#Psychology वेड्यांच्या बाजारात शहाणी माणसे काय करतात ? डॉ. रुपेश पाटकर
वेड्यांच्या बाजारात शहाणी माणसं काय करतात? वेड्यांसोबत राहून तुमच्यावर परीणाम होऊ शकतात का?तुझ्यावर परिणाम झाला तर?मानसिक आजार हे सांसर्गिक आजार असतात का? मानसोपचार क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांचे धक्कादायक कथन केले आहे डॉ. रुपेश पाटकर यांनी..
मला एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की मला हवे असलेले हे क्षेत्र नव्हे. मला जाम कंटाळा येऊ लागला. मी आईबाबांना म्हणालो की 'मी हे सोडतो आणि दुसरे काही मला आवडणारे निवडतो.' आई म्हणाली, 'जसे इतर लोक बीए, बीकाॅम सारखे ग्रॅज्युएशन करतात तसेच तू एमबीबीएस कर. एकदा ग्रॅज्युएशनची डिग्री हातात मिळाली की तू तुला हवे ते कर.' आईच्या सांगण्याप्रमाणे मी एमबीबीएस पूर्ण केले. पण एमबीबीएसला नुसती परीक्षा देऊन डिग्री मिळत नसते. त्यासाठी एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. त्यानंतरच विद्यापीठ डिग्री देते.
त्यावेळी आमच्या विद्यापीठात सहा महिने ग्रामीण क्षेत्रात काम करणे आणि उरलेले सहा महिने मेडिकल कॉलेजच्या वेगवेगळ्या विभागात काम करणे आवश्यक होते. ग्रामीण इंटर्नशिपसाठी मी सावंतवाडीचे काॅटेज हॉस्पिटल निवडले होते. तिथे मी एकटाच इंटर्न होतो. सकाळी वॉर्डमधील पेशन्टची ड्रेसिंग करणे आणि नंतर मेडिकल ऑफिसरसोबत ओपीडीत बसणे हे काम असे. दुपारचा वेळ तसा मोकळाच असे. त्यामुळे वॉर्डमधील पेशन्ट सोबत गप्पा करण्यात मला वेळ घालवता येई. तिथे आत्महत्येचा प्रयत्न केलेले पेशन्ट येत. त्यांच्यावर मेडिकल ऑफिसर उपचार करत. पण हे उपचार त्यांनी जे विष घेतलेले असेल ते उतरवणे किंवा त्यांनी शीर कापली असेल तर ती टाके घालून पूर्ववत करणे वगैरे असत आणि 'पुन्हा असे करू नकोस' असा एका ओळीचा संदेश असे. अशा पेशंटशी बोलण्यास, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्यास, त्यांना जीवनाची चांगली बाजू सांगण्यात मला गोडी वाटे.
एकदा संध्याकाळी सहाच्या दरम्यान सुमारे पंचवीस वर्षांची बेशुद्ध बाई आमच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली. तिने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यासोबत एसटीच्या ड्रायवरचा गणवेश घातलेला तिचा नवरा होता. तो डय़ुटीवरुन तसाच हॉस्पिटलमध्ये आला होता. तिला अॅडमिट करून मेडिकल ऑफिसरने तिच्यावर उपचार केले. ती रात्रभर ग्लानीत होती आणि तिचा नवरा तिच्या उशाशी पूर्ण रात्र जागा बसून होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसर्या दिवशी ती शुद्धीवर आली. तिसर्या दिवशी तिची तब्येत बरीच नॉर्मल झाली होती. मी तिच्याशी बोललो. ती निराशच होती. ती म्हणाली,"माझ्या प्रॉब्लेममधून सुटका अशक्य आहे. मी इंग्रजी लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएट आहे. मला वाचनाची आवड आहे. पण माझ्या बाबांनी माझे लग्न एसटी ड्रायवरशी करून दिलेय. का तर त्याच्याकडे परमनंट नोकरी आहे. त्याला माझ्यासारखे साहित्य वगैरे कशाचीच आवड नाही. वाचन तर बिलकुल करत नाही. अशा मठ्ठ माणसाशी मी बांधले गेलेय. मी आईवडिलांना सांगितले पण त्यांना माझे पटतच नाही. मला यातून सुटकेचा पर्यायच दिसत नाही." मी म्हणालो, "तुम्ही साहित्य भरपूर वाचता, पण तुम्हाला भावना वाचता येत नाहीत. तुमचा नवरा तुम्ही बेशुद्ध असताना रात्रभर अश्रू ढाळत तुमच्या उशाशी बसला होता. तो थकून भागून कामावरून सरळ हॉस्पिटलमध्ये आला होता."
