नांदेड : नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येच्या तब्बल दोन महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश आले आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात नांदेड पोलिसांना यश आले असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली. पोलिसांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. या हत्येमागे पाकिस्तानात असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पंजाब, दिल्ली, हरियाणा,उत्तर प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटक या सहा राज्यात आरोपींचा शोध घेण्यात आला. पकडण्यात आलेले इंदरपालसिंग उर्फ सनी मेजर, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे, सतनामसिंग उर्फ सत्ता शेरगिल, हरदिपसिंग उर्फ सोनू बाजवा, गुरुमुखसिंग गिल, करणजितसिंघ साहू आरोपींची नावं आहेत.
सर्व आरोपी हे मुळचे नांदेडचे असल्याची माहितीही तांबोळी यांनी दिली. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे. तसेच बियाणींवर गोळीबार करणारे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. खंडणीसाठीच बियाणींची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांना काढला आहे. दरम्यान सहाही आरोपींना न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती ही तांबोळी यांनी दिली.