खरी शिवसेना कोणती, हे कसे ठरणार?

एकनाथ शिंदे यांनी बंड केले असले तरी आपण शिवसेनेतच आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची हा वाद सुरू राहणार आहे. पण खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय कधी होऊ शकतो, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल सांगळे यांनी...;

Update: 2022-06-30 02:59 GMT

एकनाथ शिंदे यांनी बंड केले असले तरी आपण शिवसेनेतच आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची हा वाद सुरू राहणार आहे. पण खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय कधी होऊ शकतो, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल सांगळे यांनी...त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले ते पाहूया...

परवाच्या पोस्ट मधील बरेच अंदाज बरोबर आले. म्हणून महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात अजूनही "आता पुढे काय होईल" ही उत्सुकता कोणात उरली असेल तर त्यांच्यासाठी काय होईल याचा कायद्याचा आणि राजकीय अंदाज...

आता येणारे नवीन सरकार नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड करेल. ते अध्यक्ष अर्थातच सेनेचे शिंदे गटाबद्दलचे आधीचे सगळे आक्षेप फेटाळून लावून शिंदे गटाला विधिमंडळातील अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देतील. तो गट शिंदेंना विधिमंडळ नेते म्हणून मान्यता देईल आणि त्यांचा स्वतःचा प्रतोद नेमतील. शिंदे यांनी सेना सोडल्यावर जे पहिले अधिकृत ट्विट केले होते त्याचा अर्थ हाच होता. ते म्हणाले होते की मी सेना सोडलेली नाही. यामुळे हे सगळे नाट्य किती स्क्रिप्टेड होते ते स्पष्ट होते. तेंव्हा हा गर्भित अर्थ न समजल्याने अज्ञानाने अनेक मविआ समर्थक खुश झाले होते.

याचा दुसरा अर्थ हा की एका अर्थी मूळ शिवसेनेचा गट हाच अनधिकृत सेना होऊ शकतो. हे अर्थात विधिमंडळाबद्दल, संघटनेबद्दल नाही. शिवसेनेची संघटना कोणाबरोबर आहे हे काळ सांगेल.

या नवीन अध्यक्षांच्या या सगळ्या निर्णयांना शिवसेना अर्थातच सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाईल. तिथे आधीच शिंदे गटाबद्दलची याचिका प्रलंबित आहेच. त्यात हे नवीन आक्षेप समाविष्ट होतील आणि सुनावणी १२ जुलैला आहेच. त्यात हे सगळे निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आधीच घेतले असल्याने आणि ते त्यांच्या अधिकारकक्षेत येत असल्याचा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करण्यास नकार देऊ शकते. शिवसेनेची खरी लढाई आता संघटना पातळीवरच लढावी लागेल. खरी शिवसेना कोणती हे विधानसभेची पुढील निवडणूक ठरवेल. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरेंना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे करून दाखवतील का? या प्रश्नाचे उत्तर खरी सेना कोणती ते ठरवेल!!

बाकी मविआ आघाडी यापुढे तशीच राहील का? राष्ट्रवादी बद्दल शंका वाटत नाही. काँग्रेसचे कोणीच सांगू शकत नाही. थोडक्यात काय, तर खरा संघर्ष २०२४ निवडणुकांच्या वेळी होईल आणि तोपर्यंत आपले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपूर्ण संघटना एकसंध ठेवण्याचे अवघड कार्य शिवसेनेला करावे लागेल.

Similar News