असेही एक बहिरेपण : डॉ. रुपेश पाटकर

भाषा ही मानवी प्राण्याची एकमेवाद्वितीय क्षमता आहे. माणूस वगळता इतर कोणताच प्राणी बोलू शकत नाही. पण ही भाषा हेच सामाजिक जीवनात भ्रम पसरवण्याचे साधन बनू शकते आणि नॉर्मल लोकांना मूर्ख बनवले जाऊ शकते 'सेंसरी अफेजिया' या मनोविकारावर अनुभवाच्या आधारे विश्लेषण केला आहे मानसोपचार तज्ञ रुपेश पाटकर यांनी..

Update: 2022-10-07 07:07 GMT

एक विचित्र तक्रार घेऊन श्रीयुत एस आमच्या ओपीडीत आले. त्यांच्या सोबत त्यांच्या सौभाग्यवती आल्या होत्या. खरे म्हणजे श्रीयुत एसची काहीच तक्रार नव्हती. त्यांच्या सौभाग्यवतींचीच त्यांच्याबाबत तक्रार होती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी श्रीयुत एसना अर्धांगवायूचा झटका येऊन गेला होता. अजूनही ते पूर्ण बरे झाले नव्हते. ओपीडीत येताना ते लंगडत आले होते. त्यांचा उजवा पाय अशक्त होता. उजव्या हातातील ताकददेखील अजून कमीच होती. उजव्या हाताकडून काम घेताना त्यांना डाव्या हाताची मदत घ्यावी लागे.

"यांना फोनवर बोललेले ऐकू येत नाही," सौभाग्यवती एस म्हणाल्या. एव्हढ्या क्षुल्लक कारणासाठी त्या श्रीयुत एसना घेऊन आमच्या सायकीयॅट्रीच्या ओपीडीत आल्या याचे मला आश्चर्य वाटले. "त्यांना बारीक आवाज ऐकू येत नसेल तर त्यांना इएनटी सर्जनना दाखवले पाहिजे," मी म्हणालो.

"इएनटी सर्जनीच त्यांना तुमच्याकडे पाठवलेय. त्यांनी तपासले त्यांना. ऐकण्यात काही दोष नाही म्हणालेत," त्या म्हणाल्या. ऐकण्यात दोष नाही असे जर इएनटी सर्जन म्हणत असतील तर श्रीयुत एस मुद्दाम फोनवर ऐकू न येण्याचे नाटक करताहेत का? माझ्या मनात विचार येऊन गेला.

"फोनवर बोलायला भीती वाटते का त्यांना?" मी विचारले. "भीती असेल असे वाटत नाही. अर्धांगवायू झाल्यानंतरच हे असे सुरु झाले. म्हणजे पुढ्यात बोललेले कळते त्यांना, पण फोनवरचे नाही. आम्हाला आधी वाटले की बारीक आवाज ऐकू येत नसेल, म्हणून मग आम्ही फोन स्पिकरवर टाकून पाहिला, पण तरीही नाही," सौ.एस म्हणाल्या.

मला श्रीयुत एसचे निदान करता येईना. मी त्यांना घेऊन आमच्या प्रोफेसरांच्या केबीनमध्ये गेलो. प्रोफेसरनी लक्षपूर्वक हिस्ट्री ऐकून घेतली आणि सौ. एसना विचारले की "अर्धांगवायू झाल्यानंतर पहील्या काही दिवसात त्यांचा संवाद कसा होता?" "त्यांना सुरुवातीला काहीच समजत नव्हते. म्हणजे आम्ही बोललो की ते आमच्याकडे बघत, पण त्यावर ते जे बोलत त्याला काही अर्थच नसे," सौ. एस म्हणाल्या.

"अर्थ नसे म्हणजे ते फक्त आवाज करीत की काही शब्द किंवा वाक्ये बोलत का?" "ते वाक्ये बोलत, पण काहीच्या काही. प्रश्न एक आणि यांचे उत्तर भलतेच. नंतर त्यांना शब्द सुचत नसत. 'सरबत' म्हणायचे असेल तर ते 'प्यायचे असते ते' असे म्हणत. 'पुस्तक' म्हणायचे असेल तर 'शाळेत नेतात ते', असे वेगळेच वर्णन करीत."

