वाचाळांच्या माथी हाणा काठी...
जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी वाचाळवीरांच्या तैनाती फौजा ठेवल्या आहेत. माध्यमे ही या वाचाळवीरांना डोक्यावर घेतात. संपूर्ण यंत्रणाच विकली गेली आहे, यामुळे लोकशाहीचा अंत निश्चित आहे. लोकशाहीच्या आडून येत चाललेली राजेशाही धोकादायक आहे, या धोक्याचा इशारा देणारा रवींद्र आंबेकर यांचा लेख...
जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी वाचाळ नेत्यांची तैनाती फौज बाळगली आहे. ज्या पक्षांनी आजवर सुसंस्कृतपणाची वल्कले मिरवली होती, त्या पक्षांनीही इतर पक्षांमधून वाचळवीरांना आयात करून आपली फौज बनवली आहे. कोण कुणाला धमकी देतंय, कोण कुणाची लफडी बाहेर काढतंय, कोण कुणाच्या परिवारावर हल्ला करतंय, कोण कुणावर थुंकतंय, कोणी कुणावर हल्ला करतंय... कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या राजकारणाने सर्वांत खालचा स्तर गाठला आहे.
यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं, त्यामुळे शीतावरून भाताची परीक्षा करूया. प्रजेचा स्तर इतका खाली येण्याचं कारण असं की राजाही रसातळाला गेलेला आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांना भरपूर प्रसिद्धी मिळत असते. भारतातील माध्यमेही, ‘हा काय बोलला को काय बोलला’ या एकमेव अजेंड्यावर काम करतात. त्यामुळे साहजिकच नेत्यांच्या सगळ्याच कृती लोकांसमोर मांडल्या जातात आणि त्याचे आदर्श ( ? ) समाज घेत असतो. हा समाज किर्तनाने सुधारत नाही, आणि तमाशाने बिघडत नाही असं म्हटल जायचं, मात्र आता माध्यमे आणि समाजमाध्यमांचा प्रभाव इतका झालाय की समाजाचं ही स्वास्थ्य बिघडू लागलंय. त्याचमुळे नेत्यांच्या वक्तव्यांची आणि कृतीची गंभीर चर्चा करण्याची वेळ आलेली आहे.
देशपातळीवर तर भयानक परिस्थिती आहे, काल न्यूज 18 च्या स्टुडीयोमध्ये अक्षरशः मारामारी झाली. वर्तमानपत्रे किंवा टीव्ही स्टुडीयो हे बौद्धिक आदान-प्रदानाची केंद्र मानली जायची. समाजाला दिशा द्यायचं काम माध्यमे करायची. आज समाजाची दशा बिघडवण्याचं काम माध्यमं करतायत.
सतत हिंदू-मुस्लीम अजेंड्यावर वातावरण गरम करणाऱ्या न्यूज चॅनेल्सनी आपल्या स्टुडीयोंना रवांडा रेडीयोचं स्वरूप दिलं आहे. एक दिवस असा येईल जेव्हा देशातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हे स्टुडीयो उद्ध्वस्त करावे लागतील.
राजकीय पक्ष तर सुपारी घेणाऱ्या टोळ्या झाल्यायत. राजकीय पक्षांची रचना जर नीटपणे अभ्यासली तर राजकीय पक्षांना सत्तेत का यायचं असतं याची उकल होईल. देशातील लोकशाही कधीच संपली आहे. भ्रष्ट नोकरशाही, पोखरलेली न्यायव्यवस्था, विकले गेलेली माध्यमं या सगळ्यांनी मिळून लोकशाहीचा कधीच खून केलाय. आज देशात फक्त भ्रष्टाचार आहे. सत्ता कुणाचीही येवो, राज्य कंत्राटदार आणि भांडवलदारांचचं असणार आहे. नेत्यांच्या निवडणुकांना भांडवलदार पैसा पुरवतात. जो जिंकून येईल त्यामागे पैसा उभारला जातो, ही गुंतवणूकच आहे. राजकीय नेते कुठल्या ना कुठल्या उद्योगपतींसाठी काम करत असतात. सत्तेवर आल्यावर मर्जीतल्या लोकांना कंत्राट वाटपाचा कार्यक्रम असतो. सरकारी कंत्राट म्हणजे ४०-५० टक्के रक्कम वाटपाचा कार्यक्रम आहे. ५० टक्के मध्ये कर, काम आणि नफा सांभाळणारे कंत्राटदार – उद्योगपती जनतेचा पैसा अक्षरशः लुटतायत. तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर डाका टाकणाऱ्या या टोळ्यांनी वेगवेगळे मुखवटे ओढलेले आहेत. कुणी जातीचा, कुणी धर्माचा मुखवटा परिधान केला आहे. आपण या मुखवट्यांमागे धावत जातो, वेडे होतो. आपलं हित कशात आहे, याचा कधीच विचार करत नाही.
