उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती.
या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आता आरोप प्रत्यारोप होत असून आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूरमधील आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
या घटनेवरुन केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी वेगळी भुमिका घेतली आहे. ते म्हणाले, लखीमपूर खेरीमध्ये जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा त्यांचा मुलगा घटनास्थळी नव्हता. शेतकऱ्यांशिवाय मारल्या गेलेल्या इतर चार जणांमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि एक कार चालकाचा समावेश होता. आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही समाजकंटक तलवारी आणि काठ्या घेऊन होते, त्यांनी हल्ला केल्याने इतरांचा मृत्यू झाल्याचा आरोप अजय मिश्रा यांनी केला आहे.
"आमच्या चार-पाच कार्यकर्त्यांचा मृत्य झालाय. तर, २-३ जण बेपत्ता आहेत. मी घटनास्थळी नव्हतो. जर, मी तिथे शेतकऱ्यांना चिरडले असते, तर मी कोणत्याच जखमांशिवाय कसं आलो असतो," असाही दावा आशिष मिश्रांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी कलम ३०२२, १२० बी आणि इतर कलमांसहीत हे गुन्हे दाखल केले आहेत.
विवारी, लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल असून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा यानं आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दोषींना अटक करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.