मी त्यावेळी काही ट्रेन समुपदेशक नव्हतो. त्यामुळे मला सुचले तसे बडबडलो. तिला डिस्चार्ज मिळाला. आणि मी तिला विसरूनही गेलो. पण सुमारे दोन महिन्यानी ती आणि तिचा नवरा परत आला, केवळ मला भेटायला आणि हे सांगायला की ते दोघे एकमेकांना समजून घेऊ लागलेत. या अनुभवातून मला एक कल्पना सुचली की मला जरी डॉक्टरकीपेक्षा वेगळे काही करायचे असले तरी मी सायकीयॅट्री का निवडू नये. मी हा विचार घरी बोलून दाखवला. पण बाबा म्हणाले, "अजिबात नको."
"पण का?"
"वेड्यांसोबत राहून तुझ्यावर परिणाम झाला तर?"
"मानसिक आजार हे सांसर्गिक आजार नसतात."
पण माझे मत मान्य होईना. शेवटी या मुद्द्यावर तडजोड झाली की मी काही दिवस सायकीयॅट्रीमध्ये काम करून पहावे आणि नंतर ठरवावे. मी पणजीच्या आल्तिन्हो टेकडीवरील मनोविकारसंस्थेत रुजू झालो.
तिथे रुजू होऊन दोन महिने झाले आणि एका रात्री एकच्या सुमारास मला कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला म्हणून मी जागा झालो. आई बाबांना देखील मी उठवले. काही क्षण पुन्हा आवाज येतो का म्हणून आम्ही ऐकू लागलो. बाबा म्हणाले, 'तुला झोपेत तसे वाटले असावे.' आणखी काही क्षण गेले आणि मला पुन्हा हाक मारल्याचा आवाज ऐकू आला. मी पुन्हा आई बाबांना उठवले. यावेळी बाबा आईवर वैतागत म्हणाले, 'तुका सांगललय मा, हेका मेंटल हॉस्पिटलात धाडू नको म्हणान. हेका आता भास जावक लागलेत.' आमचे फाटक घरापासून थोडे दूर आहे. पण माडीवरच्या खिडकीतून पाहिले तर फाटक दिसते. मी बॅटरी घेऊन माडीवर गेलो. आणि खिडकीतून फाटकावर बॅटरीचा झोत टाकला. तिथे कोणीतरी होते. ती व्यक्ती मला त्याच्या घरी कोणी बरे नसल्यामुळे बोलवायला आली होती. पण माझे नशीब की ती व्यक्ती मी माडीवर जाऊन बॅटरीमारेपर्यंत तिथे थांबली. ती त्या आधी निघून गेली असती तर.....? तर मला सायकीयॅट्री हॉस्पिटलमध्ये जाऊ लागल्यामुळे भास होऊ लागलेत असा निष्कर्ष माझ्या आई बाबांनी काढला असता आणि मी सायकीयॅट्रीस्ट होऊ शकलो नसतो.
थोडा वेगळा विचार करू. आपण असे मानू की त्या दिवशी मला कोणी बोलवायला आलाच नसता आणि मला कोणी हाक मारल्याचा खरोखरच भास झाला असता तर.....? तर माझे मानसिक आरोग्य बिघडले असा त्याचा अर्थ झाला असता काय? याचे उत्तर 'नाही' असे द्यावे लागेल. नॉर्मल माणसाला झोपी जात असताना किंवा झोपेतून जागे होत असताना जे भास होतात त्यांना इंग्रजीत 'हिप्नोगाॅगिक हॅल्यूसिनेशन्स' आणि 'हिप्नोपाॅम्पीक हॅल्यूसिनेशन्स' म्हणतात. आणि ते कोणत्याही मानसिक आजाराचे लक्षण नव्हेत.