लोकशाहीमध्ये आपल्या मताला किंमत आहे, आपण मात्र त्या मताची किंमत लावून विकून टाकतो आणि बाजारू नेते आपल्या उरावर घेतो. निवडणुकांमध्ये पैशाचा, धर्माचा वापर हा लोकशाहीचा खूनच आहे. विवेक मेला की माणूस मरतो, आपण मेलेला समाज आहोत. या समाजाचं काहीच होऊ शकणार नाही. देशाची सर्व यंत्रणा आता सडलीय, कोसळलीय. मात्र आपल्याला सतत एक विलोभनीय चित्र दाखवून भुलवलं जातं. आपण त्याला भुलतोही.
महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारणासाठी देशभर ओळखला जायचा. आज टपरीछाप नेते महाराष्ट्राचे नेते झालेयत. ज्यांची काहीच औकात नव्हती ते आता राज्याचा अजेंडा ठरवतात. दररोज सकाळी टिनपाट नेते टिव्ही चॅनेल्सवर जी हगवण सुरू करतात ती माध्यमे दिवसभर बरवटवत बसतात. यातून कोणीच सुटलेलं नाही. ही परिस्थिती फार भयावह आहे. या दर्जाचा समाज आपण झालोयत की जेथे आपल्याला आपल्या विचारधारेच्या लोकांचं मुसळ दिसत नाही, पण विरोधकांच्या डोळ्यातील कुसळ मात्र दिसतं. पक्षीय विचारधारा असण्याला काहीच हरकत नाही, मनुष्यप्राणी हा राजकीय प्राणीच आहे, मात्र त्यातील विवेक मात्र आपण हरवून बसलोयत. काही फालतू लोकांमुळे परस्पर संवादही संपू लागला आहे. एकमेकांचे विरोधी विचारांची लोकं पूर्वी एकत्र भेटत असत, गप्पा, वादविवाद करत असत, आता अशा जागा संपू लागल्या आहेत. आता विरोधक – प्रतिस्पर्धी म्हणजे शत्रू असं समीकरण झालं आहे.
सत्ता म्हणजे राजेशाही नव्हे. जनतेचा खजिना रिता करायचं लायसन्स नव्हे. राज्य आणि केंद्र सरकारे अमाप उधळपट्टी करतायत, मात्र बहुमताच्या जोरावर यावरचे सर्व प्रश्न बंद केले जातात. राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कामकाज केलं जातंय, मात्र बहुमताची दहशत दाखवली जाते.. लोकशाहीमध्ये आलेली ही राजेशाही धोकादायक आहे. कुणालाही दोषी ठरवलं जातं, देशद्रोही ठरवलं जातं, स्पॉट जस्टीस च्या नावाने कायदा हाती घेतला जातो.. आपण एका सभ्य समाजाकडून पुन्हा टोळीकरणाकडे जात आहोत. यात कुणी प्रबोधन करण्यासाठी उभं राहिलं की त्याला शांत केलं जातं, ही लक्षणे काही योग्य नाहीत.
आज जगभरात अनेक देशांमध्ये आपल्याला दबक्या पावलांनी आलेली हुकूमशाही दिसत आहे. आपलंच स्वातंत्र्य आपण असं गहाण ठेवणं योग्य नाही. इतकी प्रगती केल्यानंतरही आपल्याला हुकुमशाहीचं प्रेम वाटावं हे अनाकलनीय आहे. समाजकारण, अर्थकारण यांचा गंध नसलेले नेते विद्वेष आणि ध्रुवीकरणाचं स्वस्त राजकारण करून माहौल बिघडवत आहेत. उलट सुलट आर्थिक निर्णय घेऊन जनतेला मर्जीचं गुलाम बनवत आहेत. ही परिस्थिती आपल्याला पारतंत्र्यात ढकलणारी आहे.
आज नाठाळ, वाचाळ, बेताल लोकांच्या हातात सत्तेचा लगाम जाणं म्हणजे माकडाच्या हातात तलवार देण्यासारखंच आहे. माकड एक दिवस तलवार हाती देणाऱ्या राजाचं नाक कापून टाकतं तसंच देशातील मतदार राजाचं झालेलं आहे. नाक कापलंय, आता तरी जागे व्हा, वाचाळांच्या माथी काठी हाणू या..