डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले अधिकार ते तुमच्या डोळ्यादेखत संपवतायंत
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी कामगार संघटना, कामगार नेते व विरोधी पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. देशात पावणे दोन लाख नोंदणी असलेल्या कामगार संघटना असून ज्यांचे तीन ते चार कोटी कामगार सभासद आहेत. सर्व संघटनांनी या कायद्याचा सुरुवातीला विरोध केला मात्र आता सगळे शांत आहेत. मंत्रिमंडळामध्ये हे कायदे मंजूर झाले एकाही वृत्तपत्रात बातमी नाही हे अत्यंत धक्कादायक आहे. कोट्यवधी कामगारांचे अस्तित्व उध्वस्त करणारे कायदे सरकारने मंजूर केले पण विरोधी पक्ष शांत, पावणेदोन लाख कामगार संघटना शांत आणि सगळ्यात वाईट म्हणजे कामगार सुद्धा शांत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे संविधानात अधिकार दिले ते तुमच्या डोळ्यादेखत संपवत असताना तुम्ही सर्वजण शांत आहात. संपूर्ण श्रमिक आज उध्वस्त झाला आहे. परमनंट कामगार संघटना आज आपल्या मालकाला घाबरून काही बोलत नाहीत. महाराष्ट्रात या कायद्याबाबत ज्यावेळी राज्यपालांच्या सहीचा अध्यादेश येईल त्यावेळी सर्वांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा होईल, तुम्हाला देशोधडीला लावलं जाईल. तुमच्या जीवनामध्ये हाहा:कार येणार असल्याची भीती भोसले यांनी व्यक्त केली.