कधी कधी सेवकांची अतिस्वामीनिष्ठा ही स्वामीच्या जीवाशी येते. लहानपणी आपण राजाचं रक्षण करणाऱ्या माकडाची कहाणी ऐकली-वाचली असेल. माकडाच्या हातात तलवार देऊन राजा झोपी जातो आणि त्याला छळणाऱ्या माशीला पिटाळणताना माकड राजाचं नाकचं कापतो. अशीच काहीशी स्थिती सध्या भाजपाच्या बाबतीत झालेली दिसतेय. भाजपाला निवडणूका जिंकवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विडा उचलला होता त्यांच्या अतिस्वामीनिष्ठेमुळे भाजपाला आता चांगलीच किंमत चुकवावी लागत आहे.
देशातील पाच राज्यांत झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपाचा विजयी अश्वमेध थांबवण्यात काँग्रेसला यश आलं. खरं तर हा अश्वमेध गुजरात आणि कर्नाटकच्या निवडणूकांमध्येच थकला आणि हरला होता, भक्तगण मान्य करायला तयार नव्हते. जुगाड करून मिळवलेली गोव्याची सत्ता, सतत ढुशा खाऊन चाललेलं महाराष्ट्राचं सरकार आणि अगदीच कमी पडलं तर त्रिपुराचे मुख्यमंत्री, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांचं गुणगान करत भक्तांनी आपलं लज्जारक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला होता.
इतर सर्व निवडणूकांप्रमाणेच यंदाही भाजपची मदार सोशल मिडीया आणि मुख्यप्रवाहातील माध्यमं यांच्यावर होती. मुख्य प्रवाहातील माध्यमं, विशेष करून वृत्तवाहिन्या खाल्ल्या मिठाला जास्तच जागत होत्या. त्याचमुळे गेल्या तीन चार महिन्यात राहुल गांधी म्हणजे मूर्ख, काँग्रेस म्हणजे लाचारांचा पक्ष, देशातील सर्व वाईट गोष्टींसाठी काँग्रेस-प्रामुख्याने नेहरू आणि त्यांचा ‘गांधी’ परिवारच जबाबदार असल्याचा अजेंडा जोरदार चालवला गेला. देशातले सर्व मुसलमान देशद्रोही, हिंदू संकटात, मंदिर म्हणजे ऑक्सीजन, राम म्हणजे प्राण, भारत पाकिस्तान वाद असा अतर्क्य गोष्टींवर जवळपास सर्वच भक्त चॅनेल्सचा अजेंडा सेट झाला होता. हा अजेंडा इतका ओंगळवाणा होता की बघणाऱ्याला शिसारी यावी. न्यूज चॅनेल्सचे अँकर तर ‘सुपारी’ वाजवल्यासारखे अँकरींग करत होते. मालकाचा अजेंडा जास्तीत जास्त कसा वटेल याची जवळपास स्पर्धाच सुरू होती. सोशल मिडीयावर ही रोजच राहुल गांधी, गांधी परिवार, नेहरू यांच्यावरच्या पोस्टचा भडीमार सुरू होता. मोदींच्या टीम मधल्या पर्सेप्शन मॅनेजमेंट तज्ज्ञांना वाटत होतं आपण पर्सेप्शन मॅनेज केलंय आणि सोशल मिडीयावर जे फिरतंय तेच खरं पर्सेप्शन आहे. म्हणजे जे जाळं मोदींच्या टीमने विणलंय त्यातच ते फसत चाललेयत असं दिसतंय.
देशभरात विविध विषयांवरून, खासकरून रोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेलं नाराजीचं वातावरण या तज्ज्ञांना अजूनही दिसत नाहीय. त्यांनी जे ऑनलाइन सेंटींमेंट आपल्या पगारी टीम कडून तयार करून घेतलंय तेच त्यांना आता खरं वाटू लागलंय.
निवडणूका जिंकण्यासाठी हवा करण्यासाठी वापरले जाणारे जे जे मार्ग आहेत ते भाजपाने यावेळीही वापरले, पण हे माध्यम वापरताना केलेला मर्यादा भंग, सौजन्याचा खून, विषाक्त प्रचार, तिरस्कार-विद्वेषाची भाषा या सर्वामुळे भाजपचा एक असा चेहरा लोकांच्या मनात तयार होऊ लागलाय जो इथल्या सहिण्षू संस्कृतीच्या विपरीत आहे. भारतात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा काही काँग्रेसचा आणि गांधी परिवाराचा गुलाम नाही. तो विचारी आहे. तो चांगलं वाईट निवडू शकतो. त्याला तुम्ही चांगले का हे पटवून द्या तो तुम्हाला डोक्यावर घेतो, त्याला तुम्ही इतर वाईट कसे हे सांगा तो तुम्हाला डोक्यावरून खाली उतरवतो. भाजपची सुपारी वाजवणाऱ्यांनी मोदी चांगले कसे हे जोपर्यंत सांगीतलं तो पर्यंत लोकांनी मोदींना डोक्यावर घेतलं, त्यांनी ज्या क्षणी रोज प्राइम टाइम वर बसून इतर कसे वाईट, नपेक्षा देशद्रोही आहेत हे सांगण्यास सुरूवात केली तेव्हापासून भाजपाच्या पतनाला सुरूवात झालीय. माकडाने तलवार चालवलीय, नाक उडालंय, वेळ आहे अजून जीव वाचवू शकताय तर वाचवा...