सायकीयॅट्रीमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी मी मुंबईला गेलो आणि जिथे सायकीयॅट्रीमध्ये पुढे शिकण्याची सोय होती अशा हॉस्पिटलमध्ये अर्ज केले. अशाच एका हॉस्पिटलमध्ये अर्ज करून गाडी पकडायला दादर टीटीच्या स्टॉपवर आलो. तिथे जवळच एक माणूस जुनी पुस्तके विक्रीसाठी मांडून बसला होता. मी सहज त्याच्याकडच्या पुस्तकांकडे नजर टाकली. आणि माझ्या नजरेत 'प्रिन्सिपल्स ऑफ सायकाॅलाॅजी' हे पुस्तक आले. मला त्याचे लेखक आता आठवत नाहीत. ते मी लगेच विकत घेतले. तितक्यात बस आली. मी बसमध्ये चढलो. बसमध्येच कुतूहलाने पुस्तक चाळू लागलो.
त्या पुस्तकातील एका गोष्टीने मला थक्क केले. ती गोष्ट होती 1973 सालातील 'सायन्स' नावाच्या मान्यवर पत्रिकेत प्रसिद्ध झालेली! त्या गोष्टीचा मथळाच चमत्कारिक होता. 'On Being Sane in Insane Places' याचा मराठी अनुवाद मी 'वेड्यांच्या बाजारात शहाणी माणसे!' असा केलाय. पण हे काही तात्विक किवा गूढ वर्णन नव्हते. हा एक प्रयोग होता, ज्यात आठ जणांना वेगवेगळ्या सायकीयॅट्री हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. या मंडळींनी पेशन्ट असल्याचे नाटक वटवायचे होते. त्यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरना सांगायचे होते की त्यांना पूर्वी कधीच मानसिक आजार नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना आवाज ऐकू येतात. ते आवाज काय सांगू इच्छितात हे कळत नाही, पण त्यांना 'रिकामी', 'पोकळ' आणि 'थड' असे आवाज ऐकू येतात. या खोट्या तक्रारी पलीकडे, त्यांनी नॉर्मल वागायचे होते.
ठरल्याप्रमाणे ते आठ जण आठ वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेले. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना तपासले. आठपैकी सात जणांना 'स्किझोफ्रेनिया' हे निदान देण्यात आले तर एकाला 'मॅनिक डिप्रेसिव सायकोसिस' हे निदान देण्यात आले. आणि या सर्व मंडळींना त्या त्या हॉस्पिटलने अॅडमिट देखील केले. आणि तेदेखील सरासरी एकोणीस दिवस! या काळात त्यांना अॅण्टीसायकोटीक गटातील औषधे देण्यात आली, पण या मंडळींनी ती स्टाफच्या नकळत फेकून दिली. या अॅडमिशनच्या काळात ते पूर्णपणे नॉर्मल वागले. त्यांनी त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांना आपल्याला त्यांच्या उपचारानी आराम पडल्याचे आणि भास नाहीसे झाल्याचे सांगितले. गम्मत म्हणजे वॉर्डात अॅडमिट असताना ही मंडळी या प्रयोगाशी संबंधित नोट्स ठेवत होती आणि तेही एकदम खुलेपणाने. एका नर्सने आपल्या रजिस्टरमध्ये नोट्स ठेवण्याबाबत 'रायटिंग बिहेवीअर' असे वर्णन लिहून ठेवले, जणू हे अॅबनाॅर्मल वर्तन असावे. परंतु एकाही पेशन्टला तो खोटाखोटा पेशन्ट झालाय हे ओळखण्यात आले नाही.
त्या पुढची गम्मत म्हणजे त्यांच्यासोबत वॉर्डात रहाणाऱ्या अनेक पेशंटना मात्र ही मंडळी आपल्यासारखी नाहीत असा संशय वाटला. हा प्रयोग स्टॅन्डफर्डचे मानसशास्त्रज्ञ डेव्हिड रोजेनहॅम यांनी केला होता. आणि ते स्वतःदेखील या प्रयोगात खोटा पेशन्ट बनून एका सायकीयॅट्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले होते. त्यांच्या प्रयोगात खोटेखोटे पेशन्ट बनलेले इतर जण कोण होते, माहित आहे का? त्यात एक मानसशास्त्रात नुकताच पदवी घेतलेला विशीतील तरुण होता, तिघे मानसशास्त्रज्ञ होते, एक बालरोगतज्ज्ञ होता, एक मनोविकारतज्ज्ञ होता, एक पेंटर होता आणि एक गृहिणी होती.
