मराठा आरक्षण मिळवण्याचा सैद्धांतीक मार्ग कोणता, जुन्या गॅझेटमध्ये मराठा समाजाची नोंद मराठा म्हणून करण्यात आली आहे का? तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात कुणबी म्हणून कोणाचा उल्लेख करतात? मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाला आर्थिक मागास असणं गरजेचं आहे की सामाजिक पाहा डॉ. भारत पाटणकर यांची विशेष मुलाखत...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला. यानंतर महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटल्या. परंतु सैद्धांतिक पातळीवर कुणी चर्चा करताना दिसत नाही अशी खंत श्रमिक मुक्ती दल या संघटनेचे अध्यक्ष तसेच पुरोगामी चळवळीतील जेष्ट नेते डॉ भारत पाटणकर यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी समाज सामाजिकदृष्ट्या मागास असणं महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर इतिहासातील तसेच बॉम्बे गॅझेटियर मधील पुरावे देत भारत पाटणकर यांनी आपलं मत व्यक्त केलं.
मराठा आरक्षणावर आता हे आमच्या जातीत नवे वाटेकरी आले, मराठा ही जात आहे का? अशी चर्चा होते. पण यावर गांभीर्याने खोलवर चर्चा होत नाही. स्वतःला मराठा म्हणवणाऱ्या जातीने १८८० साली आम्ही कुणबी आहोत असे सांगितले आहे. याचा उल्लेख बॉम्बे गॅझेटियर मध्ये मध्ये आहे.
त्यावेळी राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के कुणबी होते. या गॅझेटियर मध्ये २० ते पंचवीस पाने कुणबी या विभागासाठी दिली आहेत. तर मराठा विभागासाठी केवळ ४ ते ५ पाने आहेत. ज्यामध्ये मराठा जातीच्या चालीरीती ह्या कुणबी या जातीप्रमाणे असल्याचे दिसते.
या अगोदरही डॉ भारत पाटणकर यांनी सातारा जिल्ह्यातील गॅझेट चे संदर्भ देऊन या जिल्ह्यातील पूर्वीचे कुणबी कोठे गायब झाले असा सवाल पुराव्यानिशी उपस्थित केला होता.
१८८१ या वर्षी सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख बसष्ठ हजार पन्नास एवढी होती. या एकूण लोकसंख्येत पाच लाख त्र्यांऐंशी हजार पाचशे एकोनसत्तर एवढी होती. आज सातारा जिल्ह्यात एकही मूळचा कुणबी नाही. हीच परिस्थिती मराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातीच्या बाबतीत संपूर्ण राज्यात आहे.
१८८१ च्या जनगणनेत मराठा नावाची जातच नाही. याचे कारण कुणीच स्वतः ला मराठा जातीचे आहोत असे सांगितलेले नाही. १८८४ च्या गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, "कुणबी आणि मराठा हा फरक हा फरक संपूर्णपणे सामाजिक आहे. त्यामुळे यात कुणबी जातीची लक्षणे सांगण्यासाठी दहा पाने खर्च केली आहेत. तर मराठा म्हणजे काय हे सांगण्यासाठी केवळ चारच पाने. कारण बहुसंख्य लक्षणे तीच आहेत.
या संदर्भात तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला दिला जातो.
बरा कुणबी केलो | नाही तरी दंभेची असतो मेलो ||१||
भले केले देवराया | नाचे तुका लागे पाया ||२||
विद्या असती काही | तरी पडतो अपायी ||२||
सेवा चुकतो संतांची | नागवन हे कुळाची ||३||
गर्व होता ताठा | जातो यामपंथे वाटा||४||
तुका म्हणे थोरपणे | नरक होती अभिमाने ||५||
त्यामुळे आज जे मराठा जातीचे म्हणून ओळखले जातात ते तुकोबारायांच्या आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून कुणबीच आहेत. त्यांची जात कुणबी आहे. हे स्पष्ट व्हायला काहीच हरकत नाही.
नाहीतर एवढ्या मोठ्या टक्केवारीचे त्या त्या जिल्ह्यात असणारे कुणबी जातीचे लोक हवेत विरून गेले असेच म्हणावे लागेल.
याचा दुसरा पुरावा त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांचा दिला आहे.
