आज साने गुरुजींची १२५ वी जयंती. मृत्युला ७४ वर्षे होऊनही हा माणूस इतका लोकप्रिय कसा ? अनेकांना जवळचा का वाटत राहतो याचे उत्तर कळूनही कळत नाही. समजूनही समजत नाही....
सध्या साने गुरुजींच्या जीवनावर १०० व्याख्याने देताना मी महाराष्ट्रात फिरतो आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत गुरुजींची लोकप्रियता नव्याने अनुभवतो आहे..प्रत्येकाच्या हृदयाच्या कुपीत प्रत्येकाने हळुवारपणे गुरुजी जपून ठेवले आहेत...दुसऱ्याला कळू न देता..
अगदी कोणत्याही छोट्या गावात जा..महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण ? हा प्रश्न विचारा. १० पैकी ७ माणसे नाही सांगू शकणार ..पण विचारा की मी गुरुजी शब्द सांगतो..त्याच्या अगोदरचा शब्द सांगा...१० पैकी ९ लोक सांगतील गुरुजी म्हणजे साने गुरुजी ... एका विना अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून राहिलेल्या शिक्षकाच्या वर्गात मनाने अजूनही सर्व महाराष्ट्र बसला आहे.. ..हे कसे समजून घ्यायचे....?
गुरुजींच्या त्या काळातील विद्यार्थ्यांना मी भेटलो आहे..गुरुजींचे नाव काढताच ते विद्यार्थी रडू लागले...८० वर्षानंतर एका शिक्षकाच्या नावाने विद्यार्थी रडत असतील तर गुरुजींनी काय पातळीवर प्रेम मुलांवर केले असेल...?
एखाद्या गावात वाचनालय काढण्यासाठी बैठक बसते ..काय नाव द्यायचे ? पटकन कुणीतरी सुचवते..देऊन टाका साने गुरुजी वाचनालय हे नाव..इतक्या खोलवर गुरुजी मनामनात पोहोचले आहात. गुरुजींच्या नावाच्या शाळा, वाचनालय, संस्था अशी एकदा खरेच यादी करायला हवी.
पुरोगामी महापुरुषांची बदनामी जाणीवपूर्वक आज होत असताना गुरुजींनी पुरोगामी विचार इतक्या ताकदीने मांडून ही हिंदुत्वाचा मतदारसंघ असलेल्या मध्यमवर्गात गुरुजींची लोकप्रियता अफाट आहे.. हे विशेष. श्यामची आई पुस्तक व गुरुजींचे निरालस समर्पित जीवन याचा तो परिणाम आहे..गुरुजी शिक्षक होते म्हणून त्या क्षेत्राला स्वातंत्र्यानंतर ग्लॅमर आले.आपण शिक्षक झाले पाहिजे यासाठी एक अख्खी पिढी महाराष्ट्रात शिक्षक झाली. त्यात अनेक प्रतिभावंत होते...
गुरुजी जणू काल वारले..अशा शोकमग्नतेत असलेली कितीतरी माणसे मी बघितली आहेत..भाषण करताना समोर बसलेले अनेकजण रडताना माणसे तर नेहमीच मी बघतोय...
या माणसाला महाराष्ट्र का विसरत नसेल ?
स्वतः ची जाहिरात या माणसाने केली नाही. भाषण संपल्यावर आपले कौतुक कोणी करू नये म्हणून एका कोपऱ्यात कुठेतरी उभे राहणारे गुरुजी....माझ्या मृत्यूनंतर कोणालाही कळू न देता नेसत्या कपड्यानिशी अंत्यविधी करून टाका अशी इच्छा लिहिणारे गुरुजी हे स्वत:ला पूर्णत: बिन चेहऱ्याने जगण्याचा प्रयत्न करणारे होते.. निरपेक्ष भावनेने काम कसे करता येते याचे रोल मॉडेल होते..गुरुजी करियर करणारे नव्हते..स्वतः चे घर नाही की काहीच इस्टेट नसणारे फकिरी व्यक्तिमत्व ...पोस्टाचा पत्ता नसणारे गुरुजी....स्वतः ला किती पुसून टाकता येते याचा वस्तुपाठ असणारे गुरुजी...पण तरीही गुरुजी अनेकांना आपले का वाटतात ?
साने गुरुजींचे इतके टोकाचे आकर्षण महाराष्ट्राला असण्याचे एक कारण मला त्यांच्या निरागस आणि लहान मूल असण्यात वाटते...
आपल्याला घरात लहान मूल का आवडते ? याचे उत्तर आणि महाराष्ट्राला साने गुरुजी का आवडले याचे उत्तर एकच आहे. आपण निरागस नाही.आपण भाबडे नाहीत ,आपण स्वप्नाळू नाहीत आपण बनेल आहोत,व्यवहाराने आपण कोरडेठाक झालेलो आहोत ही भावना आपल्याला सतत टोचत असते.आपण मोठे होत असताना आपल्यातले लहान मूल मरत जाते याने आपण अस्वस्थ असतो आणि साने गुरुजी वयाच्या ५१ वर्षी आजोबा होण्याच्या वयातही मनाने लहान बाळ राहिले.त्यांच्यातली निरागसता त्यांच्यातली कोमलता,संवेदनशीलता आहे तशीच राहिली. काळाच्या कठोर नृशंस नियमाला त्यांच्या भावविश्वावर ओरखडाही ओढता आला नाही याचे अप्रूप आपल्यात असते....लहान मुलाला जपून ठेवण्याची समाज म्हणून धडपड असते..
साने गुरुजींनी अनेक क्षेत्रात काम केल्याने गुरुजी आज अनेक क्षेत्रात जिवंत होतात..साने गुरुजी शिक्षक होते,मुलांना गोष्ट सांगणारे होते,
पालकांना 'श्यामची आई ' सांगणारे होते, स्वातंत्र्य सैनिक होते,शेतकरी कामगार यांच्यासाठी लढणारे होते, विठ्ठल मंदिर दलितांना मुक्त करणारे होते, लेखक होते,कवी होते, पत्रकार संपादक होते, आंतरभारती जिवंत करणारे होते...त्यामुळे या सर्व क्षेत्रात त्यांचे प्रेरक म्हणून असणे अधिकच त्यांना जिवंत करत राहते...
कधीकधी वाटते गुरुजी म्हणजे प्रेम प्रेम आणि प्रेम...आणि दुसरीकडे आजचा समाज हा कोरडा रुक्ष आत्मकेंद्रित होतो आहे. अशा काळात प्रेम नसलेल्या समाजात गुरुजी अधिकच हवेहवेसे वाटत असतील का.....?
हेरंब कुलकर्णी