प्राध्यापक रोजेनहॅमनी त्यांच्या प्रयोगाचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर वादंग होणे साहजिकच होते. ज्या सायकीयॅट्री हॉस्पिटलसनी रोजेनहॅमच्या खोट्या पेशन्टना खरे पेशन्ट समजून अॅडमिट केले होते, त्यांनी रोजेनहॅमना आव्हान दिले की पुन्हा प्रयोग करा, आम्ही तुम्हाला शोधून दाखवतो. प्रयोग सुरू झाला. हॉस्पिटल्स त्यांच्याकडे येणार्या नव्या पेशंटना डोळ्यात तेल घालून तपासू लागली. त्यांना त्यांच्याकडे आलेल्या एकूण 193 नव्या पेशन्टपैकी 41 पेशन्ट संशयास्पद वाटले. पण गम्मत म्हणजे प्राध्यापक रोजेनहॅम यांनी या काळात एकही खोटा पेशन्ट पाठवला नव्हता!
रोजेनहॅमना या प्रयोगातून काय सिद्ध करायचे होते? त्यांच्या पुढ्यातील परिस्थिती साधारणतः अशी होती. स्किझोफ्रेनिया या आजारावर 'क्लोरप्रोमॅझिन' हे पहीले औषध येऊन अठरा वीस वर्षे होत आली होती. या औषधामुळे या आजारावरचे उपचार सोपे झाले होते. त्यामुळे पूर्वी जशी तपशीलाने हिस्ट्री घेतली जात असे, तशी घेतली जाईना. त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. आणि परिस्थिती या टोकाला पोचली होती की फक्त 'आवाजाचे भास होतात' या एकाच सिम्पटमवर स्किझोफ्रेनियाचे निदान होऊ लागले होते. नॉर्मल माणसाला देखील भास होऊ शकतात हे विसरले गेले होते. हीच अशास्त्रीयता आपल्या प्रयोगातून प्राध्यापक रोजेनहॅम डॉक्टरांच्या नजरेत आणू पहात होते. तंत्रज्ञानामुळे विज्ञानाचे चाललेले अमानवीकरण ते लक्षात आणून देऊ पाहत होते.
आणखी एका परिस्थितीत नॉर्मल माणसाला भास होऊ शकतात. ते म्हणजे त्याला एकाकी ठेवले तर! माणसाच्या मेंदूला नॉर्मल अवस्थेत राहण्यासाठी केवळ बाह्य संवेदनाच लागतात असे नव्हे तर संवेदनांतील बदलदेखील तितकाच आवश्यक असतो. तो नसेल, माणसाला एकसुरी गोष्ट पहावी लागत असेल, उदाहरणार्थ लांबचा प्रवास करणारा वैमानिक किंवा बर्फाळ प्रदेशात जिथे बघावे तिथे पांढर्याफटक बर्फाचे आच्छादन असेल किंवा वाळवंटातून प्रवास करणारा प्रवासी किंवा रात्रीच्यावेळी दूरच्या प्रवासावर जात असलेला ट्रक ड्रायवर यांना सततच्या एकसुरी दृश्यामुळे भास होऊ शकतात. एकांतवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्याला देखील भास होऊ शकतात. कैद्याच्या या तर्हेच्या भासांना गमतीशीर नाव देण्यात आलेले आहे. त्याला 'प्रिजनर्स सिनेमा' म्हणतात.
1950 च्या सुमारास हे तपासण्यासाठी मुद्दाम प्रयोग करण्यात आले. ज्यात नॉर्मल मानसिक आरोग्य असलेल्या स्वयंसेवकांना छोट्या खिडकी नसलेल्या एकाच रंगात रंगवलेल्या भिंतींच्या खोलीत पाठवण्यात आले. त्यांना फक्त जेवण आणि वाॅशरूमला जाण्यापुरते बाहेर जाता येई. सुरवातीला झोप, मग कंटाळा, मग मनातल्या मनात काही वेळ घालवणारे विचार, कल्पनाविलास आणि मग दृष्टीचे भास यातून ते गेले. समुद्रात दूरवर दर्यावर्दी करणार्या खलाशांना फक्त सतत क्षितिजापर्यंत पसरलेले पाणी पाहून असे भास होत असल्याचे जुन्या काळापासून वर्णन केलेले आढळते. कदाचित हे भासच सिंदबादच्या सफरीसारख्या कथांमागचे वास्तव असेल का? केवळ सिंदबादच कशाला जगातील सर्वच चमत्कारिक आणि सुरस कथांमागचे हेच वास्तव असेल कदाचित!