मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्याला फसवलं असल्याचा आरोप मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना केला आहे. समविचारी विचारधारा असल्याने आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ऐकत होतो पण आता या दोन्ही पक्षांना रामराम ठोकून भाजप सोबत जाण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्या 'टू द पॉईंट' या कार्यक्रमात ते बोलत होते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड च्या भूमिकेमुळे भाजप विरुद्ध संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना काही वर्षांपूर्वी उभा राहिला होता. जेम्स लेन यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मी संदर्भात संभाजी ब्रिगेडने तीव्र आंदोलन केलं होतं या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता, त्यामुळे संभाजी ब्रिगेड भाजपची कट्टर विरोधक आहे असं चित्र निर्माण झालं होतं. आता भाजप सोबत जाण्याचा विचार खेडेकर यांनी व्यक्त केला असून या भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
"आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत राहिलो पण त्यांनी सत्तेत कधी वाटा दिला नाही त्यांनी संभाजी ब्रिगेडचा निवडणुकासाठी वापर केला. संभाजी ब्रिगेडच्या तरुणांमध्ये अस्वस्थता असून राजकीय वाटा मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठा सेवा संघ या दोन टोकाच्या विचारधारा आहे या दोन्ही विचारधारा कायम ठेवून भाजपसोबत हातमिळवणी होऊ शकते फक्त पहिलं पाऊल कुठे टाकायचं असा प्रश्न उरला आहे", असं मत खेडेकर यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.
भाजपामध्ये जे बहुजन आहेत त्यांची घुसमट होत आहे त्यांना त्यांच्या पक्षात ताकद मिळत नाही आणि म्हणूनच संभाजी ब्रिगेडचा त्यासाठी उपयोग होऊन त्यांचा आवाज पक्षाच्या व्यासपीठावर येईल असं खेडेकर यांनी यावेळी सांगितले. आर आर पाटील असताना संभाजी ब्रिगेड बरोबर बैठका झाल्या होत्या परंतू प्रत्यक्षात संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना उमेदवारी दिलीच गेली नाही असेही ते म्हणाले.
राजकारणामध्ये काही होऊ शकतं तसेच दोन्ही पक्षांच्या भल्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि भाजप एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं मत खेडेकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं.