Ground Report : स्मशानभूमी अभावी प्रेत दफन करण्याची वेळ
जनतेच्या समस्या सोडवण्याचा दावा सर्वच राज्यकर्ते करत असतात. पण खरंच त्या समस्या सुटतात का, अजूनही प्रेत दफन केल्यावर गावकऱ्यांना त्याची राखण करायला का बसावे लागते, याचे वास्तव मांडणारा सागर गोतपागर यांचा कोयना धरण परिसरातील ग्राऊंड रिपोर्ट;
" आम्ही सर्व हिंदुत्वाला मानणारे लोक आहोत. आपल्या देशात देखील बहुसंख्य हिंदू आहेत. आमच्या हिंदू धर्मात चालत आलेल्या रूढी आणि परंपरानुसार मयत व्यक्तीवर अग्निसंस्कार केले जातात. माझ्या गावातील भगवान चव्हाण यांचे निधन झाले. त्या दिवशी गावात मोठा पाऊस पडत होता. गावाला स्मशानभूमी नसल्याने आमच्या पारंपारिक धार्मिक रूढी परंपरा मोडून त्यांचे दफन करण्याची वेळ आमच्यावर आली. दफन केल्यावर येथे डुक्कर तसेच वन्य असल्याने प्रेत उकरून वर काढण्याची भीती असते. भर पावसात लोकांना तेथे बसावे लागते".
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात कांदाटी खोऱ्यात वसलेल्या सालोशी गावातील गाव पाटील असलेल्या धोंडू देवजी शेलार यांची ही प्रतिक्रिया आहे. देशात हिंदुत्वाची विचारधारा सांगणारे सरकार अस्तित्वात आहे, असे असतानाही बहुसंख्य हिंदू असलेल्या गावात स्मशानभूमी नसल्याने एका मृत हिंदू व्यक्तीला अग्नी संस्कार न करता दफन करावे लागल्याने या गावातील नागरिक संतप्त आहेत. मृत भगवान चव्हाण यांचा मुलगा भरत चव्हाण हे रोजगारासाठी मुंबईला स्थलांतरित झालेले आहेत. गावाकडे दळणवळणाची सोय नसल्याने त्यांना आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन देखील घेता आले नसल्याची खंत ते व्यक्त करतात.
सालोशी हे गाव कोयना प्रकल्पग्रस्त असणारे गाव आहे. कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी म्हटले जाते. पण महाराष्ट्राचे भाग्य उजाडण्यासाठी आपले सर्वस्व त्यागलेल्या लोकांच्यापर्यंत हक्काच्या नागरी सुविधा देखील पोहचलेल्या नाहीत. सालोशी परिसरात रोजगार उपलब्ध नसल्याने येथील बहुसंख्य लोक मुंबईला स्थलांतरित झालेले आहेत. गावाकडे रोजगार उपलब्ध नाहीत. गावी राहणारे लोक शेतीवर कसाबसा आपला संसार सांभाळत आहेत. बहुसंख्य लोक मुंबईला कुटुंबासहित स्थलांतरीत झाल्याने गावातील प्राथमिक शाळेत केवळ दोन विद्यार्थी आहेत.
आरोग्याची परिस्थिती सांगताना नंदा चव्हाण या हळव्या होऊन प्रतिक्रिया देतात " आमच्या अनेक पिढ्या आरोग्याची फरपट सहन करत आलेल्या आहेत. पूर्वी आमच्याकडे डालग्यातून महिलांना प्रसूतीसाठी न्यावे लागायचे. सोमाजी शेलार याच्या पत्नीला प्रसुतीच्या कळा सुरु झालेल्या होत्या. वाहतूक सोय झाली नाही. सुईणीला आणण्यात आले. आई किंवा बाळ यापैकी एक कुणीतरी वाचेल म्हणून त्यांनी प्रयत्न केले पण यात आई आणि बाळ हे दोन्ही जीव गेले. या परिस्थितीला आमच्या गावाने तोंड दिलेले आहे. आम्ही अर्ज देतो. निवेदने देतो. पण त्याची दखल आजपर्यंत घेतलेली नाही. निदान आता तरी प्रशासनाने आम्हाला वाहतूक आरोग्य या सोयी उपलब्ध करून द्याव्यात.
