महापुराचा आदिवासी वस्तींना फटका, शासनाकडे घर बांधून देण्याची मागणी
महापुरात काळीज कोंड आदिवासी वाडीतील घरे जमीनदोस्त, पुररेषेच्या बाहेर घरे बांधून देण्याची शासनाकडे मागणी;
कोकणामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सावित्री आणि काळ नदीने रौद्र रूप धारण केल्यानंतर महापुराचे पाणी लोकवस्तीत शिरले. काळीज कोंड आदिवासीवाडीतील 26 घरांपैकी 20 घरे जमीनदोस्त झाली, संसार उघड्यावर पडला, अनेक कुटूंब बेघर झाली. महापुराने सारेच हिरावले, जगावे कसे खावे काय, राहावे कुठे अशी अवस्था आदिवासी बांधवांची झाली आहे.
सध्या या कुटूंबानी नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. आता या कुटुंबांच्या पुनर्वसनाची मोठी समस्या उभी राहिली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी चा फटका नदीकिनारी असणाऱ्या या घरांना बसतो. यावर्षी महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना महापुराच्या पाण्याने चहूबाजुने वेढा दिला होता.
काळ नदीच्या काठावर वसलेल्या या काळीज कोंड आदिवासी वाडीसाठी 22 जुलै ची रात्र अक्षरश: काळ रात्र ठरली. जीव वाचला खरा, पण परतून आल्यावर असलेला कुटुंबाचा आसरा मात्र, नष्ट झाला. येथील अनेक घरे महापुराच्या रौद्र रूपाने उध्वस्त झाली, बेघर झालेल्या या आदिवासी बांधवांना आता, मात्र, शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. बेघर आदिवासींवर संकटाचा डोंगर कोसळला आहे.
येथील रहिवासी अलका वाले हिने सांगितले की, आम्हा ग्रामस्थांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन नव्याने घरे बांधून देण्यात यावीत. यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. परंतु आजतगायत त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक कुटुंब बेघर झाली. महापुराने सारेच हिरावले, येथील नागरिकांना आपला जीव वाचवला, पूर आला व गेला. पुररेषेच्या बाहेर शासनाने आम्हाला घरे बांधून द्यावीत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी