लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळेची लागन.....

Update: 2023-08-10 06:50 GMT

राज्यात डोळे येण्याची साथ सुरू असून लातूर जिल्ह्यातही या साथीचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लातूर जिल्ह्यात या साथीचे ४ हजार ६४ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन हजार ५१४ रुग्ण उपचाराअंती पूर्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर नेत्रतज्ञांच्या सल्ल्याने घरी उपचार सुरू आहेत, डोळे येणे हा साथरोग असून याबाबत लहान मोठ्या सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

साथीबाबत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. पाठक यांनी ही माहिती दिली. डोळ्याच्या साथीबाबत नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी बैठकीत केले. सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरे उपस्थित होते.

नागरिकांनी अशी काळजी घ्यावी

डोळयांच्या साथीच्या बाबतीत नागरिकांनी घाबरून न जाता डोळे लाल होणे, डोळ्यातून वारंवार पाणी येणे, डोळ्यांमध्ये टोचल्यासारखे वाटणे, डोळ्यांमध्ये चिकट पाणी येणे आदी लक्षणे जाणवल्यास तत्काळ नेत्रतज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावा.

एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरतो

हा आजार संसर्गजन्य असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. यामुळे डोळ्यांच्या साथीची लागण झालेल्या रुग्णांनी घराच्या बाहेर न फिरता घरीच क्वारंटाईन व्हावे. डोळ्यांना गॉगल लावावा, रुग्णांनी टॉवेल, रुमाल, साबण आदी वस्तू स्वतंत्र ठेवून इतरांना वापरण्यास देऊ नयेत. सदर रुग्णांनी जनसंपर्कात येऊ नये.

डोळ्यांना हात लावू नये

संसर्ग झालेल्या रुग्णांनी वारंवार डोळ्यांना हात लावू नये. इतर वस्तू व व्यक्ती यांना स्पर्श करु नये. स्विमींग पुलामध्ये पोहण्यासाठी जाऊ नये. स्विमींग पुलाच्या माध्यमातून संसर्ग जास्त पसरण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांनी उपचारादरम्यान काळजी घ्यावी

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास अशा विद्यार्थ्यांनी उपचारादरम्यान किमान सात दिवस घरीच राहावे.

Tags:    

Similar News