वडापाव....मुंबईची खास ओळख आणि लाखो मुंबईकरांचं एकवेळचं जेवण...पण आता स्वस्तात मिळणारं हे जेवणही महाग झाले आहे. त्यामुळे मुंबईत वडापावचे दर वाढू लागले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांनी वस्तुंचे भाव वाढले आहेत. त्यात खाद्य तेलही आता आवाक्याबाहेर गेल्याने वडापाव विक्रेत्यांना १५ रुपयांनाही एक वडापाव विकण परवडत नाहीये... महागाई वाढली म्हणून वडापावचे दर वाढवले तरी ग्राहक त्यासाठी पैसे मोजणार का, अशी भीती या व्यावसायिकांना वाटते आहे. तर दुसरीकडे हॉटेलमधले परवडत नाही म्हणून व़डापाव खायला येतो, पण तोसुद्धा महाग झाला तर खायचे काय, असा सवाल ग्राहक विचारत आहे.
एकीकडे तेलाचे भाव वाढले असताना व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भावही २५० रुपयाने वाढले आहेत. १८०० रुपयांना मिळणारे एक सिलेंडर आता २२५० रुपयांवर गेले आहे. वडापाव हा कुणासाठी नाश्ता असतो, कुणासाठी ब्रंच असतो तर कुणाचं दोनवेळचं जेवण....मुंबई प्रत्येकाला जगवते असं म्हणतात...पण लाखो मुंबईकरांना जगण्यासाठी आधार देणाऱ्या वडापाव विक्रेत्यांवर महागाईमुळे संकट आले आहे...आता वडापावचे भाव वाढले तर आपल्यासारख्या कॉमनमॅनला त्यासाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल...यामुळे वडापाव विक्रेत्यांचे बजेट बसले तरी सामान्यांचे बजेट बिघडणार हे नक्की....