होता. तो त्यांनी डॉ. पीच्या हातात दिला. ते बारीक बारीक तपशील पाहू लागले आणि सांगू लागले. कुठे रंग गडद आहे, कुठे फिका आहे, कुठे सरळ रेघ आहे, कुठे गोलाई आहे असे वर्णन ते करत होते. पण त्या रंगांच्या विविध छाटांमुळे, त्यातील उभ्या आडव्या रेघांमुळे कोणते चित्र तयार होतेय, ते मात्र ते सांगेनात. त्या रेघांचा, वेगवेगळ्या रंगछटांचे नाते जुळून एक सबंध चित्र तयार होतेय ते जणू त्यांना कळतंच नव्हते. खर म्हणजे डॉ. पी डॉ. ऑलिव्हर यांच्या खोलीत आल्यापासून डॉ. ऑलिव्हरना त्यांच्या नजरेत एक विचीत्रपण जाणवत होते. डॉ पी त्यांच्याकडे पाहत असताना त्यांची नजर कधी त्यांच्या हनवटीकडे रोखली आहे, तर कधी उजव्या कानावर, तर कधी नाकावर रोखली आहे असे जाणवत होते, जणू ते त्यांच्या चेहर्‍याचा बारकाईने अभ्यास करत असावेत. ते अख्खा चेहरा आणि त्याच्यावर दिसणारे बदलते भाव त्यांना दिसतंच नसावेत.

त्या 'नॅशनल जिऑग्राफीकल मॅगझिन' च्या मुखपृष्ठावर सहार वळवंटाचे चित्र होते, रेतीचे नैसर्गिक ढीग दाखवणारे. डॉ. ऑलिव्हरनी ते मुखपृष्ठ दाखवून त्यांना विचारले, 'इथे काय दिसतेय तुम्हाला?'

'मला एक नदी दिसतेय! एक छोटेसे गेस्टहाऊस आहे, ज्याची गच्ची पाण्यावर तरंगतेय. गच्चीवर लोक मेजवानी करताहेत. इकडे तिकडे वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या दिसताहेत. असे वाटत होते की ते त्या चित्राच्या आरपार पाहत आहेत आणि तिथे नसलेल्या गोष्टींची कल्पना करून सांगत आहेत, जणू त्या गोष्टींचे तिथे नसणे त्यांना कल्पना रंगवायला भाग पाडत आहेत. या अनपेक्षित उत्तराने डॉ.ऑलिव्हरच्या चेहर्‍यावरचे भाव बदलणे साहजिक होते. पण ते डॉ. पीना जाणवले नाहीत. आपण छान उत्तरे दिलीत असेच त्यांना वाटत होते. त्यांच्या चेहर्‍यावर स्मित होते. डॉ. ऑलिव्हरनी डॉ.पीच्या नजरेची तपासणी पुढे चालू ठेवली. पेटीच्या आकाराचा ठोकळा त्यांनी त्यांच्या पुढ्यात धरला. 'ए क्युब!' डॉ. ऑलिव्हरनी दाखवलेल्या लाकडाच्या ठोकळ्यांचे आकार त्यांनी अचूक ओळखले.

डॉ. ऑलिव्हरच्या टेबलवर फ्लॉवरपॉटमध्ये एक ताजे गुलाब होते. ते त्यांनी डॉ. पीना दिले. डॉ. पीनी ते एखाद्या वनस्पतीशास्त्रज्ञाने धरावे तसे हातात धरले आणि ते वर्णन करू लागले, 'साधारण सहा इंच लांबी आहे. लाल रंगाची गुंडाळी केलेली रचना आहे जिला हिरवी बारीक कडी आहे!'

'बरोबर, पण ते काय आहे?'

डॉ. पीना सांगता येईना.

'त्या लाल गुंडाळीचा वास घेऊन पहा,' डॉ. ऑलिव्हर म्हणाले.

डॉ.पीनी वास घेतला आणि एकदम म्हणाले, 'ताजे टवटवीत गुलाब! किती सुंदर!'

तितक्यात डॉ. ऑलिव्हरना दुसर्‍या एका पेशंटसाठी नर्सने दुसर्‍या खोलीत बोलावले. डॉ. ऑलिव्हर जेव्हा परत आले, तेव्हा डॉ. पी खिडकीत उभे होते. पण ते खिडकीतून रस्ता पहात नव्हते, रस्ता ऐकत होते. 'गाड्यांचे हॉर्न, घरघर, ब्रेकचा आवाज हे सगळे कसे अगदी एक वेगळेच संगीत तयार करते ना,' डॉ. पी म्हणाले. हे उद्गार वाचत असताना मला माझे बालपण आठवले. पीठ दळणार्‍या चक्कीच्या आवाजात आम्हाला बडबड गीताचे सूर ऐकू येत. बस मधून प्रवास करताना असेच संगीत ऐकू येई आणि आमच्या तोंडून बालगीते सुरू होत. डॉ. पीशी बोलताना त्यांचा संगीताचा अफाट व्यासंग, त्यांचा संगीतातला अधिकार डॉ. ऑलिव्हरना जाणवत होता. या माणसाला आजही त्याच्या संगीत विद्यालयाने उपकार म्हणून कामावर ठेवलेले नाही, हा माणूस त्यांच्या विद्यालयाचे भूषण असला पाहिजे, असे डॉ. ऑलिव्हरना वाटून गेले.

