"महाराष्ट्रातील राजकारण: सत्ता संघर्ष, पक्षांतर आणि मतदारांची भूमिका"

"महाराष्ट्रातील राजकारण: सत्ता संघर्ष, पक्षांतर आणि मतदारांची भूमिका" विकास परसराम मेश्राम यांचा लेख

Update: 2024-11-08 10:58 GMT

महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे राज्य मानले जाते. येथील लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास ९% आहे, परंतु हे राज्य देशाच्या GDP मध्ये तब्बल १३% योगदान देते. मुंबई ही शहर केवळ राज्याची राजधानी नसून, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबई शेअर बाजार, बँका, वित्तीय संस्था आणि बरेच उद्योगधंदे येथे आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र देशाचा कणा समजला जातो. हे सर्व पाहता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव पाडतात.

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला होता. बाल गंगाधर टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या नेत्यांनी सामाजिक सुधारणांचे आणि राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी महाराष्ट्रातील नागरिक जागरूक आहेत, आणि राज्यातील निवडणुका नेहमीच विचारपूर्वक आणि व्यूहरचनेसाठी ओळखल्या जातात.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात विविध पक्षांचा आणि नेत्यांचा सहभाग आहे. प्रमुख पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. पूर्वी शिवसेना आणि भाजप यांनी महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली होती. परंतु २०१४ पासून भाजपने स्वतंत्रपणे शिवसेनेच्या विरोधात लढा दिला, शिवसेना मात्र भाजपचा मित्र पक्ष राहिला. आता शिवसेना दोन गटांमध्ये विभागली आहे – एक गट उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा एकनाथ शिंदे यांचा. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन भागांत विभागली आहे. हे विभाजन सध्या राज्याच्या निवडणूक राजकारणात अधिक गोंधळाचे कारण ठरले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने २६% मतांचा वाटा घेतला, तरी त्यांचे जागांचे संख्यात्मक प्रमाण घटले आहे. हा विरोधाभास पक्षाच्या पुढील रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरला आहे. भाजपने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार आणि जनसंपर्कावर भर दिला आहे. दुसरीकडे, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आहे, ज्याचा उद्देश भाजपच्या वाढलेल्या प्रभावाला सामोरे जाणे आहे.

भाजपने जातीय, धार्मिक आणि सामाजिक धृवीकरणावर आधारित प्रचाराचा आधार घेतला आहे. यात राष्ट्रवाद आणि धर्माची भावना वापरली जात आहे. विरोधकांना धर्म आणि जातीयतेवरून विभाजित करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. महाविकास आघाडीला मात्र याला प्रत्युत्तर म्हणून अधिक वैचारिक प्रचाराची तयारी करावी लागत आहे. जातीय आरक्षण, धर्मनिरपेक्षता, संविधानवाद हे मुद्दे विरोधकांकडून पुढे आणले जात आहेत. तथापि, मतदारांचे मन जिंकण्यासाठी केवळ वैचारिक मुद्द्यांवर भर देऊन चालणार नाही, त्यासाठी प्रभावी प्रचार व्यवस्थापन आणि जनसंपर्काची आवश्यकता आहे.

देशातील अनेक निवडणुकांमध्ये ‘अया राम, गया राम’ या संकल्पनेने म्हणजेच नेत्यांच्या सतत पक्ष बदलण्याच्या घटनेने राजकारणात अस्थिरता आणली आहे. महाराष्ट्रातही हेच दिसून येत आहे. शरद पवारांना तिकीट न दिल्यास नेते अजित पवारांच्या बाजूने जातील; उद्धव ठाकरे यांचा पक्ष तिकीट न मिळाल्यास एकनाथ शिंदे यांचा पक्ष त्यांना संधी देईल; भाजपने कोणाचाही उमेदवारी दावा मान्य न केल्यास, काँग्रेस त्यांच्या स्वागतासाठी तयार राहील. हीच परिस्थिती देशातील इतर राज्यांतही दिसून येते. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तत्त्व, विचारधारा, निष्ठा सोडून पक्ष बदलण्याची प्रवृत्ती महाराष्ट्रातील राजकारणात बळावली आहे. राजकारणात सत्तेसाठी तत्त्वे आणि नीतिमूल्यांचे उल्लंघन करत कुठेही उडी मारण्याची तयारी अनेक नेते दाखवतात.

महाराष्ट्रातील सध्याच्या निवडणुका आणखी गोंधळातीत ठरल्या आहेत कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांच्या विभाजनामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे नेत्यांची निष्ठा आणि तत्त्वांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातील बडे नेते आपल्या मुलांना राजकारणात आणून त्यांना आपला वारसा देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे कारण यामुळे लोकशाही तत्त्वांची पायमल्ली होऊ शकते. नेत्यांचा वारसा त्यांचे मुल घेऊ शकतात, परंतु सत्ता त्यांच्या निपुणतेवर मिळायला हवी, केवळ वारसाहक्काने नव्हे. यामुळे राजकीय नेतृत्वामध्ये नव्या विचारांचा अभाव आणि पारंपारिक राजकीय घराण्यांचे वर्चस्व वाढते.

महाराष्ट्रातील मतदारांनी नेहमीच जागरूकता दाखवली आहे. आणीबाणीनंतर सरकारला नकार देणारे मतदार त्यांच्या राजकीय जाणिवेचे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी वेळोवेळी भ्रष्टाचार, पक्षीय राजकारण आणि पक्षांतराच्या विरोधात मतदान केले आहे. तरीही, मतदारांच्या हातात खेळण्याची प्रवृत्ती काही नेत्यांमध्ये कायम आहे.

शेवटी, महाराष्ट्रातील राजकारणात नैतिकता, तत्त्वज्ञान आणि आदर्शांची आवश्यकता आहे. मतदारांनी नेत्यांच्या वारंवार बदलत्या निष्ठांवर प्रश्न विचारावा. सत्तेचा खेळ आणि निष्ठांमधील परिवर्तन हे लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांना विरोध करतात. त्यामुळे मतदारांनी सुज्ञपणे विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे.

विकास परसराम मेश्राम 

Similar News