सावधान ! चिकनगुनियाने वाढवलं मुंबईचं टेन्शन
राज्यात पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईत अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यापार्श्वभुमीवर मुंबईत चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे.;
राज्याभरात पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईत चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच गेल्या आठ महिन्यात राज्यातील एकूण रुग्णांच्या 25 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच 1 जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत राज्यात 521 चिकनगुनिया रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी तब्बल 25 टक्के चिकनगुनियाचे रुग्ण एकट्या मुंबईतून समोर आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीत मुंबईत 131 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात मुंबईत 69 रुग्ण आढळून आले आहेत.
2016 नंतर पहिल्यांदाच मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आल्याचे दिसत आहे. 2016 मध्ये मुंबईत 73 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते.
काय आहे चिकनगुनियाचे लक्षण
चिकनगुनिया एक डासांपासून होणारा आजार आहे. यामध्ये चिकनगुनियाचे डास चावल्याने या आजाराची लागण होते. यामध्ये ताप, शरीरावर लाल चट्टे, सांधे आणि अंगदुखी ही प्रमुख लक्षणं दिसून येतात. चिकनगुनिया आजाराचा कुठलाही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र लक्षणांवर उपचाराने रुग्णाचा उपचार केला जातो.
चिकनगुनियाचा डास चावल्यानंतर 2 ते 10 दिवसादरम्यान कुठलेही लक्षणं दिसून येत नाहीत. त्यानंतर ताप, सांधेदुखी आणि शरीरावर लाल चट्टे ही लक्षणं दिसून येतात. याबरोबरच या कालावधीत तुमच्या हात आणि पायाला सूज सुद्धा येऊ शकते.
चिकनगुनियाच्या उपचारानंतर रुग्णाला 3-6 महिने वरील तीनपैकी एक लक्षण दिसून येते.
काय घ्यावी काळजी?
- चिकनगुनिया या आजारावर लस किंवा उपचार नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे हाच यावरचा महत्वाचा उपाय मानला जातो. त्यामुळे घरातील फुलदाण्या, कुंड्या, यामध्ये पाणी साचू देऊ नये. त्याबरोबरच घरात असलेले एसी, फ्रीज, कुलर यामधील पाणी स्वच्छ करत रहायला हवं.
- घराभोवती पाणी साठू शकेल असे खड्डे बुजवून टाकावेत.
- दिवसा आणि रात्री झोपताना अंगावर पूर्ण कपडे असायला हवेत. तसेच झोपताना मच्छरदाणी वापरावी. ज्यामुळे डास चावणार नाही.
- नारळाच्या कवट्या, टायर, फुटलेली भांडी यामध्ये पावसाळ्यात पाणी साठून डासांचा जन्म होऊ शकतो. त्यामुळे या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावायला हवी.
- चिकनगुनिया असलेल्या भागात जाणे टाळले पाहिजे. तसेच जर तुम्हाला चिकनगुनियाची लक्षणं दिसले तर तातडीने रक्ताची तपासणी करून घ्यावी. नाहीतर चिकनगुनिया जीवावर बेतू शकतो.