कोरोना लसीकरणाला स्थगिती नाही, आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
मुंबईत कोरोनावरील लसीकरण थांबवण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर राज्याच्या आरोग्य विभागाचा खुलासा
कोरोनावरील लसीकरणाला शऩिवारपासून देशभऱात सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरूवात झाली. पण त्यानंतर संध्याकाळी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईमध्ये दोन दिवस म्हणजे 17 आणि 18 जानेवारीपर्यंत लसीकरण स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले. कोविन एपमधील तांत्रिक अडचणीमुळे हे लसीकरण स्थगित केल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. महापालिकेतर्फे जे ट्विट करण्यात आले होते त्याप्रमाणे, " कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित.
कोविड १९ लसीकरण मोहिमेची आज (दिनांक १६ जानेवारी २०२१) अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक १७ जानेवारी २०२१ आणि सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे."
राज्याच्या आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
मुंबईत लसीकरणाला स्थगिती दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असताना राज्याच्या आरोग्य विभागातर्फे मात्र असे काहीही घडले नसून लसीकरण ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या ट्विटमध्ये, " राज्यात नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द केलेले नाही-आरोग्य विभागाचा खुलासा; राज्यात तात्पुरत्या स्वरूपात १८ जानेवारीपर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण.केंद्र शासनाच्या सूचनांनुसार पुढील आठवड्यात ४ दिवस लसीकरण सत्राचे आयोजन." असे सांगण्यात आले आहे.