कोव्हिड सेंटरवर रुग्णांना साधा 'ऑक्सिमीटर' मिळेना; रुग्णांचा संताप अनावर
कोरोना बाधित रुग्णांना कोव्हिड सेंटरवर विविध अडचणी सामना करावा लागत असून, साधा ऑक्सिमीटर सुद्धा उपलब्ध करून दिला जात नसल्याचं औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ पैठण येथील शासकीय वसतिगृह येथील कोविड सेंटरचा आहे. यात वेळवेर गोळ्या, जेवण मिळत नसून, साधा ऑक्सिमीटर सुद्धा उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. त्यामुळे यातून पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आजघडीला 10 हजारपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच हे रुग्ण रोज वाढताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाने शनिवार आणि रविवार असे विकेंड लॉकडाऊन लावण्याची सुद्धा घोषणा केली आहे. मात्र तरीही रुग्ण काही कमी होतांना दिसत नाही.