आसाराम भक्तांना तुकाराम कसे कळणार ? ज्ञानेश वाकुडकर
शिळामंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वादग्रस्त वक्तव्य करत सावरकर बेड्यांच्या चिपळ्या करुन तुकारामाचे अभंग गायचे असा दावा केला. तुकाराम हा तुकाराम आहे, मंबाजी हा मंबाजी, गोडसे हा गोडसे आहे, इतका शहाणपणा भाजपाच्या लोकांना का येत नाही असं विश्लेषन केलं आहे ज्ञानेश वाकुडकर यांनी...
शेवटी 'तुकाराम' ते 'तुकाराम' आणि 'मंबाजी' तो 'मंबाजी'! 'गांधी' ते 'गांधी' आणि 'गोडसे' तो 'गोडसे' हेच सत्य! एवढं सारं माहीत असूनही भाजपच्या लोकांना शहाणपण येऊ नये, याचे आश्चर्य वाटते. कीव येते. ज्या कुणी यांच्यावर संस्कार केले असतील, त्यांनी या लोकांना जातिवंत मतिमंद करून ठेवले आहे एवढं मात्र नक्की!
या लोकांचा गांधी खुनातील सहभाग जगजाहीर आहे. गोडसे प्रेम तर मधून मधून ओव्हर फ्लो होतच असते. तरीही यांचा सर्वोच्च नेता जेव्हा देशाबाहेर जातो, तेव्हा झक मारून गांधींचं नाव घ्यावं लागते, बुद्धाचा जप करावा लागतो. आणि ते घेतातही. कोडगेपणा हा या टोळीचा विशेष गुण आहे. नुकतेच पंतप्रधान देहूला येऊन गेलेत. संत तुकाराम महाराजांचा गेटअप केला. त्यांचे अभंगही टेली प्रिंटर वरून वाचून दाखवले. सावरकरांचं पाप कमी व्हावं म्हणून ते 'जेलमध्ये असतांना तुकारामाचे अभंग गात होते' असली पुडीही सोडून दिली. त्यावर तान म्हणजे 'मोदी रंजल्या गांजल्यासाठी काम करतात' असा जागतिक दर्जाचा जोक फडणविस यांनी देखिल मारून दिला. साऱ्या जगाला हे लोक उल्लू समजतात, यात संशय नाही.
उजळ माथ्यानं चार चौघात नाव घेता येइल, असा एकही नेता यांच्या कळपात आजवर निर्माण झालेला नाही. खरं तर याची लाज नव्हे, निदान खंत तरी का वाटू नये? उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होऊ नये, यासाठी कारस्थान करून नेमके काय साधले? एवढी अक्कल नेमकी कुणाची होती? तीन मिनिटांच्या भाषणामुळे असे कोणते आकाश कोसळणार होते?
खरं तर तुकाराम हे या लोकांना झेपणारे संत नव्हेत! 'तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे ! येरा गबाळाचे काम नोहे!' तरीही या लोकांची आदत काही जात नाही! मध्यंतरी स्वामी विवेकानंद यांनाही हाताशी धरण्याचा प्रयोग करून पाहिला! पण मागून पुढून सारेच भाजले आणि नाद सोडावा लागला! असला टपोरीपणा करण्यापेक्षा स्वतःचे मेंदू साफ केले, मनातली घाण स्वच्छ केली, चुका मान्य करुन पुढे जायची तयारी केली आणि त्यांच्यातल्याच सभ्य लोकांचं थोडं ऐकलं तर आजही हा कळप माणूस म्हणून चांगले काम करू शकतो. यांच्याकडे देशव्यापी संघटन आहे, साधनं आहेत, पैसा आहे, असंख्य संस्थांचं देशव्यापी जाळं आहे! अभाव आहे तो फक्त माणुसकीचा! सभ्यतेचा! चांगल्या संस्काराचा! कारस्थानी वृत्ती त्यागण्याचा! पण ते यांना झेपत नाही. आणि म्हणून मग दुनियाभराच्या लांड्या लबाड्या कराव्या लागतात! शेवटी आतून कितीही गोडसे प्रेम असले, तरी बाहेर मात्र 'गांधी गांधी' करावे लागते! मनात कितीही द्वेष असला तरी मंबाजीच्या पिलांना तुकारामाच्या पुढे येवून नतमस्तक व्हावे लागते. त्याशिवाय, अंधभक्त वगळता, समाजात कुणीही इज्जत देत नाहीत, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. सत्ता मिळाली, पण शहाणपणा मात्र आला नाही. म्हणून माकडचेष्टा मधे मधे सुरू असतात. विहिरीतच नाही, तर पोहऱ्यात तरी कुठून येणार?
तसेही 'आसाराम'भक्तांना 'तुकाराम' कसे कळणार म्हणा? तूर्तास एवढंच..!
- ज्ञानेश वाकुडकर