सालोशी ही गट ग्रामपंचायत आहे. यामध्ये सालोशी, झाडानी, दोडानी, कांदाट आणि बन या गावांचा समावेश होतो. देशाच्या पंचायत राज व्यवस्थेत लोकसभेप्रमाणेच ग्रामपंचायतीला महत्व दिले आहे. गावाचा विकास करण्याच्या विकासाच्या वाटा ज्या ग्रामपंचायतीतून निर्माण होतात. त्या ग्रामपंचायतीची इमारतच सालोशीमध्ये बांधण्यात आलेली नाही. गावात असलेल्या जननी कालेश्वर देवीच्या मंदिरात ग्रामसेवक येऊन बसतात. याबाबत येथील माजी सरपंच जयराम शेलार सांगतात " या जननी कालेश्वर देवीच्या मंदिरात बसून आम्ही मासिक सभा ग्रामसभा घेतो. या अडचणीत ग्रामपंचायतीचे काम करता येत नाही. सर्व दफ्तर तापोळा येथे आहे. ग्रामसेवक ठराविक रजिस्टर घेऊन येतात. जन्म मृत्यू नोंदी करण्यासाठी आम्हाला तापोळा येथे जावे लागते. पावसाळ्यात काहींच्या नोंदी उशिरा होतात. तर काहींच्या नोंदी राहून देखील जातात. आजपर्यंत येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आलेली नाही. या स्थितीत आमच्या गावाचा विकास कसा होणार". सालोशी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य असलेल्या नकुबाई शेलार सांगतात " आम्ही मंदिर किंवा शाळेच्या खोलीत बैठका घेतो. गावासाठी निधी उपलब्ध होत नाही. गावात अंतर्गत रस्ते उपलब्ध नाहीत. स्मशानभूमी नाही".
सालोशी गावाला पोहचण्यासाठी येथील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. बामणोली येथून सरकारी बोट असते. पण ती वेळेत उपलब्ध नसते. पावशेवाडी येथून तराफा मधून बाईक दरे या गावात न्यावी लागते. यासाठी लोकांना दररोज आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागतो. दरे येथून काही ठिकाणी पक्का रस्ता उपलब्ध आहे. पण बर्याच ठिकाणी रस्ता कच्चा आहे. दरे येथून किमान दीड तास मोटार सायकलीचा प्रवास करावा लागतो. तत्पूर्वी मुंबई येथून जेवढा वेळ सातारा येथे पोहचायला जातो. तितकाच वेळ सातारा येथून गावात पोहचायला लागतो. काही लोक खेड वरून खाजगी गाडीने गावात पोहचतात. या स्थितीत अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात पोहचवणे कठीण होते. इतर ठिकाणी रुग्णाचा जगण्यासाठीचा संघर्ष रुग्णालयात सुरु होतो. पण रुग्णालयात या रस्त्यावरून जलाशयातून प्रवास करण्याचा जीवघेणा संघर्ष या नागरिकांना गावातूनच करावा लागतो. त्यानंतर रुग्णालयात अत्यावश्यक सेवा मिळाल्यात तर ठीक नाहीतर पुढे सातारा येथे न्यावे लागते. या दरम्यान अनेक मृत्यू देखील झालेले आहेत. गावात बाळंतपणात स्त्रियांचे बालकांचे मृत्यू झालेले आहेत.
बाहेरून गावात येण्यासाठी या समस्या आहेतच. पण गावात अंतर्गत रस्त्यांची देखील मोठी वानवा आहे. दैनंदिन कामासाठी लोकांना अडचणीतून पायवाट तुडवावी लागते. या भागात जंगल असल्याने विषारी सापांचे प्रमाण अधिक आहे. हे धोके पत्करून लोक वाटचाल करत राहतात. गावातील ओढ्यावरून जाणारा एक पूल आहे. यावरूनच विद्यार्थी शाळेत तसेच दुसऱ्या गावात जात असतात. हा पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. लोक पाण्याच्या प्रवाहातून चालत प्रवास करतात. यामध्ये पाण्यातून वाहून जाण्याची देखील भीती असते. याबाबत येथील माजी सरपंच आनंद शेलार सांगतात " नादुरुस्त पूल दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिले. एका पुलाचा सर्वे देखील झाला पण पूल काही झाला नाही. पुनर्वसन विभागात उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. शेतीशी जोडणारा हा पूल नादुरुस्त आहे. यावरूनच शेतीची अवजारे न्यावी लागतात पण याकडे वारंवार सांगूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
सालोशी गावातील नागरिकांनी या समस्या अनेकदा सरकार दरबारी मांडल्या आहेत. पण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यानंतर आता हे लोक त्यांना लोकशाहीने दिलेले आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत. याबाबत महेश शेलार सांगतात. " अठरा नागरी सुविधा हा नागरिकांचा हक्क असताना या सुविधा सालोशी गावात उपलब्ध नाहीत. गावात बस थांबा नाही. गावात अंतर्गत रस्ते नाहीत. गावात रेशन दुकान नाही एक किमी अंतर जाऊन रेशन आणावे लागते. ग्रामपंचायत इमारत नाही. गावात बस पोहचत नाही. आरोग्य सुविधा नाहीत. ओढ्यांवर पूल नाहीत. स्मशानभूमी नाही. वर्षानुवषे लोक हे सहन करत दिवस काढत आहेत. पण सरकारला लोकप्रतिनिधीना आमच्या वेदना आजवर दिसलेल्या नाहीत." आता तरी सरकार या दुर्लक्षित गावांचा आवाज ऐकणार का ? ते कधी या गावांकडे येणार याकडे या भागातील लोक वाटेवरती डोळे लाऊन बसलेले आहेत.