महात्मा फुले यांनी शेतीत कष्ट करून जगणाऱ्या तीन जातींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. कोरडवाहू शेती करणारे कुणबी(कुळंबी), माळव्याचे( पाले - फळ भाज्यांचे ) उत्पादक करणारे ते माळी आणि कोरडवाहू शेती आणि मेंढपाळ करणारे ते धनगर अशा या तीन शेतकरी जाती आहेत. या जाती शेतीत राबून उत्पादन करणाऱ्या पण बहुसंख्य कुटुंबे थोडी थोडी जमीन असणारे अल्प भूधारक किंवा मध्यम शेतकरी. यापैकीच शेतकरी जमिनदाराच्या शेतावर कुळ म्हणून राबणारे. अर्थातच ९८- ९९% कुटुंबे जगण्यापुरते उत्पन्न काबाडकष्ट करून घेणारी.
अशाच शेतकऱ्यांच्या ज्या जातींची लोकसंख्या ज्या गावामध्ये जास्त त्यापैकीच त्यातल्या त्यात स्वतंत्रपणे शेती करणाऱ्या आणि जगण्यासाठी लागणाऱ्या शेतीपेक्षा काही प्रमाणात जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमधूनच मुलकी किंवा पोलिस पाटील व्हायचे. शिवरायांचे पूर्वज वेरूळ या लेण्यांच्या गावात असेच पाटील होते. त्यामुळेच महात्मा फुलेंनी शिवरायांचा पोवाडा लिहिताना त्यांना 'कुळवाडी कुळभूषण' अशा उपाधीने गौरविले आहे.
या कुणबी समाजाचे मराठा म्हणून रूपांतर कसे झाले? याबद्दलची इतिहासातील एक घटना भारत पाटणकर सांगतात.
करवीर पिठाचे क्षात्र जगतगुरु यांनी मराठा हे क्षत्रिय म्हणून आदेश काढला. यानंतर आपण कुणबी नाही तर क्षत्रिय आहोत असा आदेश देखील निघाला.
महाराष्ट्रात १५० अशी मराठा घराणी आहेत. ज्यामध्ये इतरांचे त्यांच्याशी बेटी व्यवहार होत नाहीत. राजेशिर्के , राजेगायकवाड, निंबाळकर,पासलकर अशी त्यातील काहींची आडनावे आहेत. ९९ टक्के मराठ्यांशी यांच्या सोयरीक होत नाहीत. यातील हा मोठा वर्ग कुणबी होता आणि आजही कुणबीच आहे. या जातींनी आपला कुणबी असल्याचा पुरावा काढायला पाहिजे.
जो इथल्या जुन्या रेकॉर्डमध्ये निश्चितपणे उपलब्ध आहे. मराठा समाजाने सर्वप्रथम आपले कुणबीत्व, शुद्रत्व स्वीकारून ते नष्ट करण्याच्या लढाईत अग्रभागी असायला पाहिजे. आरक्षण हवे असेल तर आपण या जातीव्यवस्थेच्या बळी आहोत आणि ती नष्ट करण्याच्या लढाईत आम्ही देखील उभे राहू ही भूमिका घेतल्याशिवाय इतर जातींचा पाठींबा देखील मिळणार नाही.
सफाई कर्मचाऱ्यांमध्ये ज्याप्रमाणे बहुसंख्य पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग आहेत. त्याचप्रमाणे हमालांमध्ये धनगर आणि मराठा या जाती आहेत. आजही अनेक मराठे वाडीतील मुलगी करत नाहीत. ९९.९ टक्के मराठ्यांना कमीतले समजले जाते. यातील उर्वरीत असलेले सरकार आणि राजे हे या पासून वेगळे आहेत.
मराठा आरक्षणाचा सर्व्हे करणाऱ्या आयोगाने उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांचा अभ्यास केला नाही. त्यांनी तो केला असता तर मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे. याचे पुरावे त्यांना मिळाले असते. ते पुरावे गॅझेटियर मध्ये आजही उपलब्ध आहेत. सत्ता स्पर्धेमध्ये मराठ्यांना पायाखाली घेऊन सत्तेकडे झेपावण्याच्या वृत्तीपासून सावध राहायला हवे असे आवाहन मराठा समाजाला त्यांनी केले आहे.