"आता त्यांना व्यवस्थित बोलता येते का?" "असे वाटते की सध्या ते शब्द ऐकण्याऐवजी आमचा चेहरा बघत असतात, आमचे हावभाव बघत असतात. कधीकधी वाटते की बोलण्याच्या चढ-उतारावरून अंदाज करतात. आणि हा, कोणाचे भाषण टीवी वर चालू असेल तर म्हणतात किती ढोंगी आहे हा माणूस!" सौ.एस म्हणाल्या. त्यानंतर प्रोफेसरांनी श्रीयुत एस यांच्याकडे पाहिले आणि ते एका सुरात चार वाक्ये बोलले. श्रीयुत एसनी काहीच प्रतिसाद दिला नाही. जणू त्यांना काहीच समजले नाही.

सर म्हणाले, "सेंसरी अफेजिया आहे.

त्यांची उजवी बाजू पॅरालाइज झाली म्हणजे मेंदूच्या डाव्या भागात स्ट्रोक बसला असणार. मेंदूच्या डाव्या भागात बहुतेक लोकांची वाचा केंद्रे असतात. श्रीयुत एस यांचे वरनिके (Wernicke) केंद्र काम करत नाहिये."

(अफेजिया म्हणजे मेंदूतील बिघडामुळे निर्माण होणार्‍या बोलण्याच्या समस्या.)

प्रोफेसर साहेबांनी श्रीयुत एस यांचा सीटी स्कॅन रिपोर्ट पाहीला. श्रीयुत एस यांच्या मेंदूच्या डाव्या भागातील 'वरनिकेज एरीया' नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागाला इजा झाल्याचे स्पष्ट दिसत होते.

श्रीयुत एस यांना पाहताना मला डॉ. ऑलिव्हर सॅक्स यांचा 'प्रेसिडेंटस् स्पीच' हा लेख आठवला. डॉ. सॅक्स काम करत असलेल्या हॉस्पिटलमधील अफेजिया वाॅर्डातून अचानक हास्य कल्लोळ उठला होता. वॉर्डच्या टीव्हीवर राष्ट्राध्यक्षांचे भाषण सुरू झाले होते आणि वॉर्डमध्ये एकच हशा पिकला होता. खरे तर या वॉर्डात अफेजियाचे पेशन्ट होते आणि ते देखील 'वरनिके' प्रकारच्या अफेजियाचे. (याला सेंसरी अफेजिया देखील म्हणतात.) या पेशंटना जरी शब्द ऐकू येत असले तरी शब्दांचा अर्थ मात्र कळत नसतो. कारण शब्दांचा अर्थ कळण्यास आवश्यक असणारा वरनिकेज एरीया हा भाग बिघडलेला असतो. मग शब्दांचा अर्थ न कळता हे पेशन्ट मोठमोठ्याने का हसू लागले?

डॉ. सॅक्स म्हणतात की त्या सर्वांना राष्ट्राध्यक्षांच्या शब्दापलिकडचे वास्तव कळत होते. शब्द खोटे असू शकतात. पण चेहरा खोटे बोलू शकत नाही. त्यांना आवाजाचा टोन, त्याचे वर खाली होणे, चेहर्‍यावरचे भाव हे सर्व दिसत होते. त्यामुळे नेहमी शब्दांनी केली जाणारी फसवणूक त्या पेशंटना फसवू शकत नव्हती. कारण ते शब्द ऐकत नव्हते. आवाजाचा टोन वाचत होते, चेहरा वाचत होते.

खरे म्हणजे एमबीबीएस च्या पाहिल्या वर्गात असताना शरीरक्रियाशास्त्र म्हणजे फिजीओलाॅजी या विषयात बोलण्याशी संबंधित मेंदूचे काम आम्ही अभ्यासले होते. बोलण्याशी संबंधित मेंदूतील पहिल्यांदा शोधण्यात आलेला भाग म्हणजे ब्रोकाज एरीया. हा भाग शोधून काढला डॉ.पाॅल ब्रोका नावाच्या फ्रेंच सर्जनने. ही गोष्ट 1861 ची. डॉ. ब्रोका यांच्याकडे एक केस आली होती. त्या माणसाला अर्धांगवायू झाला होता आणि अर्धांगवायू झालेल्या दिवसापासून त्याला स्पष्ट बोलता येत नव्हते. म्हणजे त्याने बोलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी 'टॅन' या शब्दापलिकडे तो दुसरे काही बोलू शकत नसे. दुर्दैवाने तो पेशन्ट लवकरच मेला. तो मेल्यावर डॉ. ब्रोका यांनी त्याचे शवविच्छेदन करून पाहिले. डॉ. ब्रोकाना आढळले की त्याच्या मेंदूच्या डाव्या भागातील पुढच्या बाजूच्या छोट्याशा भागाला इजा झाली आहे. या भागाला ब्रोका यांचेच नाव देण्यात आले आणि न्यूराॅलाॅजीच्या इतिहासात हा भाग 'ब्रोकाज एरीया' म्हणून ओळखला जाऊ लागला.