तपासणी पूर्ण झाली असे वाटून डॉ. पी निघण्यासाठी डॉ. ऑलिव्हरची परवानगी घेत म्हणाले,'बरे मग डॉक्टर, मला काय बरे नाही, असे तुमचे निदान आहे?'

'तुम्हाला काय बरे नाही, हे मी सांगू शकत नाही. पण तुम्ही एक उत्तम संगीतकार आहात!' डॉ.ऑलिव्हर म्हणाले.

स्मित करत डॉ. पी उठू लागले पण उठताना त्यांनी त्यांच्या शेजारी बसलेल्या बायकोचे डोके पकडले. 'काय झाले डॉ. पी?'

डॉ. पीना त्यांच्या बायकोचे डोके ही त्यांची टोपी असल्याचे वाटले. चूक लक्षात आणून देताच 'माझे डोळे...' असे पुटपुटत त्यांनी आपली चूक कबूल केली.

डॉ. पीना दिसण्यात काही प्रॉब्लेम नव्हता हे तर स्पष्ट होते. पण जे दिसतेय त्याचा अर्थ काय हे मात्र त्यांच्या मेंदूला शोधता येत नव्हते. त्यांना रंग, कडा, आकार दिसत होते. पण हे सर्व मिळून काही अर्थपूर्ण बनते ते मात्र कळत नव्हते. आपल्याला दिसणार्‍या गोष्टीतला अर्थ शोधण्याची त्यांच्या मेंदूची क्षमता काम देत नव्हती. आणि आपण ती क्षमता गमावली आहे, हेदेखील त्यांना माहीत नव्हते.

मग त्यांचे रोजचे काम व्हायचे कसे? डॉ. ऑलिव्हरना देखील याचे कुतूहल होते. त्यांनी लवकरच डॉ. पीना त्यांच्या घरी भेट दिली. आवाजावरून चटकन ओळखण्याचे कौशल्य डॉ. पीनी विकसित केले होते. त्यामुळे डॉ. ऑलिव्हरनी 'नमस्कार' म्हणताच डॉ. पीनी त्यांना ओळखले. सौभाग्यवती पीनी कॉफी आणि केक आणले. बशीतला केक घ्यायला डॉ. पीनी कसलेतरी गाणे गुणगुणत हात पुढे केला, इतक्यात दरवाज्याची बेल कर्कश वाजली. त्या आवाजाने डॉ. पींचे लक्ष विचलित झाले आणि ते गोंधळले. सौभाग्यवती पीनी कपात कॉफी ओतताच कॉफीच्या वासाने पुन्हा ते खाण्याकडे वळले. सौभाग्यवती पी डॉ. पीसाठी आंघोळीचे पाणी, कपडे वगैरे आधीच काढून ठेवत असत. आणि डॉ. पी आपली सगळी कामे गाणी गुणगुणत पूर्ण करीत. एखाद्या अचानक आलेल्या आवाजाने त्यांना विचलित केले तर मात्र ते हरवून जात. गाणे हेच त्यांचे जीवन बनले होते. संगीताच्या सुरांवर ते जग हाताळत होते.

डॉ. पीना व्हिज्युअल अग्नोसिया होता. त्यांच्या मेंदूचा दृश्यांचा अर्थ लावणारा भाग बिघडला होता. डॉ. पींची गोष्ट वाचल्यावर मला निसर्गाच्या किमयेचे कौतुक वाटले. किती वैशिष्टय़पूर्ण कामे करण्याची क्षमता आपल्या मेंदूकडे आहे आणि ती आहे, हेच आपल्याला जाणवत नाही.

मी डॉ. पींची गोष्ट एका मित्राला ऐकवली. ती ऐकल्यावर तो मला म्हणाला, 'समजा कधी रस्त्यात भेटल्यावर तू मला ओळख दाखवली नाहीस, तर मला तुझा राग नाही येणार, उलट तुझी दया वाटेल. मी समजून घेईन की तुला व्हिज्युअल ॲग्नोसिया झाला आहे!'

Tags:    

Similar News