सुनक म्हणजे 'हिंदू धर्माची ब्रिटीश व्यक्ती!' – डॉ. प्रदीप पाटील
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आणि आपल्या देशात प्रत्येकाची छाती गर्वाने फुलली. पण ऋषी सुनक हे जरी हिंदू आणि भारतीय वंशाचे असले तरी मनाने ते पक्के ब्रिटीश आहेत. यावरून ब्रिटीशांची मानसिकता बदलली आहे का? हे जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. प्रदीप पाटील यांचा हा लेख!
ॠषी सुनक इंग्लंडचे पंतप्रधान झाले म्हणून हिंदुत्ववाद्यांना आनंदाचे भरते आले आहे. कारण हिंदू पंतप्रधान झाला!
'हिंदू धर्माची ब्रिटीश व्यक्ती' असे सुनक आहेत.
जसे की मुसलमान धर्माची भारतीय व्यक्ती. ख्रिश्चन धर्माची भारतीय व्यक्ती. धर्म कोणताही असला तरी प्रेम आणि अधिकार राहत असलेल्या राष्ट्रावर राहणार. भारत आणि इंग्लंड यांच्यात मॅचपासून ते राजकीय धोरणांपर्यत मतभेद झाले तर सुनक हिंदू नसतील. ते राष्ट्रहित जपतील. इथे हिंदुत्ववाद्यांचे हुरळणे फक्त वंशवादी आहे.
स्वतः सुनक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की " ब्रिटन हे माझे घर आहे , माझे राष्ट्र आहे. जरी मी इथे अल्पसंख्य असलो तरीही!" निवडणुकीवेळी सुनक यांनी आश्वासन दिले आहे की.."ते राष्ट्राची पुर्नबांधणी करतील, अर्थ व्यवस्था बळकट करतील आणि ब्रिटीशांच्या विश्वासास पात्र ठरतील. माझा धर्म म्हणजे, 'राष्ट्रप्रेम, स्वच्छ कारभार आणि कष्ट ' हे आहे. भारतीय ब्रिटीश ही माझी अल्पसंख्याक म्हणून ओळख असली तरी मी कडवा ब्रिटीश आहे " हिंदुत्ववाद्यांनी अल्पसंख्याकांना राष्ट्रद्रोही ठरविले आहे. तसे "इंग्रज नॅशनॅलिस्ट " सुनकांना राष्ट्रद्रोही ठरवत नाहीत. कारण तेवढी समज अजुनही मेलेली नाही. मरेल त्या दिवशी ब्रिटनचा हिंदुस्थान होईल.
केवळ सुनक यांनाच ब्रिटिशांनी स्थान दिलेय असे नाही. पाकिस्तानी मूळ असलेले साजिद जाविद आणि इराकी मुळाचे नदीम झाहावी हेही सुनक यांच्याइतकेच महत्त्वाच्या स्थानावर आहेत. काँझरव्हेटीव पार्टीत त्यांना महत्त्वाचे अधिकार आहेत. इथे कौतुक ब्रिटिशांचे आहे. धर्मनिरपेक्षतेचे आहे. हिंदुत्ववाद्यांना तर हिंदू राष्ट्र हवे आहे. आता तर ख्रिश्चन बहुसंख्यांकांच्या राज्यात हिंदू राष्ट्र उदयास आल्याची स्वप्नं हिंदुत्ववाद्यांना पडली आहेत.
'धर्म राजकारणास दुर्गंधीत करतो' हे सुनकांनी सुनावले आहे. सुनक भारतात का परतले नाहीत? कारण ते म्हणतात.." जिथे सर्वोत्तम अशी रहाण्याची व्यवस्था असेल जसे की उद्योजकतेसाठी पाठबळ, कुटुंबासाठी सर्वोत्तम वातावरण, सर्वोच्च शिक्षण देणारी व्यवस्था, सामाजिक मुल्यांचा सन्मान, जे ब्रिटनमध्ये आहे ते माझे निवासस्थान. आणि असे ब्रिटीशपण माझ्यात आहे!" हिंदुस्थानात सुनक आले असते तर सारे काही भगवे मिळाले असते!! इथे नावालाच बंधुता, समता शिल्लक आहे. मुल्यांची तर बातच सोडा.
यॉर्कशायर मधील एक शेतकरी सुनकांना पाहून म्हणाला की हा नवा विल्यियम हेग आहे. (हेग हे यार्कशायरचे नेते). जरा कमी गोरा आहे पण चांगला माणूस आहे. हिंदुत्ववाद्यांना दाढी-टोपीच्या अॅलर्जीमुळे असे बोलणे तर सोडाच रागही आवरत नाही.
बदललेल्या ब्रिटीशांचे खरे तर कौतुक हवे. परदेशी व्यक्ती मग ती कोणत्याही धर्माची असो त्यांनी स्विकारली आहे. परदेशातून येऊन राहिल्यावर देखील आपलेच मानणे यासाठी मोठे अंतःकरण लागते.
सुनक यांनी गीतापठण केले. करू दिले हे जास्त महत्त्वाचे. हे लोकशाही मूल्य आहे. हिंदुत्ववादी नाही. तिथे ते लांगूलचालन ठरत नाही. तिथे ते राष्ट्रद्रोही होत नाही हिंदुत्ववाद्यांत मात्र ते ठळकपणे असते. ज्या दिवशी सुनकांच्या पार्टीत इंग्रज राष्ट्रवादी प्रबळ होतील त्यादिवशी तेथेही ते टिकणार नाहीत.
धर्माच्या, वंशाच्या नावाने जयजयकार हिटलर रूपात साऱ्या जगाने पाहिलाय. तो भारतात रूजलाय त्याला सुनक तरी काय करणार?
डॉ. प्रदीप पाटील