कोव्हिडची लस सुरक्षित आहे का?

सध्या देशात कोव्हिड विरोधातील लसीकरण सुरु आहे. याबाबत कोव्हिडची लस सुरक्षित आहे का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात असताना कोरोनाची लस घेतलेले नितीन वैद्य यांनी व्यक्त केलेला अनुभव नक्की वाचा...;

Update: 2021-03-06 14:31 GMT

भारतात सध्या कोविडचा मुक़ाबला करण्यासाठी लसीकरणाची मोहीम चालु आहे. प्रसारमाध्यमांनी उलटसुलट चर्चा करून लस घेण्याबाबत बरेचसे संभ्रम तयार केले आहेत. अजुनही अशा बातम्या येत आहेत. पण लस घेण्याचे फायदे काय आहेत, याची सकारात्मक बाजु मात्र तेवढ्या प्रभावीपणे मांडली जात नाही.

सध्या ६० वर्षावरील नागरिक तसंच रक्तदाब, मधुमेह, ह्दय विकार अशा सहव्याधी असलेल्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांसाठी ही मोहीम देशभर राबविली जात आहे.

मला रक्तदाब ही सहव्याधी असल्याने मी गुरूवार, चार मार्च रोज़ी वांद्रे येथील Holy Family इस्पितळात ही लस घेतली. आम्हाला पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ने बनविलेल्या व ऑक्सफर्ड विद्यापीठ तसंच Astra Zeneca या औषध कंपनीने संयुक्तरित्या विकसित केलेल्या 'कोविशिल्ड' या लशीचा पहिला डोस देण्यात आला.

त्यावेळी इस्पितळाच्या प्रमुखांनी सर्वाना संबोधितही केले. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, आम्ही सर्वांनी ती सुरूवातीलाच घेतली आहे; आजच्या पहिल्या डोसमुळे तुम्ही कोव्हीडपासुन ७०% सुरक्षित झाला आहात, २८ दिवसांनंतर दुसरा डोस घेतलात की, ९२ टक्के सुरक्षित व्हाल, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरा डोस घेतला की, तुम्हाला लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळेल व त्याचा उपयोग देशांतर्गत व परदेश प्रवासासाठी होऊ शकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लस घेतल्यानंतर काही जणांना, ज्या हातावर ती देण्यात आली आहे, त्या ठिकाणी सूज येणे, हलका ताप येणे असे प्रकार होऊ शकतात; तसे झाल्यास क्रोसिन अथवा डोलो ६५० ही औषधं घ्या, मुळीच घाबरून जाऊ नका, असा आश्वासक सल्लाही त्यांनी दिला. मला यापैकी काहीही झालं नाही.

सध्या कोणतेही औषध / लस घेताना गुगलवर जाऊन त्याचे साईड इफेक्ट काय आहेत, ते जाणुन घेण्याची सवय खूप जणांना लागली आहे. हे खरंतर धोकादायक आहे. माध्यमंही त्याच आधारे बातम्या देत आहेत व त्या बातम्या समाज माध्यमांवर शेअर केल्या जात आहेत. अशा गुगल डॉक्टरांवर विसंबुन न राहता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या व त्यानुसार लस घेऊन टाका.

त्यासाठी कोविनच्या संकेतस्थळावर जाऊन लस घेण्यासाठीची नोंदणी करायची आहे. कोविडची शृंखला तोडण्यात अन्य सावधगिरी बरोबरच लसीकरण मोहीमेत सहभागी होणंही गरजेचं आहे.

Tags:    

Similar News