डाॅ. ब्रोका यांनी वाचेशी संबंधित भाग शोधल्यानंतर 13 वर्षानी म्हणजे 1874 साली एका जर्मन डॉक्टरने वाचेशी संबंधित दुसरा एक मेंदूचा भाग शोधून काढला. हा भाग देखील मेंदूच्या डाव्या भागातच होता, पण ब्रोकाच्या भागाच्या तुलनेत मागच्या बाजूला होता. या जर्मन डॉक्टरचे नाव होते, डॉ. कार्ल वरनिके. त्यामुळे मेंदूच्या या भागाला नाव मिळाले, 'वरनिकेज एरीया'. डॉ. वरनिके यांनी जे पेशन्ट अभ्यासले होते त्यांचा प्रॉब्लेम डॉ. ब्रोका यांच्या पेशन्टपेक्षा वेगळा होता. डॉ.वरनिकेच्या पेशन्टना शब्दांचा अर्थ कळत नव्हता. त्यामुळे त्यांना काही विचारले तर ते वेगळेच बोलत.

आपण जेव्हा वाचा किंवा बोलणे किंवा स्पीच म्हणतो तेव्हा फक्त बोलणे एवढीच क्रिया होत नसते. आपण कोणाशी तरी बोलत असतो. कोणीतरी आपल्याला ऐकत असतो आणि प्रतिसाद देत असतो. त्या प्रतिसादाप्रमाणे आपण आपले बोलणे बदलत असतो. म्हणजे वाचा किंवा बोलणे किंवा संवाद म्हटले की त्यात ऐकणे ही क्रिया असते. कान आवाज ग्रहण करतात आणि ती संवेदना मेंदूला पोचवतात. मेंदूत त्या आवाजाचा बोध किंवा अर्थ लावला जातो. ऐकलेल्या आवाजाचा अर्थ लावण्याचे काम डॉ. वरनिकेने शोधलेला भाग पार पाडत असतो. त्यामुळे या भागात बिघाड झाला की आवाज जरी ऐकू आला तरी त्याचा अर्थ मात्र कळत नाही. याला सेंसरी अफेजिया किंवा वरनिकेज अफेजिया म्हणतात. या अवस्थेला 'वर्ड डेफनेस' किंवा 'शब्द बहिरा' असेही म्हणतात. या भागाच्या जवळच नजरेशी संबंधित मेंदूचा भाग असतो. या भागाला जर इजा झाली तर शब्द वाचता येत असूनदेखील त्यांचा अर्थ लावता येत नाही, याला 'वर्ड ब्लाइंडनेस' किंवा 'शब्द आंधळा' म्हणतात.

बोलणे नॉर्मल असण्यासाठी कानाने ऐकू येणे, ऐकलेल्या आवाजांचा अर्थ लावणे जसे आवश्यक असते तसेच ऐकलेल्या गोष्टीला प्रतिसाद देणे आवश्यक असते. काय प्रतिसाद द्यायचा याचा विचार केला जातो, त्यानुसार कोणते शब्द वापरायचे हे ठरवले जाते आणि हे शब्द उच्चारण्यासाठी स्वरयंत्राचे स्नायू, घसा आणि तोंड यांचे स्नायू यांना संदेश पाठवले जातात. डॉ. ब्रोका यांनी शोधून काढलेला मेंदूचा भाग शब्द उच्चारण्यासाठी स्वरयंत्र, घसा, तोंड वगैरेच्या स्नायूंना संदेश देण्याचे काम करतो.

डॉ. ब्रोकाने शोधलेला भाग असो नाहीतर डॉ. वरनिकेने शोधलेला भाग असो, यातील कोणत्याही एका भागाला इजा झाली की त्याचा परिणाम वाचेवर किंवा बोलण्याच्या क्षमतेवर होतो. पण या दोन्ही भागांच्या इजेचा परिणाम अर्थातच वेगवेगळा असतो आणि तो ओळखता देखील येतो.

श्रीयुत एस यांच्या वरनिकेज एरीयाला इजा झाली होती. त्यामुळे त्यांना दुसर्‍याने बोललेल्या शब्दांचा अर्थ समजत नव्हता. पण ते बोलू शकत होते. त्यांचे उच्चार स्पष्ट होत होते. कारण त्यांचा ब्रोकाज एरीया शाबूत होता. वरनिकेज एरीयाला इजा झालेल्यांचा दुसरा एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे आपण दुसर्‍याच्या बोलण्याचा अर्थ लावण्याची क्षमता गमावली आहे हे मात्र त्यांना ठाऊक नसते. त्यामुळे श्रीयुत एस यांना स्वतःला काही प्रॉब्लेम आहे असे वाटतच नव्हते.

