अजित पवार घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; अजित पवार गटाच्या नेत्याचं ट्वीट
अजित पवार यांना मुख्यमंत्री पद देऊन एकनाथ शिंदे यांना डच्चू दिला जाण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या नेत्याने ट्वीट केल्याने खळबळ उडाली आहे.;
अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर खातेवाटपात अजित पवार यांच्या गटाला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेली 3 महत्वाची तर भाजपकडे असलेली 6 महत्वाची खाती मिळाली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचीच दादागिरी सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डच्चू देऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, लवकरच... अजितपर्व असं म्हणत अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाच्या प्रवक्त्यानेच अजित पवार मुख्यमंत्री होण्याविषयी ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.