साबरमती आश्रम नूतनीकरण : गांधींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न: तुषार गांधी
साधी राहणी उच्च विचारसरणी असं महान व्यक्तीमत्व म्हणजे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी... आता हीच विचारसरणी धोक्यात येत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाचं नूतनीकरण कशासाठी? खरंच आश्रमाला नूतनीकरणाची गरज आहे का? महात्मा गांधींचे मूलभूत तत्व पुसण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जातोय का ? नेमकं कोणाचं स्मारक या ठिकाणी उभारायचं आहे? महात्मा गांधी स्मारकांमध्ये सरकार हस्तक्षेप करु शकते का? यावर महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांच्यांशी मॅक्स महाराष्ट्रने बातचीत केली.
तुषार गांधी सांगतात की, साबरमती आश्रमाचं नूतनीकरण करण्याची काहीही गरज नसताना मोदी सरकार का करतंय? हा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांच्या मूलभूत सिद्धांत आणि तत्व पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या दोन वर्षात देशावर आलेल्या संकटावर ताकदीने उपाययोजना करण्याची गरज असताना 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्या मागे साबरमती आश्रम उद्धवस्त करण्याचा हेतू स्पष्ट होतोय.
आम्ही या आश्रमाच्या नूतनीकरणाला विरोध करतोय की बापूंचा इतिहास पुसता कामा नये. तसंही महात्मा गांधींच्या स्मारकांबद्दल सरकारने कुठला हस्तक्षेप करू नये असे असतानाही हे सरकार हस्तक्षेप करू लागलं आहे. जर सरकारने ऐकलं नाही तर करेंगे या मरेंगे या महात्मा गांधी यांच्या मूलमंत्राचा वापर आम्ही करू. बापूंच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधी नूतनीकरणाचा प्रकल्प मोदी सरकारने येऊ घातलाय.
असं मत तुषार गांधी यांनी केला आहे.