याच्या उलट ज्यांचा 'ब्रोकाज एरीया' बिघडलेला असतो पण 'वरनिकेज एरीया' शाबूत असतो, त्यांना दुसर्‍याचे बोलणे समजत असते, त्याला काय उत्तर द्यायचे हेदेखील ते ठरवू शकतात पण त्यांना बोलता मात्र येत नाही, म्हणजे शब्द उच्चारता येत नाहीत. आणि आपण बोलू शकत नाही याचे दुःख त्यांना असते.

या लेखाच्या सुरुवातीला आपण पाहिलेले श्रीयुत एस असो किंवा डॉ. सॅक्सच्या वॉर्डमधील राष्ट्राध्यक्षांच्या भाषणावर खळखळून हसणारे पेशन्ट असो, त्यांनी आवाजाचा टोन, चढउतार, शब्दांपलिकडे व्यक्त होणाऱ्या भावना ओळखायची क्षमता विकसित केली होती. किंवा असे म्हणता येईल की शब्दांपलिकडे होणारा संवाद अभ्यासणारा त्यांच्या मेंदूचा भाग शाबूत राहिला होता. शब्दांचे अर्थ कळणे बंद झाल्यानंतर त्यांनी या क्षमतेकडे लक्ष दिले असेल. श्रीयुत एस भेटलेल्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमधले काम आटोपल्यावर हॉस्टेलच्या रूममध्ये काॅटवर आडवे होताच माझ्या मनात एक विचार चमकून गेला की श्रीयुत एसना झाले त्याच्या उलट होऊ शकते का? म्हणजे एखाद्याला बोललेल्या शब्दांचे अर्थ कळतात पण आवाजाचा टोन, त्यातील चढ उतार, त्यातून व्यक्त होणार्‍या भावना समजण्याची क्षमता नाहीशी होऊ शकते का...? डॉ.सॅक्स यांच्या 'प्रेसिडेंटस् स्पीच' याच लेखाच्या शेवटी त्यांनी श्रीमती एमिली डी. यांची केस वर्णन केली आहे. या बाईंना बोललेले शब्द कळत होते, पण आवाजाच्या चढ उतारातून व्यक्त होणार्‍या भावना समजत नव्हत्या. त्यांचा डावा मेंदू ठीक होता. त्यांची वरनिकेज एरीया शाबूत होती, पण उजव्या मेंदूतील वरनिकेज एरीयाच्या पातळीतील भाग ट्यूमरमुळे बिघडला होता.

या बाईंनी देखील ते राष्ट्राध्यक्षांचे भाषण ऐकले. अर्थात त्यांना राष्ट्राध्यक्षांचे शब्दच फक्त ऐकू येत होते, त्यांच्या बोलण्यातील चढउतार, त्यात व्यक्त झालेल्या भावना त्यांना कळल्या नव्हत्या. त्या भाषणावर अफेजिक मंडळींप्रमाणे त्या हसल्या नाहीत. पण त्यांचे म्हणणे होते की "राष्ट्राध्यक्ष महाशयांचे भाषण प्रभावी नव्हते. त्यांनी योग्य शब्द वापरले नाहीत. असे वाटत होते की त्यांच्या मेंदूत एकतर काही बिघाड झालाय किंवा त्यांना काही लपवायचे आहे."

यावर डॉ. सॅक्स यांनी केलेली अंतिम नोंद फारच रोचक आहे. भाषा ही मानवी प्राण्याची एकमेवाद्वितीय क्षमता आहे. माणूस वगळता इतर कोणताच प्राणी बोलू शकत नाही. पण ही भाषा हेच सामाजिक जीवनात भ्रम पसरवण्याचे साधन बनू शकते आणि नॉर्मल लोकांना मूर्ख बनवले जाऊ शकते. पण राष्ट्राध्यक्षांचे भाषण मात्र एक पॅराडाॅक्स दाखवतो, ज्या लोकांची वाचेची क्षमता नष्ट झाली आहे, ज्यांचा मेंदू बिघडला आहे, त्यांना मात्र राष्ट्राध्यक्षांच्या भाषणातील धूर्तपणे योजलेले शाब्दिक भ्रम फसवू शकले नाहीत. ज्यांना अफेजिया होता, त्यांना आवाजातील चढ उतारातून ढोंगीपणा दिसला, आणि ज्यांना फक्त शब्दच ऐकू आले त्यांना काहीतरी लपवले जातेय हे कळले!

.....

डॉ. रुपेश पाटकर

Tags:    

Similar News